नागपूर : सीताबर्डीतील रस्त्यावर आठ तरुणी खांद्यावर भल्या मोठ्या बॅगा अडकवून या चौकातून त्या चौकात फिरत होत्या. चेहऱ्यांवरून त्या उच्चशिक्षित वाटत होत्या. काहीतरी विचारपूस करीत होत्या. एका व्यक्तीने डॉ. नीलेश भरणे यांना याविषयी माहिती दिली. पंधरा मिनिटात डॉ. भरणे यांचा ताफा व्हेरायटी चौकात आला. त्यांनी आठही मुलींना बोलावले. विचारपूस केली. त्यानंतर त्या मुलींनी अंगावर काटा आणणारी आपबीती ऐकविली. डॉ. भरणे यांनी लगेच त्यांच्या समस्यांचे समाधान केले आणि त्यांना आपापल्या गावी रवाना केले.
मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भातील उच्चशिक्षित आठ मुली गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरातील एका कंपनीत नोकरीवर आहेत. त्यामध्ये दोन तरुणी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमधील तर तीन तरुणी वर्धा जिल्ह्यातील नागभीड शहरातील असून दोन भंडारा जिल्ह्यातील साकोली शहरातील तर एक युवती गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील पुजारी टोला गावातील आहे. लॉकडाउनमुळे कंपनी बंद पडली. त्या कंपनीच्या मालकाने महिन्याचे वेतन देऊन महाराष्ट्रात परत जाण्यास सांगितले. त्यामुळे मुलींनी गुजरातमधील एका कारचालकास महाराष्ट्रात पोहोचवून देण्याची विनंती केली.
कारचालकाने 28 हजार रुपये भाडे सांगितले. मुलींकडे दुसरे कोणताही पर्याय नसल्यामुळे त्यांनी होकार दिला आणि सोमवारी भरदुपारी त्या तरुणींना कारचालकाने बसस्टॅंडवर सोडून दिले. त्यानंतर पुढे जाण्यास नकार दिला आणि तो लगेच निघून गेला. अडचणीत सापडलेल्या तरुणींनी गणेशपेठ बसस्थानक गाठले. मात्र, तेथे बससेवा बंद असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी पायी चालत व्हेरायटी चौक गाठला. जवळपास दोन तास दुपारच्या कडक उन्हात त्या तरुणी इकडून-तिकडे फिरत होत्या.
सलग दोन दिवस प्रवास असल्यामुळे त्या तरुणी उपाशीपोटी नागपुरात पोहोचल्या. त्यांच्याकडे मोजकेच पैसे असल्यामुळे त्यांनी नाश्ता करणे टाळले. अडचणीत असलेल्या तरुणींची व्यथा विमल नामक व्यक्तीला कळली. त्यामुळे त्यांनी गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त डॉ. भरणे यांना फोनवरून माहिती दिली. डॉ. भरणे यांनी तरुणींना सर्वप्रथम जेवणाबाबत विचारणा केली. सर्वप्रथम त्यांना जेवण आणि थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर त्यांची अडचण समजून घेण्यात आली. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची ई-पास नव्हती. तसेच मेडिकल सर्टिफिकेटही नव्हते.
आता आम्ही घरी कसे जाऊ, असा प्रश्न तरुणींनी पोलिसांना केला. तेव्हा भरणे यांनी लगेच दोन महिला पोलिस कर्मचाऱ्यांना सोबत देऊन मुलींची वैद्यकीय चाचणी करण्याची सोय केली. त्यानंतर कागदपत्रे जमा करून त्यांची प्रवासाची ई-पास तयार करण्यात आली. सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर मुलींना आपापल्या जिल्ह्यातून गावी पाठविण्यासाठी दोन कारची व्यवस्था केली.
नागपूर पोलिस कटिबद्ध
तरुणींच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना सुरक्षितपणे घरापर्यंत सोडवून देणे हे आमचे कर्तव्य होते. समस्या सोडविण्यासाठी नागपूर पोलिस कटिबद्ध आहेत. आठही तरुणी सुखरूप घरी पोहोचल्याची खात्री केल्यानंतर समाधान वाटले.
- डॉ. नीलेश भरणे, अतिरिक्त पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.