मारुती चितमपल्लींनी आत्मकथनाला 'चकवा चांदण'च नाव का दिले?

why maruti chitampalli autobiography named as a chakwa chandan
why maruti chitampalli autobiography named as a chakwa chandan
Updated on

नागपूर - अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली हे नोकरीच्या निमित्ताने विदर्भात आले आणि विदर्भाचेच झाले. येथील जंगलाशी त्यांची नाळ जुळली. विदर्भ हा वनाने नटलेला प्रदेश आहे. विदर्भाइतकी वनश्रीमंती इतर कुठेही नाही. त्यामुळे विदर्भाचे हे वैभव जगासमोर यायला हवे, याच ध्येयाने त्यांनी विदर्भातील सर्व जंगले पालथी घातली. त्यांनी आदिवसींच्या बोली भाषेतील कितीतरी शब्द मराठी शब्दकोशाला दिले आहेत, ज्या शब्दांचे अर्थदेखील कोणाला माहिती नव्हते. असाच एक शब्द म्हणजे, त्यांचे आत्मकथन 'चकवा चांदण'. त्यांनी त्यांच्या आत्मकथनाला हेच नाव का दिले? असा प्रश्न आपल्याला नक्कीच पडतो.

विदर्भातील तणमोराच्या संशोधनाच्या निमित्ताने ते रानोमाळ भटकत असताना तणमोराची शिकार करणारा पारधी भेटला. डॉक्टर सलीम अली यांच्या पक्ष्यांच्या पुस्तकातील घुबडाचे चित्र पाहून त्याने त्या पक्ष्याचे नाव सांगितले 'चकवाचांदण'. घुबडासारख्या अशुभ समजल्या जाणार्‍या पक्ष्याचे नाव इतके सुंदर, काव्यमय असू शकते याचे शब्दवेड्या चितमपल्लींना आश्चर्य, तसेच आनंद वाटला. साहजिकच त्यांच्या मनात 'चकवाचांदण' या नावाविषयी जिज्ञासा निर्माण झाली. त्यांनी त्या पारध्याला विचारले, 'चकवाचांदण' म्हणजे काय? तो 'साब, ते पखेरू कलमुहा हाय. रानात सांजेला तो बोंबलू लागला की वाटेत आम्हाला चकवा मारतो. आमची रानभूल होते. अशा वेळी आम्ही जिथल्या तिथं बसून राहतो. आभाळात शुक्राची चांदणी दिसू लागते तेव्हा चकवा निघून जातो. आम्हाला वाट सापडते. म्हणून त्याला चकवाचांदण म्हणतो.' चितमपल्लींना नावाचा हा खुलासा आवडला. 'चकवाचांदण' हे नाव त्यांना संधिप्रकाश आणि गूढता यांचे प्रतीक वाटले. चितमपल्लींनी वनविभागातील नोकरी ठरवून स्वीकारलेली नव्हती. चुकून ते या नोकरीच्या आडवाटेच्या वनात आले आणि चालताना त्यांना आयुष्याची सुंदर वाट सापडली. अरण्यातल्या चकव्यानंतर दिसलेल्या उगवत्या शुक्राच्या चांदणीचे सौंदर्य अगदी आगळेवेगळे दिसते, म्हणून मारुती चितमपल्लींनी आपल्या आत्मकथनाचे नाव 'चकवाचांदण' ठेवले. 

विदर्भातील जंगलातून जे हाती लागले त्याला २५ पुस्तकांच्या रुपाने त्यांनी नागपुरातील घरी शब्दबद्ध केले. मात्र, आता त्यांच्या जीवलग शहरात त्यांना आधार देणारे कुणी नसल्याने या व्रतस्थ अरण्याऋषीला वेदनादायी स्थलांतर करावे लागले. शनिवारी त्यांनी जड अंत:करणाने नागपूर सोडून जन्मगाव सोलापूरची वाट धरली. 

मारुती चितमपल्लींचा जन्म -
मारुती चितमपल्लींचा जन्म १२ नोव्हेंबर १९३२ ला सोलापूर येथे झाला. त्यांचे वास्तव्य गुजरातीमिश्रित मराठी बोलणार्‍यांच्या वाड्यात होते. त्यांचे आजोबा सोलापुरातल्या बुधवार पेठेत राहत. तेथे तेलुगू बोलणार्‍यांची वस्ती होती. मुस्लिमबहुल वस्तीही जवळच होती. त्यामुळे आई वडील आणि मुले मराठी, गुजराती, तेलुगू आणि उर्दूमिश्रित हिंदी बोलू लागले. चितमपल्लींच्या वडिलांना वाचण्याची आवड, तर आईला अरण्यवाटांची. आई, वडील, आत्या, मामा यांच्याबरोबर रानवाटेने चालताचालता मारुती चितमपल्लींना जंगलांबद्दल आकर्षण वाटू लागले. आयुष्यभर हरणाची शिकार करणार्‍या भीमाचा मृत्यू हरणासारखा तडफडत झाला, ही आईने सांगितलेली गोष्ट आयुष्यभर विसरता येण्यासारखी नव्हती. आईला पशुपक्ष्यांची खूप माहिती होती. चंडोल ऊर्फ माळचिमणी, कोकिळा ऊर्फ कोयाळ, सातबहिणी ऊर्फ बोलांड्या, लावा ऊर्फ भुरगुंज्या अशी कितीतरी नावे चितमपल्लींना आईकडून ऐकायला मिळाली. हरणाच्या नराला काळवीट आणि लांडग्याच्या मादीला लासी असा नर-मादीतला फरक तिनेच शिकविला. माळढोक हे नाव पहिल्यांदा आईनेच ऐकवले. तिने दिलेले रंगांच्या छटांचे ज्ञान पाखरांच्या आणि फुलपाखरांचे वर्णन करताना मारुती चितमपल्लींच्या उपयोगी पडले. त्यामुळे त्यांना जंगलांची ओढ लागली.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी सोलापूरच्या टी. एम्. पोरे विद्यालयात प्राथमिक, तर नॉर्थकोर्ट टेक्निकल स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला व तेथून ते इंटरमीजिएट सायन्स परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांना इंटरमीजिएट सायन्स पात्रतेनुसार सदर्न फॉरेस्ट रेंजर्स कॉलेज, कोईम्बतूर येथे वनक्षेत्रपाल पदवीसाठी प्रवेश मिळाला. १९५८–६० या कालावधीत त्यांनी वनक्षेत्रपाल पदवीचे शिक्षण पूर्ण केले. सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी येथील वनविभागापासून त्यांच्या नोकरीस सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी महाबळेश्वर, वडगाव(मावळ), नांदेड, इस्लामपूर, अहमदनगर वन विभागातील बोटा, अकोला तालुक्यातील राजूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांच्या हद्दीवर असलेल्या नवेगावबांध, पनवेल आणि पुणे इत्यादी ठिकाणच्या वन विभागांमध्ये कामे केली. त्यांनी नांदेड येथील यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे, पुण्यातील देवळेशास्त्री, पनवेल येथील पं. गजाननशास्त्री जोशी, परशुरामशास्त्री भातखंडे आणि वैद्य वि. पु. धामणकरशास्त्री यांच्याकडे परंपरागत पद्धतीने संस्कृत साहित्याचे अध्ययन केले. तसेच त्यांनी जर्मन आणि रशियन या भाषांचे अध्ययन केले.

मराठी भाषेला शब्दांची देणगी -

अरण्य आणि त्याभोवती विणल्या गेलेल्या विश्वातील कितीतरी घटकांना चितमपल्ली यांनी आपल्या शब्दांमध्ये गुंफले आहे. पक्षी असोत ‌की वनस्पती, कितीतरी नवी नावे केवळ त्यांच्यामुळे मराठी साहित्यात नोंदली गेली आहेत. या मूळ तेलगू भाषिक माणसाने मराठीला सुमारे एक लाख शब्दांचा ‌खजिना उपलब्ध करून दिला आहे. चितमपल्लींनी पक्षीशास्त्रातील अनेक संज्ञांचे मराठी नामकरण केले आहे. जसे कावळ्यांच्या वसाहतीला इंग्रजीत रूकरी, असा शब्द आहे. चितमपल्लींनी त्यासाठी काकागार हा शब्द योजला. तसेच हेरॉनरी (बगळे,ढोकरी ह्या पक्ष्यांची वीण वसाहतला सारंगागार, असा समर्पक शब्द मराठीत तयार केला आहे. रूस्टिंग प्लेससाठी रातनिवारा हा शब्द वापरला आहे. टणटणी (घाणेरी) चे रायमुनिआ तर बहाव्याचे अमलताश हे नाव चितमपल्लींमुळे नागरी वाचकांस माहित झाले.

संपादन आणि संकलन - भाग्यश्री राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.