सातासमुद्रापार वाजतो 'तिच्या' कलेचा डंका; मूकबधिर असूनही जगभरातील प्रेक्षकांना घालते भुरळ  

Sheetal from Nagpur performs beautiful magics even she is Deaf mute
Sheetal from Nagpur performs beautiful magics even she is Deaf mute
Updated on

नागपूर : साधारणपणे जादूगार क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी पाहायला मिळते. क्वचितच प्रसंगी महिला जादूगार बनल्याचे कानावर पडते. शीतल किंमतकर त्यापैकीच एक. मूकबधिर असलेल्या शीतलने देशविदेशांत जादूचे प्रयोग करीत अनेकांची वाहवा मिळविली आहे. उल्लेखनीय म्हणजे ती भारतातील व जगातील पहिली महिला मूकबधिर जादूगार आहे.

दिव्यांगांसाठी प्रेरणादायी ठरलेली शीतल मूकबधिर फूटबॉलपटू आहे. बोखारा (गोधनी) येथील प्रा. विजय बारसे यांच्या क्रीडा विकास संस्थेत ती फुटबॉल खेळते आणि मुलांना शिकवितेही. नियतीने बोलण्याची व ऐकण्याची ताकद हिरावून घेतल्यानंतर शीतलने हार न मानता आयुष्यात ‘कुछ हटके’ करण्याचा निर्णय घेतला. लहानपणी छोट्यामोठ्या ‘ट्रिक्स’ शिकल्यानंतर हळूहळू जादूच्या खेळात तरबेज झाली. 

मूकबधिर असल्यामुळे ती सांकेतिक भाषेतच लोकांशी संवाद साधत जादूचे प्रयोग करते. सुरुवातीला नागपुरात विविध कार्यक्रमांमध्ये प्रयोग सादर केल्यानंतर देशभर प्रयोग होऊ लागले. विदेशातही तिने अनेक प्रयोग केले आहेत. आत्तापर्यंत इंग्लंड (दोनवेळा) व अमेरिकेसह पाच देशांमध्ये प्रयोग केल्याचे तिने सांगितले. तिच्या कलेचे अनेकांनी भरभरून कौतुकही केले.

इंग्लंडमधील एका प्रयोगादरम्यानचा अनुभव सांगताना शीतल म्हणाली, जादूचे प्रयोग सादर करण्यासाठी स्टेजवर गेल्यानंतर अनेकांना नवल वाटले. ही पंचविशीतील मुलगी काय जादू दाखविणार, असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला. मात्र शीतलचे सफाईदारपणे जादूचे प्रयोग व ‘ट्रिक्स’ पाहून उपस्थित प्रेक्षकांनाही आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर याच ठिकाणी झालेल्या जादूगारांच्या स्पर्धेतही शीतलने आठ भारतीयांमध्ये पहिले स्थान पटकावले. त्यावेळी भारतातील पहिली मूकबधिर जादूगार म्हणून चषक देऊन तिचा सन्मान करण्यात आला. 

अमेरिकेतही तिला पुरस्कार मिळाला. ते अविस्मरणीय क्षण आयुष्यात कदापि विसरू शकत नसल्याचे तिने सांगितले. बारावीपर्यंत शिकलेली शीतल विवाहित आहे. पतीही अंशतः बधिर असून, मुलगा मात्र, सर्वसामान्य मुलासारखा आहे. भाऊसुद्धा मूकबधिर आहे. कुटुंबाचा तिला पूर्ण पाठिंबा आहे. भविष्यात जादूगारीसोबतच फुटबॉल कोचिंगही सुरूच ठेवणार असल्याचे शीतलने सांगितले.

मी मूकबधिर असली तरी मला आयुष्यात वेगळे काहीतरी करायचे होते. त्यामुळेच मी जादूगार होण्याचा निर्णय घेतला. माझ्या कलेची देशविदेशांत स्तुती होत आहे, याचा मला आनंद व अभिमान आहे.
-शीतल किंमतकर, 
मूकबधिर जादूगार

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.