कोरोना काळात केंद्रीय मंत्र्यांपासून तर नगरसेवकांपर्यंत सर्वांचा रविवारी नाग नदीवर मेळा, महापौरांचे अजब निर्देश

mayor dayashankar tiwari order to invite minsters for nag river cleanliness program starting in nagpur
mayor dayashankar tiwari order to invite minsters for nag river cleanliness program starting in nagpur
Updated on

नागपूर : कोरोना नियंत्रणासाठीच्या उपाययोजनेवर महापालिकेचे अपयश संपूर्ण शहर बघत असताना नाग नदी स्वच्छतेचा प्रारंभ अशोक चौकातील किनाऱ्यावर थाटात करण्याचा प्रयत्न सुरू झाला. या कार्यक्रमात केंद्रीयमंत्री, पालकमंत्री, विरोधी पक्षनेते, आमदार, नगरसेवकांना आमंत्रित करा, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी आज प्रशासनाला दिले. नाग नदीच्या किनाऱ्यावर एकप्रकारे मेळाच भरविण्याचे आदेश देऊन कोविड नियमाचे पालन करण्याच्या सूचनाही महापौरांनी दिल्याने अधिकारीही बुचकळ्यात पडले. 

पावसाळ्यापूर्वी तयारीसाठी शहरातील नद्यांची स्वच्छता दरवर्षी केली जाते. परंतु यंदा कोरोनामुळे दररोज पन्नासावर नागरिकांचे निधन होत आहे. अशा परिस्थितीत नदी स्वच्छता लोकसहभागातून कसा शक्य? असा प्रश्न आज महापौरांच्या निर्देशानंतर मनपा अधिकाऱ्यांना पडला. नदी स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी आज ऑनलाइन बैठक पार पडली. या बैठकीत महापौरांसह स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, माजी आमदार प्रा. अनिल सोले, निगम सचिव डॉ. रंजना लाडे, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ. प्रदीप दासवार, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अजय पोहेकर, जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, ग्रीन व्हिजील फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कौस्तुभ चॅटर्जी यांच्यासह सर्व झोनचे सहायक आयुक्त सहभागी झाले होते. 

११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त नदी स्वच्छता अभियानाचा प्रारंभ होत असून लोकसहभागासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा. तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण तयारी करावी, असे निर्देश तिवारी यांनी दिले. वेकोलि, मॉईल यासारख्या विभागाकडून नदी स्वच्छतेच्या कार्यात मोठी मदत होते. यावर्षीही प्रशासनाने अशा विभाग, संस्थांशी संपर्क साधून लोकसहभाग वाढवावा, असेही निर्देश तिवारी यांनी दिले. नदी स्वच्छतेसाठी आवश्यक असलेल्या पोकलॅण्ड, जेसीबी आणि अन्य मशिनरीजच्या तयारीसंदर्भात सर्व सहायक आयुक्तांनी माहिती सादर केली. ज्या ठिकाणी अद्यापही काही अडचणी येत आहेत, त्या तातडीने दूर करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले. शहरातील सर्व सर्पमित्रांची यादी तयार करून ती सर्वांना पाठवावी. जेणेकरून अभियानादरम्यान साप निघाल्याचे काही प्रसंग समोर आले तर त्यांना तातडीने पाचारण करता येईल, असेही तिवारी यांनी सुचविले. 

कर्मचारी आणणार कुठून? 
मनपाचे अनेक कर्मचारी कोरोना वारियर्स म्हणून काम करीत आहे. त्यामुळे तिन्ही नद्या स्वच्छतेसाठी कर्मचारी कुठून आणणार? अशी चर्चा अधिकाऱ्यांत रंगली आहे. नदी स्वच्छता केवळ औपचारिकता ठरणार असल्याचे चित्र आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.