Success Story : तळोद्यातील अश्विनी रामचंद्र माळी कौटुंबिक जबाबदारी सांभाळत मराठी विषयात राज्य पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांनी अथक परिश्रम करीत वाटेत आलेल्या प्रत्येक समस्येचा जिद्दीने व चिकाटीने सामना केला व यश मिळविले.
सोबतच नुकत्याच झालेल्या एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबईतर्फे घेण्यात आलेल्या पेट (PET) परीक्षेतही त्या यशस्वी झाल्या असून, त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. (success story Ashwini Mali passed State Eligibility Examination in Marathi subject nandurbar news)
अश्विनी माळी यांना सुरवातीपासूनच शिक्षणाची आवड होती. घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असतानादेखील त्यांनी अहोरात्र परिश्रम घेत बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर लागलीच २००१ मध्ये त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर अभ्यासात हुशार असूनदेखील कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांचा शिक्षणात खंड पडला.
मात्र त्यांच्यातील जिद्दी स्वभाव व शिक्षणाबाबतची आपुलकी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आपण पुढील शिक्षण घ्यावे, असा विचार सारखा त्यांच्या मनात येत होता. त्यामुळे लग्नानंतर पुन्हा एकदा शिक्षण घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले व त्यांच्या विचारांना पती अनिल पवार व सासरच्या सर्व मंडळींनी होकार दिला. चार वर्षांच्या खंडानंतर त्या पुन्हा एकदा शिक्षणाकडे वळाल्या आणि त्यांनी सर्वप्रथम मॉन्टेसरीचा कोर्स पूर्ण केला.
त्यानंतर त्यांनी २००६ मध्ये एफवायबीएला ॲडमिशन घेतले व २००९ मध्ये मराठी विषयात पदवी पूर्ण केली. २०११ मध्ये त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आणि २०१२ मध्ये बीएडदेखील चांगल्या गुणांनी पास झाल्या व नंतर एमएबीएडदेखील पूर्ण केले.
यादरम्यान त्या विद्या सहयोग बहुउद्देशीय संस्था संचलित आमलाड (ता. तळोदा) येथील त्रिमूर्ती महिला महाविद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
अश्विनी माळी यांच्या घरची तसेच लग्नानंतर सासरकडची आर्थिक परिस्थिती जेमतेम होती. तरीसुद्धा त्यांनी सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडत, नोकरी करून अथक परिश्रम घेत आपले ध्येय साध्य केले आहे. यासाठी त्यांना पती अनिल पवार यांचे सहकार्य लाभले. श्री. पवार यांनी स्वतः शेतीकामे, प्रसंगी ट्रॅक्टर चालवून कुटुंबाच्या पर्यायाने अश्विनीच्या शिक्षणाला हातभार लावला.
दरम्यान, अश्विनीचे तीन संशोधन पेपर प्रकाशित झाले असून, सेट पात्रता परीक्षा पास होण्यासोबतच त्यांनी एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबईतर्फे घेण्यात आलेल्या पेट परीक्षेतही यश मिळविले आहे.
त्यांचा या यशाबद्दल माहेरच्या व सासरच्या कुटुंबाने तसेच संस्थेच्या अध्यक्षा विद्यादेवी तांबोळी, अशोक तांबोळी आणि त्रिमूर्ती महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर. मगरे, प्रा. आरजू पिंजारी, प्रा. किरण वळवी, प्रा. रामेश्वरी बत्तीसे, चेतना माळी आदींनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
"लग्नानंतर शिक्षण घेत असताना आर्थिक तसेच इतर अनेक अडचणी आल्या. मात्र कौटुंबिक जबाबदारी सांभाळून सर्व अडचणींवर मात करून ध्येय साध्य केले, त्याचा मनस्वी आनंद होत आहे. ध्येय साध्य करण्यासाठी मला पती व आई-वडील यांच्यापासून प्रेरणा मिळाली, तर भाऊ अंकुश कर्णकार व राहुल कर्णकार यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले." -अश्विनी माळी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.