नागपूर : अर्धा महिना उलटल्यानंतर अखेर पोलिस कर्मचाऱ्यांचा पगार झाला. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनी पगार खात्यात जमा होताच सर्वप्रथम किराणा भरण्यास प्राधान्य दिले तर कुणी उसनवारी निपटविण्यासाठी धडपड केली. पोलिसांच्या वेतनाला उशीर होत असल्याबाबत "सकाळ'ने वृत्त प्रकाशित केले होते, हे विशेष...
दरवर्षीप्रमाणे मार्च महिन्यात पोलिसांचे पगार उशिरा होतात. परंतु, यावेळी कोरोना व्हायरसचे संकट आल्यामुळे लॉकडाउन आणि संचारबंदीचे आव्हान पोलिसांना पेलायचे होते. त्यासाठी घरात किराणा भरणे किंवा अन्य खर्च भागविण्यासाठी पूर्व तयारी करावी लागली. मात्र, पगारच होत नसल्यामुळे पोलिस कर्मचारी हवालदील झाले होते. वरिष्ठांकडे वारंवार विचारणा होत होती. मात्र, मार्च एंडिंग आणि वेतनाची बिले परत आल्याचे कारणे देत आतापर्यंत पगार खोळंबला होता.
दरम्यान, "सकाळ'ने "पोलिस कर्मचाऱ्यांवर दुहेरी संकट' अशा मथळ्याने वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर वरिष्ठांनी सावरासावर करीत पोलिस कर्मचाऱ्यांच्या वेतनाची बीले दुप्पट वेगाने तयार करण्याचे काम सुरू होते. शेवटी अर्धा महिना उलटल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांचा संयम संपल्याची जाण वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना होती. त्यामुळे आटापीटा केल्यानंतर गुरुवारी पोलिसांचा पगार झाला.
खात्यात पगार जमा होताच अनेकांनी नियोजनाप्रमाणे सर्वप्रथम घरात किमान दोन महिन्यांचा किराणा भरण्याचा बेत आखला तर अनेकांनी आतापर्यंत झालेली उसणवारी आणि उधारी चुकती करण्यासाठी धडपड केली. गेल्या 15 दिवसांपासून पोलिस कर्मचारी पगार न झाल्यामुळे खूप तणावात होते, हे विशेष...
पोलिस सोयायटीचे सदस्य असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणी निर्माण होऊ नये त्यांच्या खात्यात सोसायटीने प्रत्येकी तीन हजार रुपये जमा केले. मात्र, जे कर्मचारी सदस्य नाहीत, अशांचा विचार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी करायला हवा होता. पोलिस वेलफेअर फंडातून काही रक्कम खर्च करून उर्वरित कर्मचाऱ्यांना द्यायला हवी होती, अशी खदखद सदस्य नसलेल्या कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली.
आटोकाट प्रयत्न करून अडचणी सोडविल्या
कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आम्ही सदैव प्रयत्न करीत असतो. शासनाच्या पगार कपातीच्या निर्णयामुळे जे पाठवलेले बील परत बोलवावे लागले. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन लांबले होते. मात्र, आम्ही आटोकाट प्रयत्न करून आलेल्या अडचणी सोडविल्या. गुरुवारी पोलिसांचे वेतन करण्यात आले.
- विक्रम साळी, पोलिस उपायुक्त.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.