Dhule News : येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात विविध पातळीवरून सीटी स्कॅनसह एमआरआय मशिनची वारंवार मागणी होते. या सेवा-सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकांकडे पाठपुरावा सुरू असून, लवकरच ही मशिन उपलब्ध होतील, असा विश्वास महाविद्यालयासह रुग्णालयाचे अधिष्ठाता व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
जनहित लक्षात घेता या सुविधांच्या उपलब्धतेसाठी पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते अॅड. जवाहर पाटील यांनी माहिती अधिकारात सीटी स्कॅनसह एमआरआय मशिनच्या उपलब्धतेसंदर्भात माहिती मागितली. याअनुषंगाने रुग्णालय व्यवस्थापनाने ही माहिती दिली. (Trying for CT scan, MRI service in Hire Government Medical College dhule news)
रुग्णालयावर भार
शहरात चक्करबर्डी येथे श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सर्वोपचार रुग्णालय १९८९ मध्ये सुरू झाले. या रुग्णालयावर धुळेच नव्हे तर नंदुरबार जिल्हा, अमळनेर, पारोळा, चाळीसगाव, झोडगे, मालेगाव येथील रुग्णांचा भार असतो. पूर्वी हे रुग्णालय शहरातील साक्री रोडवरील सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात होते. नंतर ते सुरत बायपासवरील चक्करबर्डी येथील स्वमालकीच्या जागेत स्थलांतरित झाले.
रुग्णांची गैरसोय
रुग्णसेवेसाठी तत्पर असूनही या प्रमुख शासकीय जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात सीटी स्कॅन व एमआरआय मशिन नाही. त्यामुळे रुग्णांसह नातेवाइकांची गैरसोय होते. विविध संघटना, लोकसेवकांनी वारंवार या सुविधांची मागणी लावून धरली आहे. तसेच ॲड. पाटील यांचाही पाठपुरावा सुरू आहे. याअनुषंगाने त्यांनी माहिती अधिकारात माहिती मागविली. त्यात हिरे महाविद्यालयासह रुग्णालय व्यवस्थापनाकडून या दोन्ही मशिनसाठी होत असलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यात आली. १४-१
सेवांसाठी हालअपेष्टा
आपत्कालीन निदान आणि न्यूरो सर्जरी, अॅन्को सर्जरी, हाडांचे आजार, रेडिओलॉजी आदी आजारांच्या रुग्णांचे निदान करण्यास सीटी स्कॅन व एमआरआय मशिनची निकडीची गरज असते. सद्यःस्थितीत सिव्हिलमधील उपलब्ध सीटी स्कॅन मशिनचा पर्याय म्हणून वापर होत असला तरी रुग्णांसह नातेवाइकांना हिरे महाविद्यालय ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी द्राविडी प्राणायाम करावा लागतो.
त्यात वेळ आणि पैशांचा अपव्यय, तसेच शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. रुग्णांना हालअपेष्टा सोसाव्या लागतात. त्यामुळे हिरे महाविद्यालयासह संलग्न जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात सीटी स्कॅन व एमआरआय मशिनची सेवा-सुविधा तातडीने कार्यान्वित व्हावी, अशी मागणी अॅड. पाटील यांनी केली.
मान्यता असूनही...
हिर मेडिकलने नवीन सीटी स्कॅन मशिनसाठी मान्यता मागितली आहे. केंद्र सरकारकडून अकराव्या पंचवार्षिक योजनेंतर्गत या मशिन खरेदीसाठी निधी मिळाला. मात्र, हाफकिन संस्थेने मशिन खरेदी न करता तो निधी आरबीआयकडे जमा केला. परिणामी हाफकिन संस्थेने खरेदी प्रक्रिया न राबविल्याने व दोन वर्षांहून अधिक काळ झाल्याने जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाचे नुकसान झाले आहे.
एमआरआय मशिन रेडिओलॉजी विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अत्यावश्यक आहे. त्याअनुषंगाने दिल्लीस्थित भारतीय आयुर्विज्ञान परिषदेकडून दोन वेळा महाविद्यालयासह सर्वोपचार रुग्णालयाची पाहणी करण्यात आली आहे. या संदर्भात निकष पूर्ण होत नसल्याने तसेच रेडिओलॉजीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला परवानगी मिळाली नसल्याने या मशिनची उपलब्धता रखडलेली आहे, असे ॲड. पाटील यांनी सांगितले.
"एमआरआयद्वारे खासगीत तपासणी केल्यास मोठा आर्थिक खर्च येतो. न्यूरो सर्जरी, कर्करोगनिदान व शस्त्रक्रिया, अस्थिव्यंगोपचार आदींसाठी हे मशिन गरजेचे आहे. त्याअभावी रुग्णांची गैरसोय होत आहे. या संदर्भात मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे अधिष्ठातांनी लेखी स्वरूपात कळविले आहे." -ॲड. जवाहर पाटील, सामाजिक कार्यकर्ते, धुळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.