नागपूर : टाळेबंदीत अंशतः शिथिलता दिल्यानंतर नागपूर जिल्ह्यातील आतापर्यंत 783 उद्योगांमध्ये उत्पादन सुरू झाले. त्यात 19 हजार 200 कामगार कामावर रुजू झाल्याने अर्थचक्र पुन्हा गतिमान होत आहे. पुढील काही दिवसांत ही संख्या वाढण्याची उद्योग विभागाची अपेक्षा आहे.
देशात टाळेबंदीच्या काळात काही प्रमाणात उद्योग-व्यवसाय सुरू करण्याच्या धोरणानुसार 20 एप्रिलपासून परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार राज्य सरकारच्या उद्योग विभागाने आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने कारखाने सुरू करण्यासाठीच्या परवानगीची प्रणाली सुरू केली. पहिले दोन-तीन दिवस काही तांत्रिक अडचणी, स्थानिक प्रशासनाची परवानगी मिळण्यात अडचण असे अडथळे आले. पण, नंतर हळूहळू परिस्थिती सुधारत गेली. बुटीबोरी आणि हिंगणा एमआयडीसीतील उद्योजकांना नागपुरातून वाहनाने जाण्याची आणि येण्याची परवानगी हवी होती. अद्याप हा मुद्दा मार्गी लागलेला नाही. त्यामुळे उद्योगांच्या चाकांना गती मिळालेली नसल्याची माहिती आहे.
जिल्ह्यात 20 एप्रिलनंतर आठशेपेक्षा अधिक कारखान्यांना उत्पादन सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. त्यात 40 हजारांपेक्षा अधिक कामगारांची आवश्यकता आहे. आजपर्यंत 70 मोठे तर 613 लघु व मध्यम असे एकूण 783 उद्योग सुरू झाले. त्यात आता एकूण 19 हजार 220 कामगार रुजू झाले. परवानगी मिळाल्यानंतर साधनसामग्री व कामगारांची जुळवाजुळव यात उद्योगांना थोडा वेळ लागत आहे. त्यामुळे अद्यापही 30 टक्के कामगारांच्या मदतीने उद्योग सुरू झालेत. गुरुवारनंतर 50 ते 60 टक्के क्षमतेने उद्योग सुरू होतील असे बोलले जात आहे.
हिंगणा एमआयडीसीतील प्लास्टो, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, बजाज स्टिल, संदीप मेटल क्राफ्ट, निकोसह अनेक मोठे उद्योग सुरू झालेले आहे. महिंद्रा ऍण्ड महिंद्राला कच्चा मालाचा पुरवठा करणारे अथवा त्यावर आधारित उद्योगही काही प्रमाणात सुरू झाले आहे. येत्या काही दिवसात तेही पूर्ण क्षमतेने सुरू होतील अशी अपेक्षा एमआयएचे अध्यक्ष चंद्रशेखर शेगावकर यांनी सांगितले.
बुटीबोरी औद्योगिक वसाहतीत नागपूर शहरातून उद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी जायचे आहे. मात्र, शासन आणि स्थानिक प्रशासन यांच्यात स्पष्टता नसल्याने उद्योजकांना घरून जाण्याची आणि येण्याची परवानगी कशी घ्यायची याबाबत संभ्रम आहे. उद्योग विभागाच्या वेबसाइटवर अर्ज केल्यास परवानगी मिळेल असे सांगण्यात येत असले तरी त्या वेबसाइटचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे अनेक उद्योजकांनी उद्योग सुरू करण्याची परवानगी घेतली असली तरी उद्योग सुरू केलेले नसल्याची माहितीही पुढे आली आहे. बुटीबोरीतील केईसी, शारदा इस्पात, मोरारजी, शिल्पा स्टिल, सीएट टायर, आयटीसी, साज फूड, दिनाशॉ हे उद्योग सुरू आहेत. याशिवाय जिल्ह्यातील मौदा येथील हिंडाल्को, अमरावती रोडवरील सोलार आणि कळमेश्वर येथील जेडब्ल्यूएस या कंपन्याही सुरू झालेल्या आहेत.
बुटीबोरी औद्योगिक वसाहतीत अद्यापही 30 टक्के क्षमतेनेच उद्योग सुरू झालेले आहे. उत्पादन केल्यानंतर त्याची वाहतूक करणे आणि कच्चा माल आणण्यासाठी वाहतूक व्यवस्था अद्यापही सुरळीत सुरू झालेली नाही. तसेच उद्योग सुरू झाल्यानंतरही दुकाने उघडण्यात आली नसल्याने बाजारपेठेचाही प्रश्न ऐरणीवर आल्याने असलेला पैसा गुंतवण्यासाठी उद्योजक पुढे येत नसल्याचे बुटीबोरी इंडस्ट्रीज असोसिएशनचे सचिव शिरीष कोथालकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.