अचलपूर (जि. अमरावती) ः भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील एका जवानाचा कुलूमनाली परिसरातील पॉइंटवर कर्तव्यावर असताना आगीच्या दुर्घटनेत मृत्यू झाला. ते अचलपूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील रहिवासी होते.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार कैलास कालू दहीकर (वय 27) हे जवान भारतीय सैन्यात 15 बिहारमध्ये कार्यरत होते. बुधवारी (ता. 23) रात्री हिमाचल प्रदेशातील कुलूमनाली येथे कर्तव्यावर असताना आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला. तेथील कडाक्याच्या थंडीपासून बचावासाठी त्यांनी रात्री केरोसीनवर चालणारी शेगडी लावली होती. ते झोपेत असताना आग लागून होरपळून त्यांचा मृत्यू झाला.
श्री. दहीकर यांच्या मृत्यूनंतर आवश्यक ते सोपस्कार आटोपून येत्या दोन दिवसांत त्यांचे पार्थिव नागपूर येथे विमानाने आणले जाणार आहे. त्यानंतर सैन्याच्या वाहनातून पार्थिव त्यांच्या गावी नेण्यात येईल, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रत्नाकर चरडे यांनी दिली.
या घटनेने पिंपळखुटा गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्च्यात पत्नी बबली कैलास दहीकर, दीड वर्षीय मुलगी चैताली कैलास दहीकर, आई मंगराय कालू दहीकर, वडील कालू दहीकर, भाऊ केवल कालू दहीकर, असा परिवार आहे. 2013 मध्ये ते सैन्यात दाखल झाले होते. विविध ठिकाणी त्यांनी सेवा दिली. दरम्यान, माजी आमदार केवलराम काळे गावात दाखल झाले असून प्रशासकीय पातळीवर हालचाल करीत आहेत.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.