नागपूर ः कोरोना महामारीचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसला. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठालाही कोरोनामुळे चांगलाच मार बसल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठ महिन्यांत विद्यापीठाचे उत्पन्न ५६ कोटींनी घटले असल्याची माहिती समोर आली. याप्रकाराने विद्यापीठाच्या आगामी अर्थसंकल्पावर परिणाम होणार असून, विकासात्मक योजनांना फटका बसण्याची शक्यता आहे.
राज्यात मार्च महिन्यात टाळेबंदीची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. याशिवाय वसतिगृहेही बंद ठेवण्यात आले. त्यामुळे विद्यापीठाला परीक्षेपासून मिळणारा निधी थांबला. विशेष म्हणजे विद्यापीठाला जवळपास ३५ कोटी रुपये परीक्षा शुल्कातून मिळत असतात. याशिवाय महाविद्यालयांचे संलग्निकरण आणि विलंब शुल्कातूनही पैसे मिळतात.
याशिवाय, विद्यापीठाला रुसाच्या माध्यमातून निधी मिळत असतो. मात्र, यावर्षी टाळेबंदीमुळे विद्यापीठाच्या परीक्षा लांबल्या. महाविद्यालये बंद असल्याने संलग्नीकरणही बंद आहे. याशिवाय परीक्षेचे शुल्क घेऊ नये या मागणीसाठी विद्यार्थी संघटनांनी कुलगुरूंना निवेदन दिले होते. त्यातूनच कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात आलेले नाही.
आता विद्यापीठस्तरावर अंतिम वर्षांची परीक्षा होत असून इतर वर्षाच्या परीक्षा महाविद्यालयस्तरावर घेण्यात येणार आहे. यामुळे विद्यापीठाचा शुल्कापोटी येणारा पैसा मिळणार नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी विद्यापीठाला एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान ६१ कोटी ९ लाख ३२ हजार ५५४ रुपये मिळाले होते.
मात्र, यावर्षी कोरोनाचा फटका बसल्याने विद्यापीठाला केवळ ४ कोटी ६५ लाख ५३ हजार ९१२ रुपयांचा निधी मिळाला. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत ५६ कोटी ४३ लाख ७८ हजार ६४२ रुपयांची तूट आहे. याच्या प्रभाव विद्यापीठाच्या विकासात्मक कामावर पडणार असून, विविध नव्या प्रकल्पांना निधीअभावी पैसा मिळणार नसल्याचे दिसून येणार आहे.
कोरोनामुळे निधीचे मार्ग बंद
परीक्षा आणि महाविद्यालयाच्या संलग्नीकरणातून विद्यापीठाला या काळात पैसे येत असतात. मात्र, कोरोनामुळे सगळे मार्ग बंद असल्याने ५६ कोटी रुपयांचा निधी कमी झाल्याचे दिसून येत आहे.
डॉ. राजू हिवसे, वित्त व लेखा अधिकारी
संपादन : अतुल मांगे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.