नागपूर : पतीचे निधन रस्त्यावरील मोकाट जनावरांमुळे झाले असून, त्याला महापालिका जबाबदार असल्याचा आरोप करीत मृताच्या पत्नीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. सिमरन रामलखानी असे याचिकाकर्त्या पत्नीचे नाव आहे. दहा लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची विनंती त्यांनी याचिकेतून केली आहे.
याचिकाकर्त्यानुसार, त्यांचे पती रामकुमार यांचे 20 जुलै 2018 रोजी अपघाती निधन झाले. दुचाकीने गिट्टीखदान येथून जात असताना रस्त्यावर अचानक मोकाट जनावर गाडीसमोर आले. त्यांची गाडी जनावराला धडकली. रामकुमार रस्त्यावर आदळल्याने डोक्याला जबर दुखापत झाली. त्यांना मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता मृत्यू झाला.
रामकुमार यांचे जरीपटका येथे किराणा दुकान होते. त्यांच्या व्यवसायावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह होता. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यांचा मुलगा व मुलगी लहान असल्याने कुटुंबाच्या पालनपोषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कायद्यातील तरतुदीनुसार, मोकाट जनावरामुळे अपघात झाल्यास स्थानिक प्राधिकरणाला भरपाई देणे बंधनकारक आहे. तेव्हा याचिकाकर्त्यांनी महापालिका व वाहतूक पोलिसांकडे निवेदन सादर केले होते. त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
उच्च न्यायालयाने राज्य सरकार, वाहतूक विभाग आणि महापालिकेच्या आयुक्तांना नोटीस बजावत चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला आहे. याप्रकरणी न्यायमूर्ती रवी देशपांडे आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या समक्ष सुनावणी झाली.
रस्त्यावर मोकाट जनावरांमुळे होणाऱ्या अपघातांची नोंद घेत उच्च न्यायालयानेच महापालिकेला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. शहरातील अशा मोकाट जनावरांना पकडण्याचे व त्या जनावराच्या मालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. परंतु, त्या आदेशाचेही पालन झाले नाही. तेव्हा रामकुमार यांच्या अपघाताला स्थानिक प्रशासन जबाबदार असल्याने दहा लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी विनंती याचिकेत केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.