जलालखेडा (जि.नागपूर) : लॉकडाउनमध्ये खप कमी, न परवडणारे भाव, चा-याच्या भरमसाठ वाढलेल्या किमती या बाबी दुग्ध उत्पादकांच्या पथ्यावर पडत असल्यामुळे दुग्ध उत्पादक दोन्हीकडून अडचणीत सापडला आहे. एकीकडे शासन दूध उत्पादन वाढविण्याचे आवाहन करीत आहे, तर दुसरीकडे दुधाचे भाव घसरून मागणी घटली आहे. त्यामुळे उत्पादकांचे "डोळे पांढरे' होण्याची वेळ आली आहे.
22 ते 23 रूपये मिळतात दर
राज्यात दूध उत्पादक संघाकडून गावपातळीवर सहकारी दुध संस्थांमार्फत दूध संकलन केले जाते. त्यासोबतच काही खासगी कंपन्या शेतकऱ्यांकडून दुध खरेदी करतात.लॉकडाऊनपूर्वी दुग्ध संघाकडून उत्पादकांना 28ते 29 रुपये प्रति लिटर भाव मिळत होता. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर शासनाकडून दुधाच्या भावात घसरण झाली. आज 22-23 रुपये प्रति लिटर भावाने संघ दूध खरेदी होत आहे.
दुधाची प्रत मानकाप्रमाणे नसेल तर केले जाते परत
ग्रामीण भागात काही ठिकाणी संघाव्यतिरिक्त काही खासगी संस्था शेतकऱ्यांचे दूध खरेदी करतात. त्यात मदर डेअरी व दिनशा कंपनी व इतर काही खासगी उद्योगांचा समावेश आहे. शासन ज्या भावाने दूध खरेदी करते, त्यापेक्षा चढ्या भावाने हे खासगी उद्योग दूध खरेदी करीत होते. गावात सहकारी दूध संस्था आहेत. शासनाच्या अखत्यारीतील दूध संघालाच दूध विकण्याचे बंधन या संस्थांवर आहेत. संघाने दूध खरेदी केल्यानंतर जर त्या दुधाची प्रत मानकाप्रमाणे नसेल तर दुसऱ्या दिवशी चोवीस तासांनी ते दूध संस्थेला परत करण्यात येते. दुधाची प्रत जर मानकाप्रमाणे नसेल तेव्हाच परत करायला पाहिजे. संघाकडून संस्थेला तोंडी आदेश देऊन कित्येकदा खरेदी बंद करण्यात येते. तसेच खरेदीमध्ये कपात करण्यात येते. या सर्व बाबींचा फरक दूध उत्पादकावर होऊन त्याचे आर्थिक नुकसान होत आहे.
उत्पादकांची लूट
लॉकडाऊन काळात शासनाने दुधाचे भाव तर कमी केलेच सोबतच संघाकडून संस्थेला तोंडी सूचना
देऊन खरेदीही कमी केली. निरुपाय होऊन शेतकरी शिल्लक दूध खासगी कंपनीला देतात. या संधीचा फायदा उठवून खासगी कंपनी 17 ते 20 रुपये प्रति लिटर इतक्या कमी भावाने दूध खरेदी करून दूध उत्पादकांची लूट करीत आहे.
हेही वाचा : सांगा, विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करायचे कधी?
पशूखाद्यात 30 टक्क्यांची वाढ
लॉकडाऊननंतर ढेप, सरकी व पशु खाद्याच्या भावात जवळपास 25-30 टक्के वाढ झाली आहे. उन्हाळ्यात गाई म्हशींना संतुलित खाद्य मिळत नाही. त्याचा परिणाम दुधातील फॅट व स्निग्धतेवर होतो. त्यामुळे कमी भाव मिळतो. एकीकडे मागणी, उत्पादन, भाव कमी तर दुसरीकडे खर्चात वाढ यामुळे दूध उत्पादकांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्याकरिता शासन दुग्ध व्यवसायाकडे वळण्याचे आवाहन करीत आहे.
दहा दूध पावडर कारखाने बंद
राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार शेतकऱ्यांना दूध उत्पादन वाढवा, असे सांगून दूध पावडर कारखाने सुरू करणार असल्याचे सांगत आहेत. शासनाचे राज्यात जवळपास दहा दूध पावडर कारखाने बंद आहेत. हजारो टन दूध पावडर महाराष्ट्रात पडले आहे. त्याला ग्राहक नाही. बाहेरून येणारे चांगल्या प्रतीचे दूध पावडर 180रुपये तर शासनाचे 280 रुपये प्रति किलो आहे. नागपूर जिल्हा दूध संघाचे संचालन राजकीय व्यक्ती करतात. गेल्या वर्षांपासून संघ केदारगटाकडे आहे. सहकारमहर्षी बाबासाहेब केदार यांच्यानंतर विद्यमान पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार गटाचे नेतृत्व करतात तरी जिल्हा दूध संघामुळे दूध उत्पादकांची वाईट अवस्था आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.