‘मला कोरोना झाला असून, लास्ट स्टेजवर आहे’ असे म्हणत केला विश्वासघात

My husband's second wife Sequel in the Nagpur
My husband's second wife Sequel in the Nagpur
Updated on

नागपूर : सध्या गाजत असलेल्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील हुबेहूब कथानक उपराजधानीत पुढे आले आहे. पहिलेच विवाहित असणाऱ्या युवकाने दुसरा संसार थाटला. दोन्हा बायकांना याची पुसटशीही कल्पना येऊ दिली नाही. वेगवेगळी कारणे देत त्याने दुसऱ्या पत्नीकडून ६.६७ लाख रुपये रोख आणि दागिने लाटले. कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा बनाव करून रक्कम लाटण्याचा त्याचा डाव होता. एक दिवस दुसरी पत्नी त्याच्या घरी पोहोचली आणि बनावच उघड झाला आणि या ‘गॅरी’ला गजाआड जावे लागले.

कमलेश अशोक राऊत (३३, रा. विश्वकर्मानगर) असे आरोपीचे नाव आहे. त्याचे २०१४ मध्येच पहिले लग्न झाले असून, एका मुलाचा बाप आहे. तो चालकाचे काम करतो. पण, बरेचदा रिकामा फिरत असतो. चांगले राहणीमान आणि ‘बोल बच्चन’ देण्यात पटाईत आहे. नवी मुंबईच्या धनसोली येथील मूळ रहिवासी असणारी ३५ वर्षीय पारूल कामाच्या निमित्ताने नागपुरात वास्तव्यास आहे. २०१९ मध्ये कमलेश खासगी कंपनीत चालक म्हाणून कामाला होता. मिहान भागात त्यांची ओळख झाली.

जून २०१९ मध्ये दोघेही जगनाडे चौकातील गायत्री मंदिरात भेटले. तिथून आपसात बोलणे सुरू झाले. त्याने अविवाहित असून मुलीचा शोध घेत असल्याचे आणि लवकरच महावितरणामध्ये नोकरी लागणार असल्याती थाप मारली. त्यावर विश्वस ठेवून तिने घरच्यांना कमलेशबाबत माहिती दिली आणि जुलै महिन्यात त्यांनी लग्न उरकले. त्यानंतर दोघेही मुंबईला राहण्यासाठी गेले. मुंबईत नोकरी लागल्याचे सांगून दोघेही तिच्या माहेरी राहू लागले.

हुडकेश्वर परिसरात फ्लॅट खरेदी करायचा असल्याचे सांगून पैशांची मागणी केली. पारूलने भावाच्या मदतीने एक एक करीत एकूण ६.६७ लाख रुपये दिले. लॉकडाऊननंतरी तिला कंपनीत पुन्हा रुजू होण्यास सांगण्यात आले. ती तडक नागपूरला निघून आली. यानंतरही कमलेश सासरीच तळ ठोकून होता. एक दिवस नागपूरला जात असल्याचे कारण देत तिच्या माहेरच्यांकडून सुमारे २ लाख रुपये किमतीचे दागिने घेतले आणि निघून गेला. तेव्हापासून तो बोलणेही टाळत होता.

एक दिवस त्याचा फोन आला. ‘मला कोरोना झाला असून लास्ट स्टेजवर आहे’ एवढे सांगून त्याने फोन कट केला. तेव्हापासून कोणताच संपर्क नव्हता. गुरुवारी पारूल शोध घेत त्याच्या घरापर्यंत गेली. तो घरीच होता. त्याचवेळी तो पूर्वीच विवाहित असून केवळ पैशांसाठीच दुसरे लग्न केल्याचे बिंग फुटले. कोतवाली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली.

कमलेशची चलाखी

दुसऱ्या लग्नापूर्वी पहिली पत्नी माहेरी गेली होती. त्याच सुमारास त्याच्या वडिलांचे निधन झाले. पहिली पत्नी काही कारणांनी अंत्यसंस्कारासाठी येऊ शकली नाही. कमलेशने पारूल व तिच्या नातेवाईकांना बोलावून घेतले होते. दोन्ही पत्नीकडील मंडळी एकाच ठिकाणी असूनही त्याने कुणालाही कानोकान खबर होऊ दिली नाही.

ठगबाजी नडली

कमलेश पूर्वीपासूनच ठगबाज असल्याची पुरेपूर कल्पना पहिल्या पत्नीला आहे. म्हणूनच ती पतीवर विसंबून राहिली नाही. सासरी राहत असली तरी स्वतः काम करून मुलाचा सांभाळ करते. पारूलने कमलेशचे बिंग फोडले. पण, त्याचे कोणतेही नवल पहिल्या पत्नीला वाटले नाही. त्याने अशाप्रकारे अनेकींना गंडविले असेल अशी शंका तिने व्यक्त केली. त्याने घेतलेल्या पैशांचे काय केले याचा शोध पोलिस घेत आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.