बाजारगाव (जि. नागपूर) : रविवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला. तीन किलोमीटर अंतरावरील शिवा सावंगा येथील एलकापार शिवारात श्रावण इंगळे यांच्या शेतात कापूस वेचायला गेलेल्या महिला सायंकाळी सहा वाजता घरी येणार तेवढ्यात पावसासह विजेचा कडकडाट सुरू झाला. अंगावर वीज पडल्याने तीन महिला मजुरांचा मृत्यू झाला. साश्रृ नयनांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
रविवारी अचानक निर्ढावलेल्या मनाने मनसोक्त पाऊस कोसळू लागला. परतीचा पाऊसही अधिकच निष्ठूर होत आकांत करीत कोसळत होता. विजांच्या कडकडात शिवा येथील शेतकरी श्रावण इंगळे यांच्या शेतात गावातील काही महिला कापूस वेचणी करण्यासाठी गेल्या होत्या. पण अचानक सायंकाळी कडकडणाऱ्या विजांनी घात केला. आगीचा एक मोठा लोळ कडकडाट करीत काम करीत असलेल्या पाच महिलांच्या अंगावर कोसळला.
यात अर्चना तातोडे (३५), शारदा दिलीप उइके (३६) व संगीता गजानन मुंगभाते (३५) या तिन्ही महिलांचा नागपूरला उपचारार्थ नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. दोन महिलांवर नागपूर येथे उपचार सुरू आहेत. कालपासूनच गावात दु:खाचे वातावरण असल्याने एकही चूल पेटली नव्हती. सकाळपासूनच गावात परिवारास भेटण्यासाठी नातलगांनी रीघ लावली होती.
मृत तिन्ही महिलांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविण्यात आले. परंतु, त्याआधी कोविड-१९ची चाचणी करण्यात आली. त्यात अर्चना तातोडे या महिलेची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे फक्त संगिता गजानन मुंगभाते व शारदा दिलीप उइके या दोघींचे शव गावात आणण्यात आले व सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार उरकविण्यात आले.
संगिता मुंगभाते हिला पती व दोन (१३ व ११ वर्षे) मुले आहेत. तर शारदा उइके यांना दोन मुले व एक मुलगी (१३, १०, व ७ वर्षे) आहे. गरीब व होतकरू कुटुंबातील महिलांना नियतीने डाव साधून त्यांच्या कुटुंबापासून हिरावल्यामुळे ग्रामपंचायत शिवा (सावंगा) यांनी तातडीची मदत म्हणून प्रत्येक कुटुबासाठी ५००१ रुपये मदत करण्यात आली. तिन्ही कुटुंबांना लवकरच शासकीय मदत देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
कालच्या घडलेल्या दुर्दैवी घटनेत अर्चना उमेश तातोडे (३५) या महिलेचा मृत्यू झाला. परंतु, शवविच्छेदन करण्याआधी करण्यात आलेल्या कोविड-१९च्या चाचणीत ती पॉझिटिव्ह निघाली. त्यामुळे अर्चनावर नागपुरातच अंत्यसंस्कार उरकविण्यात आला. अर्चना हिला पती व १८ व १६ वर्षांच्या दोन मुली आहेत. अर्चना ही पहिल्यांदाच कामावर गेली होती. तिच्या मुलीचा पुढील महिन्यात साक्षगंधाचा कार्यक्रम ठरलेला होता. परंतु, आईच्या अचानक निधनाने मुलीच्या आनंदावर दु:खाचा डोंगर कोसळला. अर्चनावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य व पती व दोन्ही मुली नागपूरला गेल्या होत्या. परंतु, कोविड-१९ मुळे लांबूनच दर्शन घ्यावे लागले. तेव्हा दोन्ही मुली धाय मोकलून रडत होत्या.
दिवसभर शेतात काम करून मजूर घरी येणार तेवढ्यात काळाने घाला घातला. यात तीन महिलांचा मृत्यू तर दोन गंभीर झाल्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. याची बातमी गावात पसरताच शोककळा पसरली. अचानक आलेल्या संकटामुळे पीडित परिवारावर महासंकट कोसळले आहे.
संपादन - नीलेश डाखोरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.