नागपूर : आठ दिवसांवर दिवाळी येऊन ठेपल्याने बाजारात नागरिकांची गर्दी वाढत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांनी सवलतींची खैरात चालवली आहे. खऱ्या अर्थाने रविवारी (ता. ८) खरेदीचा सुपर संडे ठरणार असल्याचे चित्र आहे.
कोरोनामुळे बाजारात चैतन्य गायब झाले आहे. तरी गरजेनुसार ग्राहक खरेदीसाठी बाजारात येतील. त्यामुळे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ पूर्णपणे सजली आहे. ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांबरोबर इतर महत्त्वाच्या ठिकाणी कपडे, आकाशकंदील, फटाके, पणती, रांगोळी, सुगंधी तेल आदींचे स्टॉल मोठ्या प्रमाणात उभारले आहेत. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे.
नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दिवाळी आल्याने गृहिणींना फराळ तयार करण्यासाठी वेळ कमी मिळाला आहे. त्यामुळे यंदा रेडिमेड फराळावर ताव मारणाऱ्यांसाठी गृहउद्योग फराळाच्या तयारीला वेग आला आहे. या व्यवसायात अनेक बचत गट सहभागी झालेले आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिला सुरक्षेच्या दृष्टीने घरीच फराळ तयार करणार असल्याने या बचत गटांची उलाढाल मंदावण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या काळात घराच्या बाहेर न पडलेला ग्राहक आता बाजारात खरेदीसाठी सुरक्षेचे पालन करून निघाला आहे. बाजारात ग्राहकांच्या तोंडावर मास्क दिसत आहे. अनेक दुकानदारांनी मास्क नसेल तर ग्राहकांना मास्क देण्याची सोय केली आहे. इतवारी, महाल, सक्करदरा, धरमपेठ, गांधी बाग, सदर, गोलबाजार, कडबी चौक आदी परिसरात ग्राहकांची खरेदीसाठी वर्दळ वाढली आहे असे कॅटचे अध्यक्ष बी. सी. भरतीया यांनी सांगितले.
स्थानिक बाजारातून खरेदी करा
दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांनी स्थानिक बाजारातून खरेदी करावी अशी मोहीम नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने आखली आहे. त्यामुळे ऑनलाईन बाजारापेक्षा ग्राहक स्थानिक बाजारातून खरेदी करण्यास तयार होतील.
- अश्विन मेहाडिया, अध्यक्ष
मोठी खरेदी आणि विविध प्रकारचे गोडधोड आणि आनंद द्विगुणीत करणारा सण म्हणजे दीपावली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. खरेदीसाठी संपूर्ण बाजारपेठ सजली आहे. विविध प्रकारचे तयार कपडे, बालगोपालांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस, विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य, अत्तर, फटाके, आकाशकंदील, पूजेचे साहित्य, विविध रंगांच्या रांगोळ्या आदी विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यांवर गर्दी वाढत आहे.
संपादन - नीलेश डाखोरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.