उमरेड (जि. नागपूर) : बुधवारी दुपारी ऑनलाईन पद्धतीने जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये अनेकांची परिस्थिती अनुकूल होती. परंतु, उमरेड शहरातील न्यू आयडियल गर्ल्स हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या आदिवासी समाजाच्या तन्नू सूरदास जांभुळे या विद्यार्थिनीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत घवघवीत यश मिळवले. हलाखीची परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षण हेच एकमेव अस्र आहे, हे तन्नूला कळून चुकले होते. त्याच दृष्टीने तिचे प्रयत्न सुरू असताना ऐन परीक्षेच्या तोंडावर तिच्यावर मोठा आघात झाला. त्यातूनही ती सावरली आणि घवघवीत यश मिळविले. जाणून घेऊया तन्नूची यशोगाथा...
स्थानिक एमआयडीसी परिसराच्या शेजारी वसलेल्या कुंभारी या लहानशा गावात तन्नू जांभुळे कुटुंबीयांसह राहते. घरची परिस्थिती बेताचीच. लहानपणापासून हुशार असलेल्या तन्नूला घरची हीच परिस्थिती बदलायची होती. त्यासाठी तिचे प्रयत्नही सुरू होते. दहावीच्या वर्गात प्रवेश करताच तिने सुरुवातीपासून अभ्यासावर भर दिला. घरची परिस्थिती जाणून असल्याने शिकवणी लावण्याकडे तिचा कल नव्हताच. मग शिक्षक जे सांगतील ते करून रोजचा अभ्यास रोज हेच तिचे धोरण होते. वडीलही आपल्या मुलीला कसलीच कमी पडू देणार नाही, असे जेव्हा तिच्या आईला सांगायचे तेव्हा तन्नूला अभ्यासाची जिद्द चढायची. परंतु नियतील हे मंजूर नव्हतेच.
ऐन परीक्षेच्या तोंडावर वडिलांचे अपघाती निधन झाले आणि तन्नूसह संपूर्ण कुटुंबच कोलमडले. आता पुढे काय, हा एकच प्रश्न तिच्या आईला सतावत होता. परंतु आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे हे ठरवलेल्या तन्नूने वडिलांच्या जाण्याच्या धक्क्यातून सावरत संपूर्ण कुटुंबाला आधार दिला. वडील गेल्यानंतर घरची आर्थिक स्थिती अधिक कमकुवत झाली. तेव्हा आईसोबत शेतमजुरीला तिला जावे लागायचे. परंतु अभ्यासाची जिद्द कायम होती. आईवर तिची आणि लहान भावाची जबाबदारी असल्याने तन्नू आईला आर्थिक हातभार लावायची.
बेताच्या आर्थिक परिस्थितीतही तन्नूने जिद्द व चिकाटी कायम ठेवली. घरापासून पाच-सहा किलोमीटरचा प्रवास दररोज पायी करून तिने दहावीचा अभ्यास पूर्ण केला आणि दहावीच्या परीक्षेत तिने तब्बल 87.40 टक्के गुण मिळविले. आज तिच्या यशामुळे तिची आई ताई सूरदास जांभुळे गहिवरल्या. तिने आपल्या वडिलांच्या इच्छा पूर्ण कराव्यात, अशी अपेक्षा जांभुळे यांनी व्यक्त केली.
तन्नू लहानपणापासून हुशार आहे. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे आम्ही तिला सुखसुविधा पुरवू शकलो नाही. आता तर कुटुंबातील कर्ता पुरुषच गेल्याने हातावर आणून पानवर खाणे आहे. तरी आम्ही जिद्द सोडली नाही. मुलीला तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कोणतीही कमी पडू देणार नाही. आई म्हणून मी कुठेही कमी पडणार नाही, अशी भावना ताई जांभुळे यांनी "सकाळ' प्रतिनिधीजवळ व्यक्त केली.
शिकवणी वर्ग नसताना, आईला आर्थिक मदत करून तन्नूने दहावीच्या परीक्षेत तब्बल 87.40 टक्के गुण मिळविले. तिच्य या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. तन्नूला इंजिनिअर व्हायचे आहे. परिस्थितीअभावी तन्नूचे शिक्षण मागे राहू नये, अशी अपेक्षा तिच्या शिक्षकांनी व्यक्त केली. अभ्यासोबतच ती खेळातही अव्वल असल्याचे त्यांनी सांगितले.
संपादन : अतुल मांगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.