वाडी (जि. नागपूर) ः नागपूर जिल्ह्यात भाजपला खिंडार चिन्हे आहेत. हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीर मेघे यांच्या दबावामुळे जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी अन्याय करीत असल्याचे सांगत भाजपचे माजी जिल्हा महामंत्री व वाडीचे माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे यांच्यासह ३१ स्थानिक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाच्या अन्यायकारक धोरणाचा निषेध करीत राजीनामा दिला. भारतीय जनता पक्षासाठी २७ वर्षांपासून अहोरात्र झटून पक्षाला ‘अच्छे दिन’ मिळवून देणाऱ्यांनी पक्ष सोडल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
विविध आंदोलने, मोर्चे, वाडी बंदसारखे प्रमुख विषय घेऊन झाडेंनी पक्षाला परिसरात क्रियाशील ठेवले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून आमदार मेघे व त्यांच्यात वेळोवेळी मतभेद झाले. वाडीतील दवाखान्याच्या मंजुरीसाठी प्रलंबित प्रस्तावाचाही आमदारांनी पाठपुरावा मंत्रालय स्तरावर केला नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे आजही वाडीतील एक लाख जनता आरोग्य सुविधेपासून वंचित असल्याचा आरोप झाडे यांनी केला.
आमदार स्वतः भाजपचे असूनही हेतुपुरस्सर त्यांच्या वार्डला या निधीपासून वंचित ठेवण्यात आले. दरम्यान एका लाच प्रकरणातही आमदारांची भूमिका संशयास्पद असल्याची भूमिका तक्रारकर्त्यांकडूनच उघड झाल्याने वाडीतील पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला.
माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे व वाडीतील भाजपचे पदाधिकारी गणेश राठोड, हिम्मत गडेकर, प्रकाश जुनघरे, मोहन खंडारे, जटाशंकर पांडे यांनी चर्चा व निवेदनाच्या माध्यमातून हा निर्णय अत्यंत दुःखी अंतःकरणाने घेत असल्याचे सांगून पक्षाचे आमदार व पदाधिकाऱ्यांवर दोषारोपण केले.
ज्येष्ठ व कट्टर पदाधिकाऱ्यांवर अन्याय करणे व ही बाब स्पष्ट करूनही आमदार समीर मेघे यांच्या दबावाखाली ज्येष्ठ जिल्हा पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत कोणतीही कारवाई न केली नाही. हे चिंताजनक असल्यामुळे हा निर्णय घेत असल्याचे सांगितले.
या सर्व बाबींचा अहवाल जिल्हा भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून, निवेदन देऊन वारंवार सांगून कार्यवाही झाली नाही आणि न्याय मिळाला नाही. ३१ पदाधिकाऱ्यांनी नुकतीच भाजपचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांना भेटून स्थितीची कल्पना देऊन राजीनामे सादर केले. यावर दोन दिवसांत योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण आज चार दिवस झाल्यानंतर त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे झाडे यांनी सांगितले. लवकरच राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
संपादन - अथर्व महांकाळ
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.