कामठी (जि. नागपूर) : ग्रामीण भागातील विकासाचा कणा समजल्या जाणाऱ्या तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे. त्यामुळे बोचऱ्या थंडीच्या मंद हवेत कुठे शेकोटीची तर कुठे आडोशाचा आधार घेत राजकीय गप्पा गोष्टींना उधाण येत आहे. या निवडणुकीत तरी आपलाच उमेदवार निवडून आला पाहिजे याच गोष्टींचा निष्कर्ष जागोजागी निघत आहे.
तालुक्यात भामेवाडा, टेमसना, पावनगाव, कोराडी, घोरपड, लोणखैरी, केसोरी, खेडी, महालगाव या नऊ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या नऊ ग्रामपंचायतींच्या ३१ प्रभागातील ८७ सदस्यांसाठी २१ हजार १२५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात १० हजार ७७५ पुरुष व १० हजार ३५० महिला मतदार ३६ मतदान केंद्रावरून मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
नऊही ग्रामपंचायतींमध्ये आमदार, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकाऱ्यांसह विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते निवडणुकींच्या तयारीला लागले आहेत. निर्वाचन आयोगाने १५ जानेवारीला मतदान करण्याची तारीख निश्चित केली आहे. या निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी ग्रामीण भागातील जनतेशी ज्या उमेदवाराची जास्तीत जास्त संपर्क जास्त आहे, त्याची नाळ जुळलेली असणे गरजेचे आहे.
केवळ निवडणुकीच्या काळातच जनसंपर्कांचे हत्यार उपसून मते मागणाऱ्यांना जनतेने पराभूत केले आहे. हे सुध्दा विसरता कामा नये. त्यामुळे सामाजिक कार्य, लग्न, मरण किंवा एखाद्या समाजाचे मोठे काम करून देण्याचा प्रयत्न राजकीय नेत्यांकडून केला जात आहे.
त्याचप्रमाणे मागील निवडणुकीत आपल्या पॅनलचा उमेदवार का पराभूत झाला, याची कारणे पक्षश्रेष्ठींना समजावून सांगण्यासाठी इच्छुकांच्या वाऱ्या नेत्यांच्या दरबारी सुरू झालेल्या आहेत. निवडणुकीत मला आपल्या पॅनलमधून संधी दिल्यास माझा विजय सहज होऊ शकतो, याचे उदाहरणासह महत्व पटवून दिले जात आहे.
बसस्टॅंड, चौकातील पानटपरी, हॉटेल, शेतात आदी ठिकाणी बसल्या बसल्या निवडणुकीच्या गोष्टी चर्चेस येत आहेत. दुसरीकडे नव्याने राजकारणात उतरलेल्या इच्छुक युवक व शिक्षित उमेदवारांनी जनसंपर्कात दमदार आघाडी घेतल्याने अनेकांच्या छातीत धडकी भरली आहे.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तरुणांनी राजकारणाला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे यांच्या चळवळीला विसरता कामा नये. परिणामी ग्रामपंचायत निवडणुकीत तरुणांनी राजकारणात नव्यानेच पदार्पण करणाऱ्यांना स्थान देते की, जुनेच राजकारण कायम ठेवते, हे सुध्दा महत्वपूर्ण ठरणार आहे.
कामठी तालुक्यात दिवसा इच्छुक उमेदवार तथा त्यांचे कार्यकर्ते नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. खरी मजा ग्रामीण भागात येत आहे. ग्रामीण भागातील गावातीलच उमेदवार व तिथलाच मतदार असल्याने मागील निवडणुकीचे किस्से सांगितले जात आहेत. त्याचप्रमाणे कधीही कुठल्याही शेकोटीवर उभे न राहणारे मुद्याम शेकोटीचा आधार घेऊन जनसंपर्क वाढवीत आहेत.
काही गावात तर आम्ही तुमच्या उमेदवाराला मतदान करतो, तुम्ही आम्हाला मदत करा, असे आश्वासन देखील दिले जात आहेत. तर काही प्रभागामध्ये आतापर्यंत आम्ही केवळ मतदान करण्याचेच काम केलेले आहे. त्यामुळे या निवडणुकीत आम्हाला संधी द्या, अशी तोंडी आश्वासने घेतली जात आहेत. मागील वर्षी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत अमक्याने आपल्या पक्षाच्या उमेदवाराचे काम न करता विरोधी पक्षाच्या उमेदवाराचे काम केल्याचे गावातील मतदारांना पटवून दिले जात आहे.
संपादन - नीलेश डाखोरे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.