महाराष्ट्राच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पुन्हा नागपूरकडे, यांना मिळाले गृहमंत्रिपद

maharashtra police
maharashtra police
Updated on

नागपूर : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गृहखाते त्यांनी आपल्याकडे ठेवले होते. यानिमित्त गृहमंत्रिपद नागपूरकडे होते. आता पुन्हा गृहमंत्रिपद नागपूरच्या वाट्याला आले आहे. काटोलचे आमदार अनिल देशमुख यांना आता गृह खाते मिळाले आहे. त्यानिमित्त आता पुन्हा एकदा नागपूरवर महाराष्ट्राच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी आली आहे.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाल्यावर गाडीवर लागलेला लाल दिवा तब्बल वीस वर्षे कायम होता. युतीच्या व आघाडीच्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळविणाऱ्या या आमदाराने मंत्रिपदी असताना सर्वसामान्यांवर लग्नाचा भार पडू नये म्हणून सामूहिक विवाह सोहळा सुरू केला. विशेष म्हणजे याच सामूहिक विवाह सोहळ्यात आपल्या मुला-मुलीचे लग्न लावून आदर्श घालून दिला. हे मंत्री आहेत, अनिल देशमुख. काटोल मतदारसंघातून पाचव्यांदा विजयी झालेले अनिल देशमुख यांना महाविकास आघाडीच्या सरकामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. आता त्यांच्याकडे गृहमंत्रिपदाची जबाबदारी आली आहे.

हेही वाचा - मुनगंटीवारांनी राखला चंद्रपूर जि. प.चा गड, भाजपच्या रेखा कारेकार विजयी
 

अनिल देशमुख महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठे नाव आहे. ते शेतकरी, शेतमजूर, दलित, बहुजन, सर्वसामान्यांचा लोकनेता. नरखेड पंचायत समितीचे सभापती ते राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषविलेल्या अनिल देशमुखांचा गत 27 वर्षांचा प्रवास अतुलनीय आणि गौरवशाली असाच आहे. राजकारणात पद गेल्यानंतर साधारणत: काही लोक माघारी फिरतात. मात्र, 2014 ची विधानसभेची निवडणूक अवघ्या काही मतांनी हरल्यानंतर अनिल देशमुख मागे फिरले नाही. उलट ते नव्या उमेदीने उभे राहीले. शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी त्यांचा लोकलढा सुरूच राहिला. पाच वर्षांत त्यांच्या लोकसंग्रहात कितीतरी पटीने वाढ झाली. याची प्रचिती त्यांच्या नागपुरातील "श्रद्धा' या निवासस्थानी आणि काटोल मतदार संघात फेरफटका मारल्यानंतर नक्कीच येते.

त्यांचा प्रवास नरखेड तालुक्‍यातील वडविहिरा या गावातून सुरू झाला. त्यांनी काटोलमध्ये माध्यमिक आणि नागपुरात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. 1970 पासून ते युवक कॉंग्रेसमध्ये सक्रिय झाले. 1992 मध्ये नागपूर जिल्हा परिषदेच्या जलालखेडा सर्कलमधून निवडणूक लढविली. यात त्यांना मतदारांनी डोक्‍यावर घेतले. याच काळात ते नरखेड पंचायत समितीचे सभापती झाले. 23 मे ते 9 जून 1992 या काळात सभापती राहिलेले देशमुख 9 जुलै 1992 रोजी नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. या काळात राज्य सरकारने जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्र्यांचा दर्जा दिला. देशमुख यांना लाल बत्ती मिळाली. मात्र, ते कधीही लाल बत्तीच्या मोहात पडले नाहीत. सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करीत राहिले. अवघ्या तीन वर्षांच्या कार्यकाळात जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात स्वतंत्र ओळख निर्माण केली. 1995 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काटोलसाठी कॉंग्रेसकडे उमेदवारी मागितली. मात्र, ती मिळाली नाही.

महाराष्ट्र भूषण पुरस्काराला सुरुवात
अपक्ष निवडणूक लढवित लोकशक्तीच्या बळावर हा नेता महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचला. पहिल्याच टर्ममध्ये ते युती सरकारमध्ये 21 मार्च 1995 रोजी शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, सांस्कृतिक कार्य खात्याचे मंत्री झाले. या काळात त्यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्काराला सुरुवात केली. पहिला "महाराष्ट्र भूषण' पुरस्कार गाणसम्राज्ञी लता मंगेशकर व प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना नागपूर येथे निमंत्रित करून प्रदान केला.

2004 मध्ये विजयाची हॅट्ट्रिक
1999 मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वात देशमुख यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. 1999 मध्ये ते पुन्हा विधानसभेवर निवडून गेले. काटोल मतदार संघातील विकासकामांच्या बळावर त्यांनी राज्यात स्वतंत्र ओळख निर्माण केली. 2004 मध्ये त्यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली. प्रचंड लोकसंग्रह असलेला हा नेता कधीही मागे आला नाही. 1999 ते 2001 या काळात शालेय शिक्षण, माहिती व जनसंपर्क विभागाचे राज्यमंत्री, 2001 नंतर राज्य उत्पादन शुल्क, अन्न व औषधीद्रव्य प्रशासन विभागाचे मंत्री, 2004 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे आणि यानंतर 2009 मध्ये त्यांनी नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचा कारभार त्यांनी यशस्वी सांभाळला.

राज्यात केली गुटखा बंदी
शालेय शिक्षण आणि सांस्कृतिक खात्याचे मंत्री असताना राज्यभरातील सिनेमागृहात त्यांनी राष्ट्रगीताची सक्ती केली. अन्न व औषधीद्रव्य प्रशासन विभागाचे मंत्री असताना राज्यात गुटखा बंदी आणली. गुटखाबंदी आणणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले. बांधकाम मंत्री असताना मुंबई येथील मुंबईचा लॅंडमार्क असलेला वरळीचा "सी लिंक' हा भारतातील पहिला समुद्रावरचा सात किलोमीटर लांबीचा पूल बांधून पूर्ण केला. तसेच नागपूर रेल्वे स्टेशनच्या जवळचा अतिशय सुंदर रामझुला हा पूल आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधला. नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात डिजिटलायझेशचे युग देशमुख यांनीच आणले. शिक्षण मंत्री असताना अवघ्या 10 रुपयांत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता पाच लाख घरांपर्यंत त्यांनी पोहोचविली. नागपुरातील मानकापूर येथील "विभागीय क्रीडा संकुलाची' मूहर्तमेढही देशमुख यांनीच रोवली.

48 हून अधिक आंदोलन, मोर्चे
विरोधी पक्षात असतानाही गरीब शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढत राहिले. काटोल, नरखेड तालुक्‍यात 48 हून अधिक मोर्चे आणि आंदोलन केली. मग तो दुष्काळग्रस्त काटोल-नरखेड तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा प्रश्‍न असो वा संत्रा आणि मोसंबी उत्पादकांना बहुवार्षिक पीक विमा योजनेचा लाभ मिळवून देण्याचा. देशमुख यांच्या आंदोलनाची सरकारला दखल घ्यावी लागली. शेतकरी, शेतमजूर, वंचित आणि बहुजनांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या या लोकनेत्याचा विदर्भाला अभिमान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.