तिला नको दिवाळीच्या सुट्ट्या, ना पगार; फक्त हवे विद्यार्थी, फळा अन् वर्गखोली

12th class girl teach student in tulajapur village of amravati12th class girl teach student in tulajapur village of amravati
12th class girl teach student in tulajapur village of amravati12th class girl teach student in tulajapur village of amravati
Updated on

चांदूररेल्वे (जि. अमरावती):  तिला दिवाळीच्या सुट्ट्या नको, ना पगार, ना कोरोनाचे कारण ना अशैक्षणिक कामांची चिंता. कोण आले, कोण गेले याचीही तिला जाणीव नसते. समोर विद्यार्थी, फळा आणि दोघांच्यामध्ये ती आपल्या शिक्षणाच्या कार्यात मग्न असते. ही कौतुकास्पद कहाणी आहे, चांदूररेल्वे तालुक्याच्या तुळजापूर गावातील ऋतिका ठाकरे या विद्यार्थिनीची...

तालुक्‍यातील तुळजापूर या गावात जिल्हा परिषद शाळेला गटशिक्षणाधिकारी आणि विषय साधनव्यक्ती यांनी भेट दिली. तेव्हा वर्ग 12 वी मध्ये शिकणारी शिक्षकमित्र ऋतिका ठाकरे गावातील विद्यार्थ्यांना शिकवित होती. सर्वत्र लॉकडाउनमुळे विद्यार्थ्यांच्या शाळा बंद आहेत. शिक्षण विभाग शाळा बंद असताना  विविध मार्गांनी शिक्षण सुरू ठेवत आहे. सर्व शिक्षकही नाइलाजाने गेल्या चार ते पाच महिन्यांपासून विद्यार्थ्यांपासून लांब आहेत. अशात प्रशासनाच्या निर्देशाप्रमाणे प्रत्येक गावात विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शिक्षकमित्रांची नेमणूक केली. ते शिक्षकमित्र गावातील विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधील दुवा म्हणून काम करीत आहेत. पण ऑनलाइनचा ग्रामीण भागात पाहिजे तसा प्रतिसाद नसल्याने तुळजापूर गावातील ऋतिका ठाकरे या तरुणीने शाळेतील पटांगणाला वर्गखोलीचे स्वरूप दिले व सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर करत तिला जमेल त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकविणे सुरू केले. 

गेल्या दोन महिन्यांपासून अविरत ती विद्यार्थ्यांची शाळा घेत आहे. यातून आपल्याला काय मिळेल, फायदा काय, याचे काहीही सोयरसुतक तिला नाही. माझ्या गावातील मुले शिकली पाहिजे, इतकीच तिची जिद्द तिच्या बोलण्यातून जाणवत होती. विद्यार्थीही दीदी दीदी म्हणून तिला प्रत्येक अडचणी विचारत होते. तालुक्‍यातील प्रत्येक गावात शाळा बंद असताना शिक्षण सुरू राहावे, यासाठी गटसाधन केंद्रातर्फे सततचा पाठपुरावा सुरू आहे. अनेक ठिकाणी शिक्षक व शिक्षकमित्रांचा आढावाही घेणे सुरू आहे. सुरुवातीच्या काळात सर्वच गावात शिक्षकमित्रांनी उत्स्फूर्तपणे काम केले, तर काही ठिकाणी पालकांनीच शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली होती. पण तुळजापूरच्या ऋतिकाने शिक्षकांच्या आणि शिक्षण विभागाच्या पुढे जाऊन आपले गाव व विद्यार्थ्यांप्रती असलेली कृतज्ञता दाखवून दिल्याचे दिसून येत आहे.

हळूहळू कोरोनाचे संकट कमी होत असल्याने  तालुक्‍यातील शिरजगाव केंद्राला भेट देऊन शाळांची परिस्थिती जाणून घेतली. त्यावेळी तुळजापूर येथे गावातील ऋतिका ठाकरे ही वर्ग 12 वीत शिकणारी तरुणी शाळेच्या पटांगणात शाळेतील काही विद्यार्थ्यांना शिकवित असल्याचे दिसून आले. तिने शाळा बंदच्या काळात उचललेली ही जबाबदारी खरंच कौतुकास्पद आहे. तिच्यापासून शिक्षकांनी व गावातील इतरांनी प्रेरणा घ्यावी, असे तिचे कार्य आहे.
-मुरलीधर राजनेकर, गटशिक्षणाधिकारी.

संपादन - भाग्यश्री राऊत
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.