नागपूर : कुटुंबातील एकजण कोरोनाबाधित आढळल्यास अवघ्या दोन दिवसांत कुटुंब बाधित होते. गृहविलगीकरण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत ठरत असल्याचे अनेक वैद्यकीय तज्ज्ञ खासगीत बोलत आहेत. विशेष असे की, प्रशासनाने गृहविलगीकरणातील रुग्ण बाहेर निघाल्यास त्यांना दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, गृहविलगीकरणाऐवजी बाधितांची रवानगी कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात यावी अशी मागणी होत आहे. मात्र, जिल्हा प्रशासन कोविड केअर सेंटर उभारण्याबाबत उदासीन दिसत आहे. तर मेयो, मेडिकलमध्ये लक्षणे नसलेल्या रुग्णांना दाखल करून घेत नाही. एकाच खोलीत संसार असलेल्या कोरोनाबाधितांनी गृहविलगीकरणात कसे राहावे, अशी व्यथा नागरिक बोलून दाखवीत आहेत.
कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर गतवर्षी मोठ्या प्रमाणात कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले होते. त्यामुळे कोरोना नियंत्रणात आला होता. मात्र, आता गृह विलगीकरणाच्या संकल्पनेला अधिक महत्त्व देण्यात येत आहे. होम क्वारंटाईनचे नियम पाळणे प्रत्येक कुटुंबाला शक्य नाही. यामुळेच निष्काळजीपणामुळे कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. सध्या उपराजधानीत पाचपावली येथे एकच कोविड केअर सेंटर आहे.
दुसरे विलगीकरण केंद्र व्हीएनआयटी येथे असून परराज्यातून किंवा इतर भागातून येणाऱ्यांसाठी ते राखीव आहे. पाचपावली येथे सत्तरपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आहेत. तर विविध खासगी तसेच शासकीय कोविड रुग्णालयात दोन हजारावर रुग्ण दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
तर गृहविलगीकरणातील बाधितांची संख्या ९ हजार पार झाली आहे. मात्र, कोविड केअर सेंटर तयार करण्यासाठी प्रशासनाने अद्याप पावले उचलली नाही. तत्कालीन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या काळात उभारलेल्या कोविड केअर सेंटरचीच गरज आज आहे, असेही बोलले जात आहे.
कोविड केअर सेंटर तयार करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतल्यास अतिरिक्त जबाबदारी कोणी घ्यावी, तसेच नव्याने खर्च करण्यास प्रशासनाला अतिरिक्त तयारी करावी लागणार आहे, यामुळे अतिरिक्त जबाबदारी स्वीकारण्यास प्रशासन तयार नाही. यामुळेच गृहविलगीकरणावर भर देण्यात येत असल्याची चर्चा आहे. यामुळे कोरोनाचा प्रकोप कमी होण्याऐवजी वाढेल अशी भीती आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.