लसीकरणाच्या दोन डोसमध्ये २८ दिवसांचेच अंतर का? 'हे' आजार असतील तरीही घेऊ शकता लस

why 28 days distance in two dose of corona vaccination
why 28 days distance in two dose of corona vaccination
Updated on

नागपूर : देशाचं ह्दयस्थान असलेल्या नागपुरात कोरोनाचा महामारीचा प्रसार झपाट्याने होत आहे. प्रशासन कोरोनावर नियंत्रणासाठी लॉकडाउनसह टेस्ट ट्रॅक ट्रीट या त्रिसूत्रीनुसार काम करीत आहे. मात्र, कोरोना थांबता थांबेना. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कोरोनाची लस घेणे हेच एक प्रभावी उपाय आहे. कोविशिल्ड असो की, कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचे दुष्परिणाम होत नाहीत हे देशातील सर्वोच्च आरोग्य संस्था असलेल्या 'एम्स'ने स्पष्ट केले आहे. लसीकरणामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढून कोरोना होण्याची शक्यता फारच कमी असते. समजा कोरोना झालाच तर व्हेंटिलेटवर जाण्याची शक्यता नसते. समूह संसर्गावर लसीकरणामुळे नियंत्रण येईल. दुसरी लाट थोपवायची असेल तर लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज असून शालेय मुलांसहित सैराटपणे हुंदाळणाऱ्या युवा पिढीचे लसीकरण झाल्यास कोरोनावर सहज नियंत्रण येईल. 

लसीकरणासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठोस पावले उचलली आहेत. हाफकिन बायोफार्मा कार्पोरेशन आणि हैदराबाद येथील भारत बायोटेक या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने लसीचे उत्पादन करण्याचा १५४ कोटीचा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. यामुळे कोरोना प्रतिबंधासाठी राजधानी मुंबईसह उपराजधानी व इतरही शहरात लसीकरणाला वेग येऊ शकते. सद्या होत असलेल्या लसीकरणाच्या संख्येवर नजर टाकल्यास समाजानेच लसीकरणाबाबत डोळे मिटलेले असल्याचे चित्र आहे. १६ जानेवारीपासून तर आतापर्यंत एक लाख ५२ हजार ७२० नागरिकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. लोकांच्या मनातील गैरसमज दूर केल्यास लसीकरणाची गती अधिक वाढण्यास मदत होईल, असे तज्ज्ञ सांगतात. 

हेही वाचा -

लसीकरण करताना २८ दिवसांचेच अंतर का? 

कोविड लस घेतल्यावर तुम्हाला कोरोना होणार नाही असे नाही. परंतु, शक्यता कमी आहे. लस घेतल्यानंतर त्याचे सकारात्मक परिणाम दिसायला लागतील. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लस कोरोना व्हायरसच्या स्पाईक प्रोटीनमधील अंश घेऊन तयार करण्यात आल्या. पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसानंतर दुसरा डोस घ्यावा लागतो. यामागे शास्त्रीय कारण आहे. पहिला डोस घेतल्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती शरीरात निर्माण होण्यास सुरुवात होते. यानंतर दुसरा डोस घेतल्यानंतर मेमरी सेल अधिक बलशाली होतात. कोरोनापासून बचाव होण्यास मदत होते. 
लसीचा एक डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागतो. २८ व्या दिवशी एक संदेश पाठवण्यात येतो. जेणेकरून लोकांना दुसरा डोस घेण्यासाठी जायचंय हे समजते. मेसेजनंतर दोन-तीन दिवसांनी लस घेतली तरी चालेल. पण, दुसरा डोस घ्यायचा, हे आपणच लक्षात ठेवलं पाहिजे. 

असे होते लसीकरण -

को-विन अ‌ॅपमध्ये नोंदणी केल्यानंतर लसीकरण होण्यास केंद्रावरील कर्मचाऱ्यांसाठी सोयीचे होते. त्यांच्याकडे तसा डाटा तयार असतो. नोंदणी शिवाय लस मिळू शकते. मेडिकलमध्ये वॉक-इन नोंदणी करून लस घेता येते. खासगी रुग्णालयात नोंदणीशिवाय लसीकरणासाठी गेलात तर लस मिळणार नाही. प्रत्येक लसीकरण केंद्राचं चार भागात विभाजन करण्यात आले आहे. 

  • सुरक्षारक्षकांकडून तपासणीनंतर प्रतिक्षालयात प्रवेश 
  • ओळख पटवण्यासाठी विशेष कक्ष 
  • लसीकरण करण्यात येणारी खोली 
  • लसीकरणानंतर निरीक्षण (ऑब्झर्वनशन) केंद्र 


लसीकरणात अडचणी - 

  • को-विन अ‌ॅपचे सर्व्हर डाऊन झाल्यानंतर खोळंबा उडतो. 
  • अद्याप लोकांचा लसीकरणावर १०० टक्के विश्वास नसल्याने 
  • लसीकरणाची गती मंद 
  • एका दिवसाला मर्यादितांचेच लसीकरण 
  • विविध आजारांचे बनावट प्रमाणपत्र आणणाऱ्यांची विनाकारण चाचणी करावी लागते 
  • खासगीतून बनावट प्रमाणपत्र देण्यात येऊ नये 

लसीकरणादरम्यान अशी घ्या काळजी -

  • एका व्यक्तीला दोन डोस देताना कोव्हॅक्सिन घेतली असेल तर त्याच लसीचा दुसरा डोस घ्यावा. 
  • कोविड होऊन गेला असल्यास चार ते सहा आठवड्यांनी लस घ्यावी. लसीचे दोन्ही डोस घ्यावे. 
  • पहिला डोसनंतर लसीची रिअ‌ॅक्शन आली, तर अशा व्यक्तीला दुसरा डोस दिला जात नाही. 

...तर लस घेऊ नये - 

  • अचानक अ‌ॅलर्जीचा त्रास उद्भवल्यास लस घेऊ नये. 
  • अंगात ताप असेल तर लस घेऊ नये. 
  • रोग प्रतिकारक शक्ती कमी असल्यास लस घेऊ नये. 
  • गरोदर महिलांनी आणि स्तनपान करणाऱ्या मातांनी लस घेऊ नये. 

हे आजार असलेल्यांना करता येते लसीकरण -
हृदयविकार, रक्तदाब, श्वसनविकार, हृदय प्रत्यारोपणासह वाल्व बदलेले व्यक्ती, सिकलसेल, बोन मॅरो न झालेले, थॅलेसेमिया, अपंग संवर्गातील मस्कुलर डिस्ट्रॉफी, मूकबधिर, बहुविकलांग,एचआयव्ही बाधित, रक्तवाहिन्यांचे आजारी व्यक्ती, कॅन्सर, किडनी, यकृत प्रत्यारोपण झालेले व्यक्तींनाही लस घेता येते. 

झोननिहाय लसीकरण केंद्र 

झोन रुग्णालय
लक्ष्मीनगर झोन   शासकीय खासगी
  खामला आयुर्वेदिक  स्पंदन हॉस्पिटल धंतोली, शतायू हॉस्पिटल वर्धा रोड, आरोग्यम हॉस्पिटल वर्धा रोड, महात्मे आय हॉस्पिटल सोमलवाडा, कोलंबिया हॉस्पिटल धंतोली, क्रिसेन्ट हॉस्पिटल धंतोली, आरएनएच हॉस्पिटल धंतोली, जी. टी. पडोळे हॉस्पिटल, भामटी रोड, परसोडी, विवेका हॉस्पिटल, सुभाषनगर. 
धरमपेठ झोन इंदिरा गांधी हॉस्पिटल गांधीनगर, केटीनगर प्राथमिक आरोग्य केंद्र, स्टेशन मेडिकेअर सेंटर  सेनगुप्ता हॉस्पिटल रविनगर, आयकॉन हॉस्पिटल अमरावती रोड, लता मंगेशकर हॉस्पिटल बर्डी, बारस्कर हॉस्पिटल रामदासपेठ, सुश्रूत हॉस्पिटल रामदासपेठ, प्लाटिना हॉस्पिटल, सीताबर्डी, क्रीटी केअर हॉस्पिटल सीताबर्डी, म्युर मेमोरिअल सीताबर्डी, मिडास हॉस्पिटल रामदासपेठ, वोक्हार्ट शंकरनगर, क्रीम्स हॉस्पिटल रामदासपेठ, गंगा केअर हॉस्पिटल पंचशील चौक, वर्धा रोड, मेडिट्रिना रामदासपेठ. 
हनुमाननगर झोन ईएसआयसी हॉस्पिटल सक्करदरा, मानेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र, नरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्र.  आरएसटी हॉस्पिटल तुकडोजी पुतळा चौक, केशव हॉस्पिटल मानेवाडा रोड, आपुलकी हॉस्पिटल मानेवाडा रोड. 
धंतोली झोन एम्स मिहान, आयसोलेशन हॉस्पिटल इमामवाडा, बाबुळखेडा आरोग्य केंद्र, मेडिकल  सेंटर पॉईंट हॉस्पिटल मेडिकल चौक. 
नेहरूनगर झोन केडीके आयुर्वेदिक हॉस्पिटल नंदनवन, नंदनवन प्राथमिक आरोग्य केंद्र.  मोगरे चिल्ड्रेन हॉस्पिटल सक्करदरा, गिल्लूरकर हॉस्पिटल सक्करदरा, क्युअर आयटी दिघोरी चौक, सेवन स्टार हॉस्पिटल जगनाडे चौक, चौधरी हॉस्पिटल भांडे प्लॉट. 
गांधीबाग झोन मेयो भोईपुरा, डागा हॉस्पिटल, महाल डायगोनेस्टिक सेंटर  एकही नाही
सतरंजीपुरा झोन मेहंदीबाग प्राथमिक आरोग्य केंद्र, लालगंज आयुर्वेदिक डिस्पेन्सरी.  एकही नाही
लकडगंज झोन बाबुळबन आयुर्वेदिक डिस्पेन्सरी गरोबा मैदान, पारडी डिस्पेन्सरी.  न्यू एरा हॉस्पिटल टेलिफोन एक्स्चेंज चौक, रेडियन्स हॉस्पिटल वर्धमाननगर, राधाकृष्ण हॉस्पिटल वर्धमाननगर, भवानी हॉस्पिटल पारडी. 
आशीनगर झोन पीएमएच हॉस्पिटल बाळाभाऊपेठ, कपिलनगर प्राथमिक आरोग्य केंद्र, आंबेडकर हॉस्पिटल इंदोरा चौक.  होप हॉस्पिटल टेका नाका, विम्स हॉस्पिटल जुना कामठी रोड, एचसीजी कॅन्सर हॉस्पिटल बिनाकी. 
मंगळवारी झोन नारा प्राथमिक आरोग्य केंद्र, इंदोरा प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलिस हॉस्पिटल झिंगाबाई टाकळी, विभागीय रेल्वे हॉस्पिटल रेल्वे स्टेशन, सदर डायग्नोस्टिक सेंटर.  मेडिकेअर हॉस्पिटल मानकापूर, कुणाल हॉस्पिटल मानकापूर, जनता मॅटर्निटी होम जरिपटका, सूरज आय इन्स्टिट्यूट न्यू कॉलनी सदर. 
लसीकरण झालेले आरोग्य सेवक  ३३ हजार २५५ 
लसीकरण झालेले पोलिस, मनपा व इतर अधिकारी, कर्मचारी  १८ हजार ७७९
विविध आजाराने ग्रस्तांचे लसीकरण (४५ ते ६० वयोगट)  २४ हजार ३७३ 
६० वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण  ७६ हजार ३१३ 
दोन्ही डोस घेतलेले नागरिक  ३२ हजार ९९८ 
एकूण लसीकरण  १ लाख ५२ हजार ७२० 


या रुग्णालयांना नाकारली परवानगी  -

खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी मिळाल्यानंतर शहरातील बहुतेक खासगी हॉस्पिटलमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली. परंतु, काही दिवसांतच काही खासगी हॉस्पिटलला महापालिकेने लसीकरणाची परवानगी नाकारली. यात दंदे हॉस्पिटल, ऑरेंज सिटी हॉस्पिटल, किग्जवे, अ‌ॅलेक्सिससह सहा हॉस्पिटलचा समावेश आहे. केंद्र सरकारची पंतप्रधान जनआरोग्य योजना व राज्य सरकारची महात्मा फुले आरोग्य योजना आहे. या योजनेसाठी निवड झालेल्या किंवा राज्य व केंद्र सरकारच्या पॅनलवरील खासगी रुग्णालयांनाच सशुल्क लसीकरणाबाबत मार्गदर्शक तत्व आले. त्यामुळे सहा खासगी रुग्णालयांना सशुल्क लसीकरणाची परवानगी नाकारण्यात आल्याचे महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी सांगितले 

लस घेतली अन् दुसऱ्याच दिवशी कामावर रुजू झालो -
माझं वय पन्नास वर्षे आहे. कोव्हॅक्सिन लसीचे दोन्ही डोस घेतले. मला हृदय विकार आहे. मेडिकलमधील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लस घेतली. ३० दिवस लोटून गेले. लस घेतली त्याच्या दुसऱ्याच दिवशी कामावर रुजू झालो. मला कोणताही त्रास नाही. मात्र, कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी मास्क घालण्यापासून तर अंतर राखण्यापर्यंतचे सर्व नियम पाळतो. याशिवाय वारंवार हात धुण्यासोबतच सॅनिटायझरचा वापर करतो. मी लस घेतली...तुम्हीही लस घ्या 
-विलासराव राठोड 

लस घेतल्यानंतर एकदम ठणठणीत आहे -
मी हेल्थ वर्कर आहे. सेवेदरम्यान कोरोना संसर्गाची भीती आहे. मात्र, फ्रन्ट लाईन वर्कर म्हणून लसीकरणाचा फायदा घेतला. लसीकरणामुळे कोणतेही दुष्परिणाम जाणवले नाही. मी ठणठणीत आहे. पूर्वी ज्या जोमाने काम करीत होती. त्याच जोमाने काम करीत आहे. लसीमुळे काही प्रमाणात का होईना मी निश्चिंत झाली आहे. मला कोरोना होणार नाही, असा मला विश्वास आहे. 
-लता मेश्राम 

निरोगी शहरासाठी जसे बालक सुदृढ असणे गरजेचे आहे. बालकांसहित सर्व नागरिकही सुदृढ असावे. प्रत्येकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी त्यांना सुदृढ बनवण्यासाठी प्रत्येकाने प्रतिबंध (प्रिव्हेंशन), लसीकरण (इम्युनायझेशन), संतुलित आहार (न्यूट्रिशीयन) या 'पीन' मंत्राकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कोरोना काळात लसीकरण सुरू झाल्यानंतर प्रिव्हेंशन (पी), लसीकरण (आय), न्यूट्रिशियन (एन) हा 'पीन' मंत्र बदलत्या वयानुसार बदलतो. या मंत्रानुसार सध्या ज्यांच्यासाठी लसीकरण सुरू झाले त्यांनी लस घ्यावी. विशेष असे की, या मंत्रानुसारच मी लस घेतली आहे. 

-डॉ. अविनाश गावडे, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल, नागपूर. 

नागरिकांनी मनात लसीकरणाबाबत गैरसमज बाळगू नये - डॉ. बारस्कर 

कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन या लसी प्रभावी आहेत. लस घेतल्यानंतर त्याचे सकारात्मक परिणाम दिसायला लागतात. रक्त पातळ होण्याची (ब्लड थिनर्स) औषध घेणाऱ्यांनी लस घेऊ नये हा समाजात पसरलेला गैरसमज आहे. रक्त पातळ होण्याची औषध घेणाऱ्यांनी, मधुमेह व इतर सहव्याधी असलेल्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्यात कोणताही अडथळा नाही. केवळ गर्भवती किंवा बाळ अंगावर पिणारं असेल तर अशा महिलेने तसेच कोवळ्या शिशूंना कोविड लस घेऊ नये. ४५ वर्षे वयानंतरच्या सर्वांनीच लस घ्यावयाची आहे, असे प्रसिद्ध डॉ. जयप्रकाश बारस्कर म्हणाले. 

संपादन - भाग्यश्री राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.