नागपूर ः प्रशासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी व्यापारी, व्यावसायिकांनी दुकाने ठेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता. दररोजच्या तुलनेत कमी असली तरी लॉकडाऊनमध्ये अपेक्षित निर्बंधाला छेद देणारी गर्दी शहराच्या सर्वच भागातील रस्त्यावर दिसून आली. दुचाकी, चारचाकी वाहनेही काही प्रमाणात रस्त्यांवर धावताना आढळून आली. विशेष म्हणजे या लॉकडाऊनला महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. रस्त्यावर महिलांची संख्या नगण्य असल्याने त्यांनी घरी राहण्यास पसंती दिल्याचे अधोरेखित होते.
संपूर्ण शहरासह बेसा-बेलतरोडी, कामठी, हिंगणा, वाडी या शहराला लागून असलेल्या भागांमध्येही लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली. शहरातील काही भागात सकाळी रस्ते निर्जन असले तरी शहरातील प्रमुख भागांमध्ये मात्र उत्सुकतेपोटी बाहेर पडणाऱ्यांचीही गर्दी दिसून आली. दुपारी उन्हामुळे ही गर्दी कमी झाली असली तरी पुन्हा सायंकाळी रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ दिसून आली.
त्या तुलनेत अत्यावश्यक सेवेतील दुकानदार, व्यापारी वगळून इतरांनी दुकाने, बाजारपेठ बंद ठेऊन प्रशासनाच्या लॉकडाऊनची लाज वाचविली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. याशिवाय शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालये, आस्थापनांतील नागरिकांची कार्यालयात जाताना सकाळी तर घरी परताना सायंकाळी रस्त्यांवर गर्दी होती. दररोजच्या तुलनेत ही गर्दी कमी असली तर लक्षवेधकच होती.
अनेक नागरिक सकाळी दूध, भाजीपाला, ब्रेड आदी खरेदीसाठी बाहेर दिसून आले. त्यामुळे काही दुकानांमध्ये गर्दी होती. दुपारी मात्र अत्यावश्यक सेवेच्या दुकानेही रितीच होती. सायंकाळी कार्यालयातून घरी जाताना अनेकजण भाजीपाला आदी खरेदी करताना आढळले. याशिवाय सायंकाळी फिरण्याच्या निमित्ताने अनेकांनी आपापला परिसरच निवडला.
अनेक भागात ओळीने दुकाने सुरू
महापालिकेने ओळीने एकापेक्षा जास्त दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. केवळ स्टॅन्ड अलोन दुकानांनाच परवानगी आहे. परंतु मानेवाडा रोड, शताब्दी चौक ते रामेश्वरी रोडवर आजूबाजूलाच असलेली किराणा दुकाने सुरू होती. भाजीपाला विक्रीचीही दुकाने जणू बाजारासारखीच दिसून आली. अशी स्थिती शहराच्या इतरही भागात होती. याशिवाय काही हॉटेल्समधून मागच्या दाराने नागरिकांना खाद्यपदार्थांचा पुरवठा सुरू होता.
आयुक्त रस्त्यावर
लॉकडाऊनच्या अंमलबजावणीची पाहणी करण्यासाठी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. रस्त्यावर उतरले. आयुक्तांनी पूर्व, दक्षिण नागपुरातील भागात अचानक भेट देऊन विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची झाडाझडती घेतली. अत्यावश्यक कामासाठी निघाल्याचे कारण सांगितलेल्या व्यक्तींना त्यांनी कागदपत्रे तसेच संबंधित पुराव्याची मागणी केली. असमाधानकारक उत्तरे देणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी पोलिसांना दिले.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.