शाब्बास! हाडाच्या कास्तकाराने शिवारात पेरला गोडवा; १६ एकर शेतात ८० टन गुळाचे उत्पन्न
नांद (जि. नागपूर) : माणिक कान्हुजी दांडेकर हे हाडाचे शेतकरी आहेत. कारण, त्यांनी बॅंकेतील नोकरीचा राजीनामा देऊन वडिलोपार्जित शेतीचा व्यवसाय सुरू केला. उसाचे उत्पन्न घेत असताना मनात विचार आला की अधिक उत्पादन घेण्यासाठी उसापासून गूळ तयार केला तर... त्यांच्या या कल्पनेला पत्नी अपर्णा यांनी साथ दिली आणि मोठ्या निर्धाराने नवीन व्यवसायात पदापर्ण केले. आज ते १६ एकर शेतात ८० टन गुळाचे उत्पन्न घेत असून त्यांनी शेतीच्या तोट्याच्या व्यवसायात शेतात ऊस पेरून शिवारात लाभाचा ‘गोडवा’ निर्माण केला.
माणिक दांडेकर यांचे मूळ गाव हे नांद (ता. भिवापूर) आहे. नांद येथे घर व वडीलोपार्जित शेती आहे. दांडेकर हे काही वर्षे बॅंकेत नोकरीला होते. नंतर त्यांनी नोकरी करण्यापेक्षा शेतीला महत्व दिले व नोकरीचा राजीनामा दिला आणि शेती करण्यास कंबर कसली. दांडेकर दाम्प्त्य शेती पिकवून चांगले उत्पन्न घेऊ लागले. शेतीवर देखरेख करण्यासाठी नोकर ठेवण्यात आला. उत्पादन वाढविण्यासाठी सिंचनाची सोय करून घेतली. पारंपरिक व तांत्रिक पद्धतीचा अवलंब करीत असतानाच इतरही पिके चांगली होऊ लागली.
बेला येथील पूर्ती साखर कारखाना व कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन घेतले. पारंपरिक पिके कमी करून ऊसाची लागवड जास्तीत जास्त हेक्टरमध्ये करू लागले. उसाला भावही चांगला मिळू लागला. उत्पादन चांगले होऊ लागले. मात्र पैशाची अडचण भासू लागली. दांडेकर दाम्प्त्याने जिद्द सोडली नाही. लातूर, जालना, कोल्हापूर, जळगाव इत्यादी ठिकाणी भेटी दिल्या.
त्यापध्दतीने शेतात जास्तीत जास्त १६ एकर जागेत ऊसाची लागवड करून घेतली. त्यानंतर शेतातच मोठा बंडा बांधण्यात आला. त्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करून कामाला सुरुवात केली. १६ एकरातील उसाचा गूळ तयार करण्याकरिता सरासरी ३ महिन्याचा कालावधी लागतो. ३ महिने २० ते २५ मजुरांना दररोजचे काम मिळते.
एका उद्योगातून अनेक उद्योग
गूळ काढण्याचे काम आठ वर्षांपासून सुरू आहे. जसजशी मागणी येते, त्यापध्दतीने गूळ विकणे सुरू झाले. १६ एकरातील उसाचा ८०० क्विंटलपर्यंत (८० टन) गूळ तयार होतो. गूळ एक किलो व दहा किलोची भेल तयार करतो. गूळ तयार करीत असताना ऊसाच्या रसापासून काही प्रमाणात मळी व रॉब निघतो. त्या मळीपासून ढेपसुध्दा तयार केली जाते. ढेपीलाही चांगल्याप्रकारे मागणी असते. छत्तीसगड राज्यातून चांगली मागणी येते. एक किलो गुळाच्या भेलला ३५ ते ४० रूपये व १०किलोच्या भेलला २५ ते ३० रूपये भाव मिळतो.
मजुरांना तीन महिने रोजगार दिला
माझे पती माणिक दांडेकर हे बॅंकेमध्ये नोकरीला होते. मी प्रथम गृहिणीच होते. शेती करणे हा उत्तम पर्याय असल्यामुळे त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. स्वत:चा पारंपरिक व्यवसाय सुरू करून त्यातून २० ते २५ मजुरांना तीन महिन्यापर्यंत रोजगार उपलब्ध करून द्यायचा, हा मनामध्ये उद्देश होता. आम्ही या मजुरांना तीन महिने रोजगार दिला. व्यवसाय नफ्यात सुरू आहे. आमच्या परिश्रमाचे चिज झाले याचा आम्हाला आनंद आहे.
- अपर्णा माणिक दांडेकर,
गूळ व्यावसायिक
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.