नागपूर : आयुक्त खोटे बोलत आहेत, त्यांनी काल्पनिक कथा रंगविल्या अशा विविध आरोपांना खोडून काढत महापालिका आयुक्त तुकाराम मुढे यांनी "मी खोटारडा नाही, जे केले नियमानुसारच केले', असे रोखठोक प्रत्युत्तर सभागृहात दिले. प्रतिबंधित क्षेत्राबाबत स्पष्टीकरण देताना आयुक्तांनी आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच निर्णय घेतल्याचे सांगितले. केटीनगर रुग्णालयाच्या निविदाही नियमाप्रमाणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चार दिवसांपासून आरोपांच्या फैरी सहन करीत असलेले आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सभागृहात बिनधास्तपणे प्रत्येक सदस्यांच्या प्रश्नांचे उत्तर दिले. प्रतिबंधित क्षेत्राबाबत आयसीएमआरच्या (इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रक्रिया केल्याचे त्यांनी नमूद केले. याबाबत वेळोवेळी मार्गदर्शक तत्त्वात बदल झाले. ज्या भागात कोरोनाबाधित सापडला, त्याच्या निवासस्थानापासून तीन ते पाच किमी परिसर प्रतिबंधित करण्याचे निर्देश होते. मात्र, त्यातही नागरिकांना दिलासा देत परिसर कमी केला.
जीवनावश्यक वस्तू सोडून सर्व दुकाने बंद करण्याचे निर्देश नमूद आहेत. प्रतिबंधित क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानांना त्या परिसरातील नागरिकांना धान्य देण्यासंदर्भात अन्न व पुरवठा विभागाला निर्देश दिले होते, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. विलगीकरण केंद्रात जेवण, स्वच्छता, प्रसाधनगृहे, लाईट आदी सुविधा केल्या. घरीच विलगीकरण नागरिकांनी पाळले नाही. त्यामुळे त्यांना सामूहिक विलगीकरण केंद्रात पाठविण्यात आले. विलगीकरण केंद्रातून कोरोना वाढल्याचा आरोपही त्यांनी उदाहरणासह खोडून काढला.
विलगीकरण केंद्रातील नागरिकांच्या जेवणावरील खर्चही त्यांनी सभागृहात मांडला. दोन मेपासून महापालिकेकडे विलगीकरण केंद्राची जबाबदारी आली. 25 मेपर्यंत प्रतिव्यक्ती 159 याप्रमाणे 75 लाखांचा खर्च झाल्याचे ते म्हणाले. त्यानंतर राधास्वामी सत्संग मंडळाने मोफत जेवणाची तयारी दर्शविली. परंतु चहा, बिस्किटे, पाणी यासाठी प्रतिव्यक्ती 52.47 रुपये खर्च आला. यासाठी 32.28 लाख तर प्लेटवर 7 लाख 81 हजारांचा खर्च आला.
गादी, चादर, उशी, ग्लाससाठी निविदा काढली. आपत्कालीन स्थितीत निविदा प्रक्रिया 24 तासांची करण्याबाबत नियम आहे. मात्र, त्यासाठीही 48 तासांचा अवधी वापरण्यात आला. सामान्यपणे घरी जे जेवण करतो, तेच जेवण लोकांना दिले. विलगीकरणातील नागरिकांना "लक्झरी' सुविधा देणे परवडण्यासारखेही नाही. विलगीकरण केंद्रात संशयित रुग्ण असल्याने कर्मचारी जायला घाबरत असल्याने स्वच्छता स्वतःलाच करणे अभिप्रेत होते, असेही त्यांनी सांगितले.
एका अहवालानुसार मेमध्ये दररोज 1,200 रुग्ण वाढतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. त्यामुळे राधास्वामी सत्संग मंडळाच्या मदतीने पाच हजार क्षमतेचे कोव्हिड सेंटर उभारले. ऑक्सिजनची सोय असलेले 3,600 बेडची गरज होती. यात चारशे ते पाचशे बेड कमी पडत होते. त्यामुळे पाच रुग्णालयांत साडेचारशे बेड तयार करण्यात आल्याचे आयुक्तांनी नमूद केले.
बांगलादेश परिसरात 16 बाधित रुग्ण सापडल्यानंतर तेथील लोकांनी विलगीकरणात जायची तयारी दाखविली. त्याचवेळी त्या नागरिकांनी ज्या लोकांनी बिर्याणी पार्टी केली, आधी त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी अधिकाऱ्यांकडे केली. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग महानगरपालिकेची टीम करते पोलिस नाही. त्यामुळे पोलिसांना त्याची माहिती नसावी, असेही ते म्हणाले.
31 मार्चपर्यंत महापालिकेवर 2,121 कोटींचे कर्ज आहे. विकासकामे बंद करण्यामागे पैसा नाही, एवढेच कारण आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. विकासकामे बंद करण्याबाबत आदेश काढले नाही. परंतु, सभागृहात तसे निवेदन केले आहे. याशिवाय विविध बैठकांतून नियमानुसार निर्देश दिले. मात्र, आयुक्त कर्जाचे वर्गीकरण करीत असतानाच सदस्यांनी त्यांच्या वक्तव्यात अडथळा आणला.
शहरात मृत्यूदर कमी असल्याचेही नमूद करीत आयुक्तांनी विलगीकरण केंद्र आणि कोविड केअर सेंटर तयार करण्याचा निर्णय एकट्याने घेतला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विभागीय आयुक्त, पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी, मेयो, मेडिकलचे अधिष्ठाता यांच्याशी चर्चा करूनच सर्वानुमते निर्णय घेतल्याचेही त्यांनी सभागृहाला सांगितले.
मनोरुग्ण कैसर परवीन यांच्या कुटुंबीयांना क्वारंटाइन करताना कैसर परवीनला तीन दिवस डांबून ठेवल्याच्या आरोपावर मुंढे म्हणाले, एएनएम तेजस्विनी शेंडे रोज त्यांच्या घरी भेट देत होत्या. मनोरुग्ण असल्या तरी त्या स्वतः स्वयंपाक करू शकतात. त्यांना काहीही अडचण गेली नसल्याचे त्यांचे शेजारी देवांगण यांनी सांगितल्याचे वास्तव मुंढे यांनी मांडले.
सदस्यांनी मोमिनपुरा, सतरंजीपुऱ्यातील प्रतिबंधित क्षेत्र, गंटावर डॉक्टर दाम्पत्य, खामल्यात वाढलेले रुग्ण, दिल्लीवरून आलेले नागरिक आदी प्रश्नांवर आयुक्तांनी विस्ताराने माहिती दिली. गेल्या चार दिवसांपासून केलेल्या प्रत्येक आरोप खोडून काढत त्यांनी सत्ताधाऱ्यांना गप्प करण्याचा प्रयत्न केला.
चार दिवसांपासून सुरू असलेल्या सभागृहात सदस्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणारे आयुक्त तुकाराम मुंढे निवेदन करीत असताना सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी "पॉइंट ऑफ ऑर्डर' घेतला. त्यामुळे अनेक बाबींवर विस्तृतपणे प्रकाश टाकणे आयुक्तांना कठीण झाले. आयुक्तांच्या भाषणात अडथळ्यावरून सत्ताधारी व विरोधकांत चकमकही झाली. विरोधकांनी सभात्याग केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.