कोरोनाचा महाब्लास्ट! नागपुरात एकाच दिवशी ४ हजार ९९ नवे कोरोनाग्रस्त; गेल्या वर्षभरातील उच्चांक
नागपूर ः जिल्ह्यात कोरोनाने गेल्या वर्षभरातील बाधितांचा नवा उच्चांक गाठला आहे. गेल्या २४ तासांत तब्बल ४ हजार ९९ नागरिकांना कोरोनाचे निदान झाले असून संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे स्पष्ट झाले. ग्रामीण भागातही एकाच दिवशी अकराशेवर बाधित आढळून आल्याची नोंद पहिल्यांदाच झाली. त्यामुळे ग्रामस्थांवरही कोरोनाने फास आवळल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, चोवीस तासांत ३५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला.
कोरोनाबाधितांच्या आकड्यांचा आलेख सातत्याने वर चढत आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाचा फास आणखी घट्ट होत असल्यावर आज नव्या उच्चांकाने शिक्कामोर्तब केले. आज जिल्ह्यात ४ हजार ९९ नवे कोरोनाग्रस्त आढळून आले असून कोरोनाचे पहिले निदान झाल्यानंतर ही सर्वोच्च संख्या आहे. यापूर्वी मागील आठवड्यात १८ मार्चला ३७९६ ही सर्वोच्च बाधितांची संख्या नोंदविण्यात आली होती.
आज बाधितांच्या संख्येने नवा विक्रम केला. त्यातही ग्रामीण भागात प्रथमच १ हजार १२६ बाधित आढळून आले. त्यामुळे ग्रामीण भागातही आता कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे स्पष्ट झाले. शहरात दोन हजार ९६६ जणांना कोरोनाची बाधा झाली. आज आढळून आलेल्या बाधितांसह एकूण बाधितांची संख्या २ लाख ११ हजार १६२ पर्यंत पोहोचली. यात शहरातील १ लाख ६७ हजार २१५ जणांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील ४२ हजार ९२९ जणांना बाधा झाली.
शहराबाहेरील १ हजार १८ जणांना कोरोनाचे निदान झाले. दरम्यान, गेल्या २४ तासांमध्ये ३६ कोरोनाबळींची नोंद करण्यात आली असून यात शहरातील १८ तर ग्रामीण भागातील १४ जणांचा समावेश आहे. शहराबाहेरील तिघांनी शेवटचा श्वास घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृत्यूची संख्या ४ हजार ९५ पर्यंत पोहोचली. यात शहरातील मृत्यूसंख्या ३ हजार ८३ पर्यंत तर ग्रामीण भागातील मृत्यूसंख्या नउशेपर्यंत पोहोचली. जिल्ह्याबाहेरील ८३६ जण मृत्यूमुखी पडले.
ॲक्टिव्ह रुग्ण ३७ हजारांच्या उंबरठ्यावर
बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही गतीने वाढत आहे. आज जिल्ह्यात ३६ हजार ९३६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यात शहरातील २७ हजार ८५५ ॲक्टिव्ह रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे या रुग्णांची सोय करण्यात प्रशासनाचा कस लागत आहे. गृहविलगीकरणातील बाधित मोठे आव्हान असून त्यांच्यासाठी कोविड केअर सेंटर वाढविण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - रेल्वेच्या बोगीत बेशुद्धावस्थेत सापडला युवक;...
कोरोनामुक्तांच्या टक्केवारीत सातत्याने घट
आज १ हजार ९४३ बाधित कोरोनामुक्त झाले. परंतु आढळून येत असलेल्या बाधितांच्या तुलनेत ही संख्या निम्मी आहे. त्यामुळे कोरोनामुक्तांच्या टक्केवारीत सातत्याने घट होत आहे. आतापर्यंत १ लाख ६९ हजार ४०७ जण कोरोनातून बरे झाली. कोरोनामुक्त झालेल्यांची टक्केवारी आज ८०.२३ अशी आहे. काल, गुरुवारी ही टक्केवारी ८०.८७ होती. मागील शुक्रवारी ही टक्केवारी ८३.७८ अशी होती.
संपादन - अथर्व महांकाळ
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.