नागपूर : राजकीय वजन वाढत असल्यामुळे वर्चस्वाच्या वादातून एका गॅंगने भारतीय जनता पक्ष युवा मोर्च्याच्या शहर उपाध्यक्षाचा गळा चिरून खून केला. ही थरारक घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास भूतेश्वरनगरात घडली. राज विजयराज डोरले (वय 28, रा. भूतेश्वरनगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या हत्याकांडात दोघांना अटक करण्यात आली. हा राजकीय वर्चस्वातून "गेम' केल्याची शहरात चर्चा आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज डोरले भारतीय जनता युवा मोर्चाच्या शहर उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते. त्यामुळे त्यांचे भाजपा पक्षात वजनही होते. त्यांचे वर्चस्व अनेकांनी खटकत होते. गेल्या काही दिवसांपूर्वी राजचा मित्र सारंग बावनकुळे याच्याशी आरोपी मुकेश निळकंठ नारनवरे (वय 30, रा. भूतेश्वरनगर) याचा वाद झाला होता. त्यावेळी मुकेशने सारंगला जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे राज डोरले यांनी सारंगच्या पाठीशी उभे राहून मुकेशला दम भरला होता.
त्यावेळी मुकेशने माघार घेत राजला पाहून घेण्याची धमकी दिली होती. तेव्हापासून मुकेश आणि राज डोरलेमध्ये धुसफूस सुरू होती. सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास राज डोरले दुचाकीने घरी जात होते. भूतेश्वरनगर चौकात सापळा रचून बसलेल्या मुकेश नारनवरे, अंकित विजयराज चतुरकर (वय 28, भूतेश्वरनगर) आणि त्यांच्या पाच ते सहा साथीदारांनी राज डोरले यांना घेरले.
त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकले. त्यानंतर आरोपींच्या टोळीने राज डोरले यांच्यावर अचानक हल्ला केला. मुकेशने राजचा थेट गळा चिरला. राज यांना रक्ताच्या थारोळ्यात लोळवून आरोपींनी पळ काढला. घटना उघडकीस येताच कोतवाली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. आरोपीविरूद्ध गुन्हे दाखल करून दोन आरोपींना अटक केली.
राज डोरले यांनी अल्पावधीतच महाल, भूतेश्वरनगरात वर्चस्व स्थापन केले होते. गणेशोत्सव आणि दुर्गोत्सवादरम्यान राज डोरलेचा जलवा राहत होता. लॉकडाऊन काळात तर रेशन वाटप, फूड पॅकेट वाटप आणि धान्य किट वाटपही केले होते. दिवसेंदिवस राज लोकप्रिय होत होते. भविष्यात राज डोरले मोठा नेता होऊ शकतो, म्हणून काही कार्यकर्ते त्याचे पाय ओढत होते. डोरले मोठा होऊ नये म्हणून त्याचा काटा काढण्यात आल्याची चर्चा आहे.
राज डोरले मनमिळावू स्वभावाचा होता. मात्र, त्याने सारंग बावनकुळे या मित्रासोबत वाद घालणाऱ्या मुकेश नारनवरे सोबत पंगा घेतला होता. दोघांनीही एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली होती. तेव्हापासून मुकेश हा स्वतःचा गेम होऊ नये म्हणून अंकित चतुरकर, विक्की, शुभम, सागर आणि कार्तिक या युवकांची टोळी बनवून राहत होता.
राज डोरले आणि सारंग बावनकुळे यांच्याशी मुकेश नितनवरे यांच्यात चांगली हाणामारी झाली होती. हे प्रकरण कोतवाली पोलिस ठाण्यात पोहचले होते. पोलिसांनी तिघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करीत फाईल बंद केली होती. त्यामुळे कोतवाली पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे राज डोरले हत्याकांड घडल्याची चर्चा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.