कोरोनाचा धोका वाढतोय! बाधितांच्या संपर्कात आल्यास करा चाचणी, अन्यथा संपूर्ण सोसायटी विलगीकरणात

corona patients increase in nagpur
corona patients increase in nagpur
Updated on

नागपूर : गेले काही आठवडे आटोक्यात असलेला कोरोना पुन्हा एकदा वेगात पसरत आहे. गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसांत ८०० पेक्षा जास्त रुग्ण आढळून आल्याने महानगरपालिकेचे टेन्शन वाढले आहे. नागरिकांनीही सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष केल्याने बाधितांची संख्या वाढत आहे. आयुक्त राधाकृष्ण बी. यांनी आज तातडीची बैठक घेऊन हयगय करणाऱ्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. 

गुरुवारी शहरात ४४५ बाधित आढळून आल्याने महापालिकेसह आरोग्य यंत्रणा चांगलीच हादरली. आज महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी व्यापारी, दुकानदारांसोबत तातडीने बैठक घेतली. दुकानांमध्ये पाचपेक्षा जास्त नागरिक दिसल्यास कारवाईचा इशारा त्यांनी दिला. दुकान व प्रतिष्ठानांसंदर्भात पुढील १० दिवसांचा 'वर्क प्लॅन' तातडीने मनपाकडे सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी व्यापाऱ्यांना दिले. एवढेच नव्हे बाधितांच्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी न केल्यास संपूर्ण सोसायटीला विलगीकरणात ठेवले जाईल, असेही त्यांनी नमुद केले. सुरक्षेत हयगय केली जात असल्याने धोका वाढत असल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले. मास्क, सॅनिटायजर, सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छ हात धुणे याकडे दुर्लक्ष झाल्याने संख्या वाढल्याचे त्यांनी नमूद केले. 

व्यापारी संघटना, हॉटेल व्यावसायिक आदींनी त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांची महिन्यातून एकदा नियमित कोरोना चाचणी करावी. दुकान व प्रतिष्ठानांसंदर्भात पुढील १० दिवसांचा 'वर्क प्लॅन' तातडीने मनपाकडे सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी व्यापाऱ्यांना दिले. 

हलगर्जीपणा करणाऱ्यांवर 'ऑन द स्पॉट' कारवाई - 
मागील काही दिवसात शहरात सर्वत्र हलगर्जीपणा दिसून येत आहे. बाजारात होणारी गर्दी, मास्क लावणे, दुकानापुढे सॅनिटाजरकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. मनपाने उपद्रव शोध पथक आणि पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेद्वारे दुर्लक्ष करणाऱ्यांवर 'ऑन द स्पॉट' कारवाई केली जात असल्याचे आयुक्त म्हणाले. 

हे परिसर ठरताहेत नवे हॉटस्पॉट' - 
शहरात खामला, स्वावलंबीनगर, जयताळा, अयोध्या नगर, न्यू बिडिपेठ, वाठोडा, दिघोरी, जरीपटका, जाफरनगर भागांमध्ये बाधितांची संख्या जास्त आहे. या परिसरातील नागरिकांनी सुरक्षेची काळजी घेत सतर्क राहणे गरजेचे आहे. नागरिकांनी लक्षणे दिसण्याची वाट न पाहता जवळच्या कोविड चाचणी केंद्रात मोफत चाचणी करून घ्यावी, असे आवाहन आयुक्तांनी केले. 

ग्रामीण भागातही फैलाव - 
नागपूर ग्रामीण, सावनेर, कामठी, हिंगणा तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा दर वाढत आहे. हिंगणा, कळमेश्वर, नागपूर, नरखेड, रामटेक व उमरेडमध्ये मृत्यू संख्याही जास्त आहे. 

शारजावरून येणाऱ्यांना पाठविणार विलगीकरण केंद्रात - 
गेल्या काही दिवसांत बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे मनपाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली. पुढील तीन आठवड्यात शारजावरून नागपुरात विमान येणार असून यातील प्रवाशांना विलगीकरण केंद्रात पाठविण्यात येणार आहे. केवळ वृद्ध, लहान मुले व दिव्यांगांना गृह विलगीकरणाची सवलत देण्यात आली आहे. नागपुरात शारजाहून येणाऱ्या विमानातील प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणात पाठविण्यात येणार असल्याचे आदेश आज मनपाने काढले. शारजा-नागपूर-शारजा हे आंतरराष्ट्रीय विमान १४ फेब्रुवारी, २१ फेब्रुवारी, २८ फेब्रुवारी रोजी नागपुरात येणार आहे. १४ फेब्रुवारी रोजी पहाटे ३.४५ वाजता विमान नागपूर विमानतळावर येणार आहे. यातील प्रवाशांची माहिती घेऊन त्यांना विलगीकरण केंद्रात पाठविण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()