अयोध्या: देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारे अयोध्येतच राम मंदिर उभारणीचं कार्य जोश अन जल्लोषात सुरू झाले असले तरी भारतीय जनता पक्षावर इथला मतदार कमालीचा नाराज दिसत आहे. प्रभुरामचंद्राच्या या पवित्र भूमीत जातकारण आणि स्थानिक व्यापाऱ्यांचे अर्थकारण हाच मतदानाचा डोस ठरणार असे संकेत आहेत.
ब्राह्मणबहुल या मतदारसंघात समाजवादीचे बाहुबली नेते आणि ब्राह्मण समाजाचे नेतृत्व करणारे पवन पांडे यांनी भाजपच्या समोरचे कडवे आव्हान उभं केले आहे. त्यामुळे व्यापारी समाजातील (बनिया ) भाजपचे विद्यमान आमदार प्रकाश गुप्ता यांच्या समोर राममंदिरासारखा विजयाचा ''रामबाण'' मुद्दा असूनही कडवे आव्हान उभे राहिल्याचे चित्र आहे. अयोध्या-फैजाबाद या जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. देशाच्या तमाम रामभक्तांची मंदिर उभारण्याची इच्छा पूर्ण झाली असून भारतीय जनता पक्षाने हा ज्वलंत प्रश्न निवडणुकीचा मुद्दा बनवला आहे. राम मंदिराबाबत सर्वांतच समाधान आहे. पण या मतदारसंघातील जातीय समीकरणे आणि बेरोजगारीसह बांधकामे तोडण्याचा निर्णय अयोध्यावासीयांना रुचलेला नाही. आतापर्यंत पंधरा हजाराहून अधिक घरे आणि दुकानांवर बुलडोजर फिरवला आहे. तर हनुमान गडी, राम मंदिर मार्गातील सुमारे २५ ते ३० हजार घरे आणि दुकानं हटविली जाणार आहेत. योगी सरकारच्या या धोरणालाच अयोध्येतील नागरिक अन व्यापाऱ्यांचा विरोध आहे. पिढ्यानपिढ्या अयोध्यानगरीचे स्थानिक रहिवाशी विस्थापित होणार असल्याने हा निवडणुकीचा मुख्य मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. त्यातच शरयू किनारी गोमाता पूजन करणाऱ्या सुमारे पाच ते सात हजार ब्राह्मणांना योगी सरकारने हटवण्यासाठी दंडेलशाही केल्याचा रोष देखील आहे. ज्यावेळी शरयू किनारच्या या पंडितांवर पोलिस कारवाई सुरू होती तेव्हा सपचे नेते पवन पांडे ठामपणे पंडितांच्या बाजूने उभे राहिले अन कारवाई रोखल्याचे इथले पंडित सांगतात. २०१७ ला मोदी - योगी च्या लाटेत हा मतदारसंघ भाजपने खेचला. पण यावेळी राम मंदिराशिवाय जात आणि विस्थापनाने येणाऱ्या बेरोजगारीचे संकट हाच निवडणुकीचा मुख्य मुद्दा बनला आहे. योगी मुख्यमंत्री झाल्यापासून राम मंदिर उभारणीच्या आणि इतर राजकीय दौऱ्यासाठी चाळीस वेळा अयोध्येत आले. पण या प्रत्येक वेळी प्रशासनाने ''अभूतपूर्व'' बंद ठेवण्याचे आदेश काढल्याची नाराजी व्यापारी व्यक्त करतात. व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना घरात किंवा पोलिस स्टेशनमध्ये नजरकैदेत ठेवले जाते असे चाळीस वेळा हा अनुभव घेतलेले व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सांगत होते.
योगींनी अयोध्या सोडण्याचे ‘ते’ कारण
दरम्यान योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या विधानसभेतून लढण्याची तयारी केली होती. पण स्थानिकांची नाराजी, ब्राह्मण जातीचे वर्चस्व असलेला विरोधातील उमेदवार हे आव्हान असल्याचा दावा पवन पांडे करतात. याशिवाय, राम मंदिराचे जेष्ठ संत महंत यांनीही योगींना अयोध्येतून निवडणूक लढू नका, असा सल्ला दिल्याचा दावा करणारेही खूपपण भेटतात. पण राम मंदिर यापेक्षा जातीय ध्रुवीकरण आणि धार्मिक अर्थव्यवस्थेचं केंद्र असलेल्या या ऐतिहासिकनगरीमध्ये स्थानिक मुद्दे व त्यांचा स्थानिक उमेदवार हेच सूत्र रामबाण ठरू शकते हे इथं फिरताना समजते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.