Naxalite : बारा नक्षल्यांना पोलिसांनी घातले कंठस्नान; दोन पोलिस जखमी

छत्तीसगडमधील कांकेर व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरील वांडोली गावाजवळच्या जंगलात झालेल्या चकमकीत पोलिसांनी १२ माओवाद्यांना घातले कंठस्नान.
Naxalite
Naxalitesakal
Updated on

गडचिरोली - छत्तीसगडमधील कांकेर व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरील वांडोली गावाजवळच्या जंगलात झालेल्या चकमकीत पोलिसांनी १२ माओवाद्यांना कंठस्नान घातले आहे. या चकमकीत एक पोलिस उपनिरीक्षक व एक जवान असे दोघे जखमी झाल्याचे वृत्त आहे. सर्व माओवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले असून त्यापैकी माओवाद्यांचा विभागीय कमांडर लक्ष्मण आत्राम याची ओळख पटली आहे. बाकी मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

छत्तीसगड सीमेवरील वांडोली गावात १२ ते १५ माओवादी तळ ठोकून असल्याची गोपनीय माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्या माहितीवरून माओवाद्यांच्या शोधासाठी बुधवारी (ता. १७) सकाळी १० वाजता गडचिरोली येथून अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यांच्या नेतृत्वात सात सी-६० पथकांना वांडोली गावात पाठवण्यात आले होते.

दुपारी पोलिस गावात पोहचताच नक्षल्यांनी पोलिसांवर जोरदार गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही त्याला जोरदार प्रत्युत्तर देणे सुरू केले. गोळीबार दोन्ही बाजूंनी काही काही वेळाने होत होता. संध्याकाळी उशिरापर्यंत ६ तासांहून अधिक काळ ही चकमक सुरूच होती.

नक्षल्यांकडून गोळीबार थांबल्यानंतर पोलिसांनी परिसरात शोध मोहीम राबविली. या मोहिमेत उशिरापर्यंत १२ माओवाद्यांचे मृतदेह सापडले. आसपासच्या जंगलात आणखी काही मृतदेह आहेत का, याचा शोध सुरू आहे.

पोलिस शोधात आतापर्यंत तीन एके-४७, दोन इन्सान्स रायफल, १ कार्बाइन, १ एसएलआर यासह ७ ऑटोमोटिव्ह शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. माओवाद्यांचा विभागीय कमांडर लक्ष्मण उर्फ विशाल आत्राम हा मृत माओवाद्यांपैकी एक असल्याची ओळख पटली आहे. तो टिपागड दलमचा प्रभारी होता. अन्य माओवाद्यांची ओळख पटविणे सुरू आहे.

या चकमकीत सी-६० पथकातील एक पोलिस उपनिरीक्षक आणि एक जवान गोळी लागून जखमी झाले आहेत. ते धोक्याबाहेर असून त्यांना बाहेर काढण्यात आले. तसेच त्यांना तातडीने नागपूरला हलवण्यात आले आहे.

मर्दीनटोल्यातील चकमकीसारखे यश

बुधवारच्या चकमकीची तुलना कसनासूर आणि पयडी जंगलातील चकमक तसेच मर्दीनटोल्याच्या जंगल परीसरातील चकमकींशी केली जात आहे. १३ नोव्हेंबर २०२१ रोजी कोरची तालुक्यातील गॅरापत्ती पोलिस मदत केंद्र हद्दीतील बोटेझरी- मर्दीनटोला जंगल परिसरात पोलिस व माओवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली होती. यात पोलिसांनी २६ नक्षल्यांना ठार केले होते. ही चकमक याच चकमकींच्या तोडीची मानली जात आहे.

त्यापूर्वी २२ एप्रिल २०१८ रोजी भामरागड तालुक्यातील कसनासूर व दामरंचा जंगल परिसरात झालेल्या चकमकीत तब्बल ४० नक्षल्यांना पोलिसांनी ठार केले होते. तर त्याच वर्षी २१ मे रोजी एटापल्ली तालुक्यातील पयडी जंगलात पोलिसांनी १३ नक्षल्यांचा खात्मा केला होता.

बुधवारी (ता. १७) झालेल्या चकमकीत १२ माओवादी ठार झाले. ही अलीकडे झालेली मोठी चकमक आहे. या वर्षी जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत पोलिसांनी १९ माओवाद्यांना कंठस्नान घातले आहे. यापूर्वी झालेल्या कतरनगट्टा आणि मोदुमुडगू या गावांतील दोन चकमकींत एकूण ७ माओवादी ठार झाले होते.

पथकाला ५१ लाखांचे बक्षीस

राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज बुधवारी दुपारी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे एका कार्यक्रमात हजर होते. या कार्यक्रमातच पोलिस अधीक्षकांनी या चकमकीची माहिती मला दिली होती, असे फडणवीसांनी त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. पोलिसांच्या या यशस्वी कामगिरीचे त्यांनी कौतूक केले असून या अभियानात मिळवलेल्या यशाबद्दल सी-६० कमांडो आणि गडचिरोली पोलिसांना त्यांनी ५१ लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.