नागपूर ः दोन दिवसाच्या गोंधळानंतर तिसऱ्या दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या चारही टप्प्यातील परीक्षा सुरळीत पार पडल्या. यामुळे विद्यापीठाला थोडाफार दिलासा मिळाला आहे.
विद्यापीठाच्या अंतिम सत्राच्या परीक्षांची सुरुवात ८ ऑक्टोबरपासून झाली. मात्र, पहिल्याच दिवशी विद्यापीठाच्या ॲपबाबत तांत्रिक अडचणी आल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिल्याचे दिसून आले. यानंतर सलग दुसऱ्या दिवशी विद्यापीठाचे सर्व्हर बसल्याने तीन टप्प्यातील परीक्षा स्थगित करण्यात आल्यात. यामुळे विद्यापीठाची चांगलीच नाचक्की झाली. मात्र, दोन दिवस झालेल्या चुकांमधून धडा घेत, विद्यापीठाने सर्व्हरसह इतर सगळ्या समस्यांचे समाधान शोधून काढीत, आज नव्या जोमाने परीक्षा घेण्यास सुरुवात केली.
दरम्यान चारही टप्प्यातील परीक्षा सुरळीत पार पडल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले. यावेळी दुसऱ्या टप्प्यातील बीएच्या परीक्षेदरम्यान काही विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्याच्या भाषेत बदल झाल्याने त्रास सहन करावा लागला. मात्र, विद्यापीठाने काही वेळातच ही समस्या सोडविली.
यानंतर काही विद्यार्थ्यांना लॉगीन करण्यात समस्या आल्याचे दिसून आले. त्यातही विद्यापीठाने तातडीने काम करीत समस्या दूर केल्यात. एकंदरीत, आजचा दिवस विद्यापीठासाठी चांगला निघाल्याने अधिकारी आणि कर्मचारी सुखावले. आज पहिल्या टप्प्यात १९१, दुसऱ्या टप्प्यात ४८०, तिसऱ्या टप्प्यात १६८१ तर चौथ्या टप्प्यात ६८० विद्यार्थी अशा एकूण ३ हजार ३२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना ॲपमध्ये लॉगीनसाठी वेळ लागत असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे परीक्षा जवळपास दहा ते पंधरा मिनिटे उशिरा सुरू होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे सोमवारी होणाऱ्या परीक्षेपासून परीक्षा १५ मिनिट आधीपासून सुरू करणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले. त्यामुळे सर्व्हरवर येणारा भार कमी होण्यास मदत मिळणार असल्याचेही ते म्हणाले.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.