जलालखेडा (जि. नागपूर) : घरचा कर्ता माणूस सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गेला. त्यांनी मागे सोडलेले चिलेपिले व म्हातारी आई यांचे पालनपोषण कसे करावे. तेव्हाच जगणे कठीण होते व आतातर तेही नाहीत, जगावे कसे, असा टाहो नरखेड तालुक्यातील जामगाव (बु.) येथील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीने फोडला.
नरखेड तालुक्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या करण्याच्या घटना सतत होत असतात. यात पुन्हा एका नवीन घटनेची भर पडली. सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एक शेतकऱ्याने पुन्हा आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना तालुक्यातील जामगाव (बु.) येथे घडली. नरखेड तालुक्यातील आदर्श गाव समजले जाणारे जामगाव (बु.) येथील तरुण शेतकरी विजय उर्फ आनंदा बाळकृष्ण बागडे ( वय ३७) यांनी शुक्रवारी (ता. ११) स्वतःच्या शेतात विष प्राशन केले होते.
ही माहिती शेजारच्या शेतकऱ्यांना मिळताच त्यांनी त्याला जलालखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक औषधोपचार करून नागपूरला हलविले. नागपूर येथील शासकीय रुग्णालयात दोन दिवस उपचार चालले. शेवटी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आधीच नापिकी व त्यात त्यांच्यावर असलेला विविध बँकेचा आठ लाख रुपयांच्या कर्जाचा डोंगर, यामुळेच त्यांनी विषाचा घोट घेत आयुष्य संपविले. त्यांच्या मागे त्यांची पत्नी उषा, मुलगी हिमांशी (१३), भावेश (७), तन्मय (३) असा आप्तपरिवार आहे.
या शेतकऱ्याजवळ आठ एकर शेती आहे. या शेतात तो बऱ्याच वर्षांपासून राबत आहे. पण, निसर्गाच्या लहरीपणामुळे नापिकी होत गेली व त्यात कर्जाचा डोंगर चढत गेला. आता या शेतकऱ्याच्या शेतात गहू व कपाशीचे पीक आहे, पण यातून ही काही निघणार नाही.
कुटुंब चालविणे कठीण होईल, तसेच असलेले आठ लाख रुपयांचे कर्ज कसे फेडणार, या निराशेपोटी शेतकऱ्याने विषाचा घोट घेत जीवन संपविले. आता त्याने मागे सोडलेल्या पत्नीवर कुटुंबाची सर्व जबाबदारी आली आहे. कर्ता माणूसच निसर्गापुढे व शासनापुढे हतबल होऊन आपले जीवन संपविले. आता आपण प्रपंचाचा गाढा कसा हाकणार, असा प्रश्न पत्नी हिमांशी हिला पडला आहे.
पंचनामा करून अहवाल पाठविला
तलाठ्याने पंचनामा करून अहवाल पाठविला आहे. त्या शेतकऱ्याची परिस्थिती नाजूक आहे. तरी प्रशासनाच्या नियमानुसार लवकरात लवकर सर्व कार्यवाही करून अहवाल वरिष्ठाकडे पाठविण्यात येईल. शेतकऱ्याच्या कुटुंबाला मदत मिळावी, यासाठी शासनाच्या नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.
- डी. जी. जाधव,
तहसीलदार, नरखेड
संपादन - नीलेश डाखोरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.