पारशिवनी (जि. नागपूर) : दोन फेब्रुवारीला काळापाटा येथील हर्षदा या नऊ वर्षीय चिमुकलीला आमिष दाखवून पळवून नेण्याची घटना भरदुपारी घडली. त्या घटनेतील आरोपींचा अद्याप शोध लागला नाही. दुसरी घटना चार फेबृवारी पारशिवनी तालुक्यातील धुधसी गावातील आहे. घरी कुणी नसल्याचे पाहून अज्ञात इसमाने १६ वर्षीय मुलीला पळविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. यावरून तालुक्यात मुले-मुली पळवणारी टोळी सक्रिय झाल्याचे दिसून येते. त्यामुळे परिसरात दहशत पसरली आहे.
धुधसी येथील सोळा वर्षीय भाग्यश्री शालिकराम खडसन ही मुलगी घरी एकटी जेवण करीत असताना अज्ञात व्यक्ती घरी येऊन ‘मी शाळेतील अधिकारी आहे. तुझे शाळेत काम आहे’, असे म्हणून सोबत चालण्यास सांगितले. माहुली येथील मुलीलाही सोबत न्यायचे आहे. तू पण चल, असे सांगून तिला सोबत चालण्यास प्रवृत्त केले. मुलगी जाण्यास तयार झाली. पण, अचानक शंका आल्याने मी आपल्या भावास जात असल्याचे मोबाईलवर सांगतो असे म्हटले. तेवढ्यात हा अज्ञात इसम मुलीच्या घरून पळून गेला. मुलगी त्याच्यासोबत न गेल्याने अपहरण करण्यात यश आले नाही.
दुपारी ग्रामीण भागातील नागरिक शेतात कामाला जातात. लहान मुले-मुली घरी राहतात. नेमकी हीच संधी साधून मुले-मुली पळविणारे खेड्यात प्रवेश करून अपहरण करण्यात यशस्वी होत आहेत. अज्ञात व्यक्ता घरी कुणी नसल्याचे पाहून घरात प्रवेश करतात आणि कुठलेही कारण वा प्रलोभन देण्याचा प्रयत्न करुन मुलीला पळविण्याचा डाव साधतात.
त्यामुळे खेड्यात येणाऱ्या अज्ञात व्यक्तींसोबत लहान मुला-मुलींनी संवाद साधू नये, तसेच गावात फिरताना अज्ञात व्यक्तीवर शंका आल्यास त्याची गावातील नागरिकांनी चौकशी करणे अत्यावश्यक आहे. अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने ग्रामीण भागात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
कुणासोबतही बाहेर जाऊ नका
मुलींनी कुठल्याही अनोळखी इसमांसोबत संवाद साधू नये. त्याच्या मोटरसायकलवर बसू नये. शंकास्पद इसम गावात फिरत असल्यास लागलीच पोलिसांना माहिती द्यावी. मोटरसायकल अथवा चारटाकी वाहणाच्या नंबरची नोंद करावी. शक्य असल्यास आपल्या मोबाईलमध्ये त्याची फोटो अवश्य द्यावी. अज्ञात व्यक्तीला आपण ओळखत नसल्यास त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे खाऊ, पदार्थ घेऊ नये. घरातील माहिती देऊ नये. आई-वडिलांनी मुलांना सूचना दयाव्या. कुणासोबतही बाहेर जाऊ नये.
- संतोष वैरागडे,
पोलिस निरिक्षक, पारशिवनी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.