नागपूर : विदेशातून आलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्याला होम क्वारेंटाइन करण्यात आले होते. यानंतरही त्याने रेल्वेतून प्रवासाचे धाडस केले. त्याच्या हातावर क्वारेंटाईनचा स्टॅम्प दिसताच त्याला रेल्वेतून उतरवून ताब्यात घेण्यात आले. चौकशी केल्यानंतर त्याला पुढील तपासणीसाठी आमदार निवासातील विलगीकरण केंद्रात नेण्यात आले. या घटनेमुळे तामिळनाडू एक्स्प्रेसमध्ये दहशत निर्माण झाली.
विजयवाडा येथील रहिवासी असलेला हा 20 वर्षीय संशयित युवक मॉस्को (रशिया) येथे एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. कोरोनाच्या उद्रेकानंतर तो शनिवारी रशियाहून मायदेशी परतला. नवी दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर तिथे त्याचे "थर्मल स्क्रीनिंग' झाले व हातावर क्वारेंटाइनचा शिक्का लावण्यात आला. त्यानंतर सावधगिरीचा उपाय म्हणून त्याला "होम क्वारंटाइन' अर्थात घरी एकांतवासात राहण्याचा सल्ला देण्यात आला.
त्यामुळे तो नवी दिल्ली-चेन्नई तमिळनाडू एक्स्प्रेस पकडून विजयवाडा येथील आपल्या घराकडे जाण्यासाठी निघाला. रेल्वे नागपूरच्या दिशेने जात असताना इटारसीच्या अगोदर त्याच्या हातावर क्वारेंटाइनचा शिक्का अन्य प्रवाशांना दिसला. त्यानंतर रेल्वे पोलिसांना सूचना देण्यात आली. लगेच नागपूर स्थानकावर त्याला ताब्यात घेण्यासाठी धावाधाव सुरू झाली. पोलिस, ऍम्ब्युलन्ससह सर्वांना सतर्क करण्यात आले.
दुपारच्या सुमारास रेल्वे नागपूर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक दोनवर थांबल्यानंतर प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बी-2 कोचला पोलिस व डॉक्टरांनी गराडा घालून त्या संशयित प्रवाशाला त्याच्याजवळील सामानासह डब्यातून खाली उतरविले. डॉक्टरांनी त्याची सविस्तर चौकशी करून प्रवासाचा इतिहास जाणून घेतला व पुढील तपासणीसाठी ऍम्ब्युलन्सद्वारे आमदार निवासातील विलगीकरण केंद्रात नेण्यात आले. हा प्रवासी असलेल्या तमिळनाडू एक्स्प्रेसचा संपूर्ण डबा सॅनिटायझेशनद्वारे स्वच्छ केल्यानंतर गाडी पुढच्या प्रवासाला रवाना झाली. या डब्यात 60 हून अधिक प्रवासी होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.