नागपूर : पांढरीशुभ्र कार दुकानासमोर थांबली. तसा विशीतील युवक कारजवळ येऊन म्हणाला, साहेब नवी गाडी घेतली. कोणाची नजर नको लागायला, आणि त्याने लिंबू मिरची बांधून दिली. मालकाने हलत्या काळ्या धागातील लिंबू मिरचीकडे बघितले. खिशातली १० रुपयाची नोट त्याच्या हातावर टेकवत मालक म्हणाला, अरे प्यारेलाल, त्या दुकानाच्या दरवाजालाही बांध...प्यारेलालने दरवाजालाही लिंबू मिरची बांधली. हातातले पैसे खिशात घालत तो पुढच्या दुकानाकडे निघून गेला.
दुकान, घर किंवा आॅफीस असो अनेक जण कोणाची नजर लागू नये म्हणून मुख्य दारावर लिंबू-मिरची लावतात. यामधून अनेकांना रोजगार मिळतो आहे. लिंबू-मिरची टांगण्याचा हा धंदा कळमेश्वर, पाचगांव, महादुला गुमगांव, देवळी निस्ताने या गावातील पंधरा ते वीस वर्षांच्या युवकापासून तर वयस्कांपर्यंत अनेकजण करतात. त्यांचे पोट लिंबू मिरची टांगण्याच्या या कामातून भरते. यातूनच रोजगार मिळत असल्याची कबुली प्यारेलाल देतो.
कळमेश्वर येथील प्यारेलाल वयाच्या १३ व्या वर्षांपासून दुकानांमध्ये, ऑफीसमध्ये लिंबू मिरची टांगण्याचे काम करतो आहे. याच व्यवसायावर त्यांचे घर चालते. घरातील तिघेजण हे काम करतात. दिवसाला जवळपास अडीचशे दुकान-ऑफिसमध्ये लिंबू टांगण्याचे काम तो करतो. एका लिंबू-मिरचीची किंमत ५ ते १० रुपये असते. प्यारेलाल सांगतो, कळमेश्वरून दहा ते पंधरा मित्र सायकलने नागपूर शहरात येतात. शहरातील विविध परिसर त्यांनी वाटून घेतले आहेत.
नागपूर शहरात सुमारे पाचशेपेक्षा अधिक जण लिंबू मिरची बांधण्याच्या या व्यवसायात असल्याचे त्याने सांगितले.
लिंबू-मिरची का लावतात याचं उत्तर अनेकांना कदाचित माहीत देखील नसेल. बेसा येथील एका दुकानदाराला विचारलं असता, यामुळे दुकानावर कोणाची वाईट नजर पडत नाही. लिंबू नकारात्मक ऊर्जा कमी करते. यामुळे वातावरण सकारात्मक राहतं. ज्या घरात लिंबाचं झाड असतं त्या घरात नकारात्मकता येत नाही, अशी देखील काही लोकांची मान्यता आहे, असे त्याने सांगितले.
लेकराले इंग्रजी शाळेत घातले
पूर्वी एका दिवसाला अडीचशे दुकानात लिंबू मिरची बांधत होतो. लॉकडाउनमुळे सारं संपल. मात्र ॲनलॉनंतर पुन्हा लिंबूमिरची बांधण्याचा व्यवसाय सुरू केला आह आता नियमित नाही, परंतु बऱ्यापैकी लिंबू मिरची वापरात येतात. याच व्यवसायाच्या भरवशावर लेकराले इंग्रजी शाळेत घातले. लेकरु मोठं होईन, सायेब बनलं की, हे सारं टाकून देईल. मात्र कुटुंब जगवण्यासाठी लिंबू मिरची कामी आले, हे मात्र सत्य असल्याची भावना त्याने व्यक्त केली.
संपादन - स्वाती हुद्दार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.