"नागपूरच्या नावाने कानाला खडा" माजी आयुक्त तुकाराम मुंढे म्हणतात पुन्हा कधी येणार नाही; वाचा त्यांची खास मुलाखत

will not return in nagpur again said tukaram mundhe
will not return in nagpur again said tukaram mundhe
Updated on

नागपूर : गेल्या सात महिन्यांत महापालिका प्रशासनाचे प्रमुख म्हणून तुकाराम मुंढे यांनी कोरोनाची परिस्थती हाताळली. या व्यतिरिक्त त्यांना फारसे काही करता आले नाही. मात्र तेवढेच ते वादग्रस्तही ठरले. गेल्या सात महिन्यांत त्यांनी केलेली कामे, ते करताना सत्ताधाऱ्यांसोबत झालेला वाद, त्यामुळे यंत्रणा राबविताना झालेला मनस्ताप आणि नागपूर शहराची क्षमता याबाबत त्यांनी नागपूर सोडण्यापूर्वी ‘सकाळ'ने घेतलेल्या मुलाखतीत रोखठोक मते मांडली. 

कोरोनासोबत लढताना यंत्रणाच अपयशी करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करीत त्यांनी कुणाचेही नाव न घेता महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवर त्यांच्या शैलीत तोंडसुखही घेतले.

प्रश्न ः तुम्ही नागपुरात आले त्यावेळी शहर कसे करावे, याबाबत तुमच्या काही संकल्पना होत्या काय? तुम्हाला अल्पकाळ मिळाला, यात काही पाऊले उचलली काय?

मुंढे ः नागपूर सर्व वयोगटातील नागरिकांसाठी राहण्यायोग्य तसेच आर्थिकृष्ट्या सक्षम करण्यासाठी नियोजन केले होते. त्यादृष्टीने मी माझा अर्थसंकल्पही दिला होता. शहरातील उद्याने, मैदान, आरोग्य सुविधा, बाजार, पार्किंगची सुविधा, महापालिकेच्या सर्व सेवा मोबाईलवर उपलब्ध करून देण्यासाठी सुरुवात केली होती. सिवेज झोनचा प्रस्तावही महासभेकडे पाठविला होता. पायाभूत सुविधांसह विकास आणि सेवा या तिन्ही आघाड्यांवर काम सुरू केले. नागरिकांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे शहर करण्याचीही इच्छा होती. परंतु ही कामे पूर्णत्वास नेता आली नाही.

प्रश्न ः शहरात कोरोनाची स्थिती भयावह आहे, तुम्हाला काही काळ आणखी मिळाला असता कोरोनावर मात करता आली असती, असे वाटते काय?

मुंढे ः आताच्या स्थितीवर मी भाष्य करणार नाही. परंतु कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी मी एक सिस्टिम तयार केली. त्यावर लक्ष केंद्रित केल्यास नागपुरातील कोरोनाची स्थिती आटोक्यात येऊ शकेल. कोरोनावर नियंत्रणासाठी ट्रेसिंग, टेस्ट आणि ट्रिटींग, हे तीन ‘टी` महत्त्वाचे आहे. यानुसारच माझी सिस्टिम होती. मात्र, मला विरोध करण्यात आला. मी बसविलेल्या सिस्टिमला फेल करण्याचे काम झाले. पाच दिवस सर्वसाधारण सभेमुळे माझ्यासह आरोग्य यंत्रणेची जबाबदारी सांभाळणारेही निराश झाले. कंटेन्‍मेंट झोनचा परिसर मोठा केल्यावरून तसेच लोकांना विलगीकरणात पाठविण्यावरून मला शिव्या देण्यात आल्या. 

लोकांना विलगीकरणात पाठविले म्हणून फायदा झाला. काही लोकांचा जीव वाचविता आला. दुकानातून येणारे ग्राहकांकडून कर्मचाऱ्यांना लागण होऊन कर्मचारी कोरोनावाहक ठरू नये, म्हणून चाचणी करण्याचा आग्रह धरला. पण दुकानदारांनी विरोध केला त्यातून कोरोनाचा प्रसार झाला. दुकानदारांपेक्षा त्यांना समर्थन देणारे आताच्या स्थितीसाठी जबाबदार आहेत. महापालिकेचे दवाखान्यांचा योग्य क्षमतेने वापर, खाजगी रुग्णालयांवर कारवाई केल्यास लोकांसाठी बेड उपलब्ध होऊ शकतात. ट्रेसिंग व टेस्टिंग तत्काळ करायला पाहिजे. मी हेच केले म्हणून सुरुवातीला नागपूर वाचले.

प्रश्न ः समन्वयातून तोडगा निघतो, हे तुम्हाला मान्य आहे काय? मान्य असेल तर पदाधिकारी किंवा इतर समकक्ष अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधून काम का करता आले नाही?

मुंढे ः समन्वयाच्या प्रयत्नात मी कुठेही कमी पडलो नाही. परंतु प्रत्येकाने मी म्हटले तेच योग्य, असा आग्रह धरणे चुकीचे होता. कंटेन्मेंट झोनमध्ये देखरेख ठेवण्याची जबाबदारी होती. तत्कालीन पोलिस आयुक्तांशी बोलून हे ठरविण्यात आले. त्यांनी जे सांगितले ते केले. परंतु भाजी बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी पोलिस आयुक्त व महापौरांनी विरोध केला. त्यांनी केलेल्या सूचना मान्य आहे. परंतु त्यांनी सांगितलेल्या योग्य सूचना स्वीकारल्याच पाहिजे, असे नाही. परिस्थितीनुरूप तसेच कोरोनाच्या स्थितीबाबत दूरदृष्टी ठेऊन मी निर्णय घेतले. मी समन्वयाचा प्रयत्न केला. नागरिकांशी समन्वय साधला, सामाजिक संस्थांशी समन्वयाने परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न केला.

प्रश्न ः नागपुरात तुमचे चाहते मोठ्या प्रमाणात आहेत, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यश आले काय?

मुंढे ः अल्पकाळ, त्यातही कोरोना नियंत्रणावर लक्ष केंद्रित केल्यामुळे चाहतेच नव्हे तर नागरिकांसाठी काही करता आले नाही, ही खंत आहे. लोकांना रोजगार देता येईल, असा प्रस्तावही महासभेकडे पाठविला. दिव्यांगासाठी सात योजना तयार केल्या. सीबीएसई शाळा तयार करून शैक्षणिक दर्जा सुधारण्यावरही लक्ष केंद्रित केले होते. पुढील सहा महिन्यांत ही कामे मार्गी लागली असती. सिवेज लाईनसाठी तीन झोनचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. शहरात एकच पाचशे बेडचे हॉस्पीटल उभारून आरोग्य सेवा सुदृढ करायची होती. जिम तयार करायचे होते. शहरवासींसाठी फार काही करू शकलो नाही, परंतु कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या प्रयत्नातून लोकांचे जीव वाचविले याचे समाधान आहे.

प्रश्न ः विकासाच्या दृष्टीने नागपूरच्या क्षमतेविषयी काय वाटते?

मुंढे ः देशाचे मध्यवर्ती शहर असल्याने नागपूर पर्यटन, शिक्षण आणि मेडिकल हब होऊ शकते. या शहराच्या विकासाच्या दृष्टीनेच मी अर्थसंकल्पात नागपूरचा उल्लेख ‘फ्यूचर सिटी` असा उल्लेख केला होता. प्रशासनाच्या काराभारात बरीच सुधारणा करावी लागणार असून यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागेल. त्यासाठी सुरुवात केली होती.

प्रश्न ः पुन्हा संधी मिळाली तर नागपुरात यायला आवडेल काय?

मुंढे ः मुळीच नाही. नागपूरला आता ‘गूड बाय'. परंतु येथील नागरिकांनी खूप प्रेम दिले. त्यांनी माझे समर्थन करीत प्रतिकूल स्थितीतही माझा आत्मविश्वास वाढविला. त्यामुळे त्यांचे खूप उपकार आहे.

प्रश्न ः तुमच्या शिस्तीमुळे सहकारी अधिकारीही नाराज होतात. या भूमिकेत कधी शिथिलता येईल काय?

मुंढे ः शिस्त आवश्यक आहे. त्यात कुठेही तडजोड करून चालणार नाही. जनहितासाठी व्यक्तिगत फायदा मी बघत नाही. शहराच्या गरजेनुसार तसेच लोकहिताचा माझा प्रयत्न असतो. पण शिस्तीचा अतिरेक नको अन् तो मी केलाही नाही. मी पण संवेदनशील माणूसच आहे. परंतु भावनेने जबाबदारी सांभाळता येत नाही. तडजोड न करता कामे केली तरच जनहित साध्य होऊ शकते.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.