यवतमाळ : जानेवारी महिन्यात रोडावलेल्या कोरोना बाधितांच्या संख्येचा आकडा फेब्रुवारी महिन्यात झपाट्याने वाढत आहे. संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून संचारबंदी जाहीर करण्यात आली. वाढत्या बाधितांच्या संख्येने जिल्हा प्रशासनाची झोप उडाली आहे. उपाययोजनांसाठी तारेवरची कसरत पुन्हा सुरू झाली आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात दाखल झालेल्या कोरोनाने सर्वसामान्य जनतेचे कंबरडेच मोडले आहे. पहिल्या टप्प्यात लसीकरणाला सुरुवात होताच नागरिक बिनधास्त झाले. लग्न समारंभ, सण, उत्सव, सार्वजनिक ठिकाणचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला. कोठेही सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्यात आला नाही. परिणामी नागरिकांची हीच बेफिकरी कोरोनाचा संसर्ग वाढविण्यास कारणीभूत ठरली.
प्रशासनाकडून वारंवार काळजी घेण्याच्या सूचना करण्यात येत असताना नागरिक गांभीर्याने पालन करीत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे जिल्हा पुन्हा कोरोना संसर्गाच्या पहिल्या पायरीवर आला आहे. मंगळवारी रेकॉर्डब्रेक २४६ पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने प्रशासनाची चिंता आणखीच वाढली आहे. बंद करण्यात आलेले कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले असून, त्यांची संख्या १७ आहे.
पांढरकवडा, दारव्हा आणि पुसद येथे डेडीकेडेट कोविड सेंटर सुरू आहेत. विविध रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या ४६७ इतकी असून, होम आयसोलेशनमध्ये ७०१ जण आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक ऍक्टिव्ह बाधितांची संख्या १,१३८ वर पोहोचली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी महसूल व आरोग्य यंत्रणेकडून मेगा आढावा घेऊन नियोजन केले जात आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने पुन्हा कन्टेन्मेंट झोनचा पर्याय अवलंबला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ६५ कन्टेन्मेंट झोन यवतमाळ शहरासह तालुक्यात आहे. बाभूळगाव तीन, दारव्हा दोन, दिग्रस १२, पांढरकवडा तीन, पुसद तीन आणि वणीत आठ कन्टेन्मेंट झोन आहेत.
जिल्ह्यात यवतमाळ तालुक्यात सर्वाधिक १५० बाधितांची संख्या आहे. पुसद तालुक्यात २४०, दिग्रस ५२, दारव्हा ७३, आर्णी एक, बाभूळगाव १९, घाटंजी सात, कळंब सहा, महागाव पाच, मारेगाव दोन, नेर १८, पांढरकवडा ९६, राळेगाव, उमरखेड प्रत्येकी एक, वणी नऊ, झरी चार व इतर जिल्ह्यातील आठ बाधितांची नोंद आहे.
गत २४ तासांत जिल्ह्यात दोन मृत्यूसह रेकॉर्ड ब्रेक २४६ जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या १५८ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली. मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ शहरातील ७० वर्षीय महिला आणि दारव्हा तालुक्यातील ८३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच पॉझिटिव्ह आलेल्या २४६ जणांमध्ये १५४ पुरुष आणि ९२ महिला आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ११३८ ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १६५०१ झाली आहे. बरे झालेल्यांची एकूण संख्या १४,९१३ आहे. तर जिल्ह्यात एकूण ४५० मृत्यूची नोंद आहे.
शहरातील दोन नवरदेवांसह एका नवरीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून, दुसऱ्या नवरीच्या अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे. गेल्या काही दिवसांत प्रशासनाने चाचण्या वाढविल्या आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढल्याचे दिसत आहे. एकाच दिवशी दिग्रस तालुक्यात ३५ पॉझिटिव्ह रुग्ण निघण्याचा मागील काही महिन्यातील हा उच्चांक आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.