राजकारण तापले : दयाशंकर तिवारी म्हणतात, कारवाईसाठी गुंडाला सोबत नेण्याचे कारण काय?

Sahil Syed is hatching a conspiracy at the behest of someone
Sahil Syed is hatching a conspiracy at the behest of someone
Updated on

नागपूर : व्हायरल ऑडिओ क्‍लिपवरून महानगरपालिकेतील राजकारण चांगलेच तापत आहे. आरोग्य अधिकारी डॉ. गंटावार ऍलेक्‍सीस हॉस्पिटलमध्ये कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सोबत न नेता साहील सैय्यद सारख्या गुंडाला घेऊन जातो. त्यामुळे डॉ. गंटावार आणि साहील सैय्यद यांच्यात काय कनेक्‍शन आहे. सभागृहाने निर्देश दिल्यानंतरही आयुक्त तुकाराम मुंढे डॉ. गंटावारवर कारवाई करण्यास का नकार देत आहेत, असे प्रश्‍न ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी सकाळशी बोलताना उपस्थित केले. 

सत्तावीस वर्षांपासून आपण नगरसेवक आहोत. लोकप्रतिनिधी म्हणून वावरत आहे. मात्र, आजवर इतका घाणेरडा आरोप आपणावर झाला नाही. कोणी भ्रष्टाचारी, गुंड म्हटले असते तर एखादवेळी खपवून घेतले असते. मात्र, जो प्रकार साहीलने केला त्यावर आपले विरोधकच नव्हे तर शत्रूंचाही विश्‍वास बसत नाही. अनेकांनी उघडपणे या लढ्यात आपणासोबत लढण्यासाठी खुलेपणाने समोर येण्याची तयारी दर्शवली आहे, असे दयाशंकर तिवारी म्हणाले.

साहीलचे कारनामे आणि त्याचे गंटावारसोबत असलेले संबंध या क्‍लिपच्या निमित्ताने उघड झाले आहेत. साहीलच्या फसवणुकीचे अनेक प्रकरणे आता पुढे येऊ लागले आहेत. तो कुठे लपून बसला त्याचाही पोलिस शोध घेत आहे. महाआघाडीत सहभागी असलेल्या एका पक्षाच्या बड्या नेत्याच्या घरी तो दडून बसला असल्याचे आपल्या सूत्राकडून कळले. मात्र, हा विषय पोलिसांचा आहे. आज ना उद्या तो त्यांच्या हाती लागेलच. असे लोक कुठल्याच पक्षाचे नसतात. सत्तेच्या बाजूने जातात. त्यामुळे कुठल्या पक्षाचा आणि कुठल्या नेत्याशी त्याचा संबंध आहे, हा मुद्दा येथे उपस्थित होत नाही. मात्र, अशा गुंडासोबत संबंध असलेल्या गंटावारांना महापालिका आयुक्त मुंढे का वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे हे समजत नाही आहे, असेही तिवारी म्हणाले. 

तुकाराम मुंढे यांची काम करण्याची पद्धत आणि अडवणुकीचे धोरण बघता त्यांना लोकप्रतिनिधींचे महत्त्व कमी करायचे असल्याचे दिसून येते. त्यांच्याकडे आलेल्याच समस्या तातडीने सोडवण्याचे आदेश त्यांनी हाताखालच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. सर्व विकासकामे थांबवून ठेवले आहेत. आज तुमच्या घरासमोरचा खड्डा बुजवायचा असेल किंवा नाली साफ करायची असेल तरी ते निधी वितरित करीत नाही, असेही ते म्हणाले.

मुंढे सारखा अधिकारी पहिल्यांदा पाहतोय

सतरा वर्षांत सत्तेत असताना व विरोधात असताना अनेक आयुक्तांशी मी सभागृहात भांडलो. आरोपही केलेत. मात्र, सभागृह संपल्यानंतर कोणी ते आरोप वैयक्तिक घेतले नाही. कारण, आम्ही जनतेची सुविधा आणि शहराच्या विकासासाठी भांडत होतो. स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी सर्वांना वेठीस धरणारा तुकाराम मुंढे सारखा अधिकारी आपण प्रथमच बघत आहो. गंटावार, ऍलेक्‍सिस, महापौर प्रकरणाची सीआयडी चौकशी तसेच हनी ट्रॅपची क्‍लिप यांचा परस्पराशी काही संबंध आहे का? या प्रश्‍नावर तिवारी यांनी "शंभर टक्के आहे' असे उत्तर दिले.

संपूर्ण प्रकरण जगासमोर आणणार

ऑडिओ क्‍लिपमध्ये महापौर संदीप जोशी आणि माझ्यावर "हनी ट्रॅप' करण्यासंदर्भात साहील पंटरसोबत बोलत आहे. या क्‍लिपमध्ये त्याने इतर काही नेत्यांचीही नावे घेतली आहेत. येवढेच नव्हे तर न्यायव्यवस्थेलाही बदनाम करणारे वक्तव्य केले आहे. साहीलने गंटावारचे नाव घेतले आहे. तरीही या प्रकरणामागे गंटावारच एकटा आहे की अजून कुणी, याची चौकशी स्वतः माझ्या स्तरावर सुरू केली आहे. त्यामध्ये धक्कादायक बाबी पुढे येत आहेत. पुराव्यांचाही शोध सुरू आहे, ते हाती येताच हा साहील कोण आहे आणि कुणाच्या इशाऱ्यावरून हे काम करतोय, हे स्पष्ट होईल. त्याचवेळी हे संपूर्ण प्रकरण जगासमोर आणणार आहे, असे दयाशंकर तिवारी म्हणाले. 

संपादन - नीलेश डाखोरे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.