नागपूर : कोरोनाची दहशत वाढली आहे. ९० टक्के रिकव्हरी रेट असताना मला कोरोना झाला. आता माझा मृत्यू होईल, माझ्या कुटुंबाची सुरक्षा कोण करेल? असे विचारांचे काहूर मनात घर करून बसते. परिणामी, सामान्य कोरोनाबाधित नैराश्यात जात आहेत. यातूनच आत्महत्येचे विचारही मनात येतात. जनता कोरोना फोबिया या मानसिक आजाराच्या विळख्यात अडकत आहे. यातून बाहेर काढण्यासाठी एम्सच्या धर्तीवर मेडिकल आणि मेयोत ‘मनोधैर्य क्लिनिक’ ही संकल्पना राबवण्यात यावी, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
सहा महिन्यांपूर्वी अकोला आणि नाशिक, औरंगाबाद येथे कोरोनाबाधितांनी आत्महत्या केल्या. यापाठोपाठ नागपुरात ३० मार्च रोजी दोन ज्येष्ठ कोरोनाबाधित नागरिकांनी आत्महत्या केली. या पार्श्वभूमीवर एम्समध्ये तयार करण्यात आलेले ‘मनोधैर्य क्लिनिक’मधील उपक्रमाबाबत माहिती जाणून घेण्यासाठी एम्सचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्याशी संवाद साधला.
कोरोनाविषयी समाज माध्यमावर असंख्य पोस्ट्स फॉरवर्ड होत आहेत. कोरोनावरील उपचाराच्या औषधांपासून तर टीव्हीसमोर बसून इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमातील कोरोनाच्या आकडेवारीचा मांडलेला खेळ, यामुळे जनतेच्या मनात प्रचंड भय निर्माण झाले आहे. सामान्यतः सर्दी, खोकला असलेले नागरिकही डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी रांगा लावत आहेत, असे डॉ. मनीष श्रीगिरीवार म्हणाले.
कोरोनाबाधेतून मुक्त झालेल्या नागरिकांकडून कोरोनातून बरा कसा झाला, यासंदर्भातील अनुभव कथन तसेच मानसोपचार तज्ज्ञ यांचे कोरोना आजाराबाबत समुपदेशन सुरू करण्यात आले. विशेष असे की, हा सारा उपक्रम एम्सच्या संचालक डॉ. विभा दत्ता यांच्या मार्गदर्शनात अतिशय योग्यरीत्या सुरू आहे.
कोरोनाविषयी सातत्याने कानावर ‘पॅनिक अटॅक’ करणारे विचार आदळत आहेत. हाच धागा पकडून समाजाचे समुपदेशन करण्यासाठी एम्समध्ये मनोधैर्य क्लिनिक तयार केले. तसे क्लिनिक मेयो, मेडिकलमध्ये मनोधैर्य क्लिनिक तयार करण्यात यावे, असे डॉ. मनीष श्रीगिरीवार म्हणाले.
कोरोना हा सामान्य आजारासारखा आजार
कोरोना हा सामान्य आजारासारखा आजार आहे. तो ९८ टक्के बरा होतो. सकारात्मक गोष्टींवर विचार करा, मन प्रसन्न ठेवा. मनात नैराश्य येऊ देऊ नका. मनात असे विचार येत असतील तर एम्समध्ये मनोधैर्य क्लिनिकमध्ये यावे किंवा आपल्या जवळच्या मित्रांशी संवाद साधावा, ही भूमिका एम्समधील मानसोपचार तज्ज्ञ जबाबदारीने पार पाडत आहे.
- डॉ. मनीष श्रीगिरीवार,
वैद्यकीय अधीक्षक, एम्स, नागपूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.