हिंगणा (जि.नागपूर) : नागपूरातील कोरोना हॉटस्पॉट असलेल्या परिसरातील संशयीत रूग्णांना विलगीकरणासाठी हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी परिसरातील डॉ. आंबेडकर वसतिगृहामध्ये आणले. परंतु वानाडोंगरीतील नागरिक, आमदार समीर मेघे व माजी मंत्री रमेश बंग यांनी विरोध करताच जिल्हा प्रशासनाने माघार घेतली. शुक्रवारी रात्री या रूग्णांना वानाडोंगरी येथून हलविण्यात आले.
गावात प्रचंड खळबळ
नागपूर शहरातील सतरंजीपुरा हॉटस्पॉट तोरणा परिसरातील 126 संशयित रुग्ण वानाडोंगरी येथे जिल्हा प्रशासनाने हलविले. संशयित कोरोना रुग्णांना नागपूर शहरातून ग्रामीण भागात हलवल्याने प्रचंड जनआक्रोश निर्माण झाला. नागपूर शहरातून रुग्ण हलविताना वानाडोंगरी येथील स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या नगर परिषदेला विचारणा करण्यात आली नाही. यामुळे नगर परिषद पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेतला. संशयित कोरोना रुग्णांना ठेवण्यात आलेल्या वसतिगृहाजवळ वानाडोंगरीवासींना पाणीपुरवठा करणारी सार्वजनिक विहीर आहे. या विहिरीजवळ सर्व रुग्णांना ठेवण्यात आल्याने प्रचंड दहशत पसरली होती.
स्थानिक लोकप्रतिनिधींनी जनतेची बाजू
50 हजारांवर लोकसंख्या असलेल्या वानाडोंगरीवासींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. शेवटी आमदार समीर मेघे यांच्याकडे नगर परिषद पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या. याची तातडीने दखल आमदार समीर मेघे यांनी घेतली. 24 एप्रिल रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय त्यांनी गाठले. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना निवेदन देऊन तातडीने रुग्ण वानाडोंगरी येथून हलविण्यात यावे, अशी मागणी केली. जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशाराही दिला. सोशल डिस्टन्सिंग पाळत शांतिपूर्ण पद्धतीने आमदार महोदयांनी आंदोलन केले. याची दखल जिल्हा प्रशासनाने घेत अवघ्या दोन तासांनंतर तातडीने येथील रुग्ण नागपूर शहरात हलवण्यात येणार असल्याची माहिती आमदार समीर मेघे यांना दिली. यानंतर आमदार मेघे यांनी जिल्हाधिकारी महोदयांचे आभार मानले.
प्रशासनावर आला दबाव
नागपूर शहर कोरोनामुळे "रेड झोन'मध्ये आले आहे. नागपूर शहरात रुग्णांना ठेवण्यासाठी विलगीकरण कक्ष मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आले आहे. अशी वस्तुस्थिती असतानाही हिंगणा तालुका कोरोनामुक्त असताना हॉटस्पॉट एरियातील रुग्ण ग्रामीण भागात का पाठवण्यात आले, यावरून रणकंदन माजले. दरम्यान, सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जि. प. सदस्य दिनेश बंग यांनीही जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिले. यामुळे प्रशासनावर राजकीय दबाव वाढला. संचारबंदी सुरू असताना आमदार महोदयांनी आंदोलन केल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली.
परिसराचे निर्जंतुकीकरण करणार
वानाडोंगरीतील रुग्ण शुक्रवारी रात्री सातच्या सुमारास हलवण्यात आले. नगर परिषद प्रशासनाने आता वसतिगृहाचा संपूर्ण परिसर निर्जंतुकीकरण करण्याची मोहीम हाती घेतली आहे. दोन दिवसांत ही मोहीम पूर्ण होणार.
भारत नंदनवार
मुख्याधिकारी, वानाडोंगरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.