ते लहान मुलं आणि महिलांसह महागडे कपडे घालून आले अन्‌...

arrested gang of interstate thieves in Nagpur
arrested gang of interstate thieves in Nagpur
Updated on

नागपूर : लग्नसोहळ्यात चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय चोरट्यांच्या टोळीला गजाआड करीत गुन्हेशाखेच्या पथकाने हॉटेल सेंटर पॉइंटमधील चोरीचा पर्दाफाश केला. महागडे कपडे परिधान करून येणाऱ्या महिलेसह टोळीतील तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीचा पाच लाख 14 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. गतवर्षीपासून शहरात सात ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली चोरट्यांनी दिली. 

सनी छायल (32), मोहित महेंद्रसिंह (26) आणि बंबाबाई सिसोदिया (45) अशी आरोपींची नावे असून, अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. सर्व जण मध्य प्रदेशच्या राजगढ जिल्ह्यातील कडिया येथील रहिवासी आहेत. छोट्या मुलाच्या मदतीने लग्नसोहळ्यांमधून प्रमुख नातेवाइकाची बॅग, पर्स किंवा जमा होणाऱ्या पैशाचे पाकीट चोरून नेतात. 

नऊ फेब्रुवारीला डॉक्‍टर मुलीचा लग्नसोहळा हॉटेल सेंटर पॉइंटमध्ये पार पडला. आयपीएफ अधिकाऱ्यांसह हायप्रोफाईल मंडळी सोहळ्यात सहभागी झाली होती. नवऱ्या मुलीच्या वहिनीची पर्स चोरट्याने लंपास केली होती. पर्समध्ये रोख, सोने, हिऱ्याच्या दागिन्यांसह पाच लाख 14 हजारांचा मुद्देमाल होता.

सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला. गुन्हेशाखेच्या पथकानेही समांतर तपास सुरू केला होता. सीसीटीव्ही फुटेजसह तांत्रिक बाबींचे विश्‍लेषण करीत पोलिस आरोपींपर्यंत पोहोचले. त्यांच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त केला. चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलाने सात वर्षांपूर्वी राजवाडा पॅलेसमध्येही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. 

एकाच गावात अनेक टोळ्या

मध्य प्रदेशातील कडिया गाव चोरट्यांच्या टोळ्यांमुळे कुख्यात आहे. अनेक युवक स्वतंत्र टोळ्या चालवितात. पोलिस आल्यास महिला समोर येऊन दगडफेक करतात तर पुरुष पळून जातात. यामुळेच गावात कारवाईसाठी जायचे असेल तर किमान शंभर जण लागतात, असे स्थानिक पोलिस सांगतात. 

सीसीटीव्हीमुळे सुगावा

हॉटेलमधील आणि बाहेरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींचे चेहरे आणि कृत्य स्पष्टपणे दिसले. त्यानुसार तांत्रिक पद्धतीने त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात आले. चोरीनंतर ते पुण्याला गेले. तिथून पुन्हा नागपुरात परतल्यानंतर त्यांना मोठ्या ताजबाग परिसरातून ताब्यात घेण्यात आले. 

चोरीची पद्धती सारखीच

टोळीची चोरी करण्याची पद्धती दरवेळी एकसारखीच असते. लहान मुलासह सर्वजण महागडे कपडे परिधान करून लग्नसोहळ्यात सहभागी होतात. कधीच एकमेकांशी बोलत नाहीत. केवळ इशाऱ्यावर काम चालते. मुलाचे लक्ष्य सतत पैशांच्या इन्व्हलपकडे असते. उर्वरित चोरटे वधू-वरांच्या आई-वडिलांकडील पर्स किंवा बॅगवर लक्ष ठेवतात. ठरलेले टार्गेट उचलण्याचा मुलाला इशारा केला जातो. तो चोरी करून बाहेर पडतो. त्याच्या पाठोपाठ बाकीचेही बाहेर येतात. मुलगा टोळीप्रमुखाकडे मुद्देमाल सोपवतो. तिथून सर्वजण निघून जातात. नागपुरात जानेवारी 2019पासून आतापर्यंत अगदी अशाच पद्धतीने चोरीच्या 17 घटना नोंदविल्या गेल्या आहेत.

देशभरात चोऱ्या

टोळ्या गावातून निघून देशातील कोणत्याही मोठ्या शहरांमध्ये पोहोचतात. भव्य हॉल आणि लॉनवर ते लक्ष केंद्रित करतात. चोरी करताच ते पुढे निघून जातात. एकदा वापरलेला मोबाईल ते परत वापरत नाही. 

महिला, मुलांचा केवळ वापर

युवकच टोळीचे संचालन करतात. महिला व मुलांचा केवळ वापर करून मिळकतीनुसार मोबदला दिला जातो. महिला सोबत असल्याने रूम सहजतेने मिळते आणि ती स्वयंपाकही करते. मुलाचे काम केवळ महागडी वस्तू उचलण्याचे असते. अटकेतील चोरट्यांनीही महिलेला पुढे करून मोठा ताजबाग परिसरात रूम मिळविली होती. येथूनच त्यांना ताब्यात घेण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.