मांजरखेड कसबा (जि. अमरावती) : साधारणतः १३ वर्षांपूर्वी अभिषेक बच्चन यांची मोबाईलवरून विद्यार्थ्यांना शिकविण्याची जाहिरात झळकली होती. त्यावेळी असा कोणीही विचार केला नसेल की, २०२० मध्ये संपूर्ण वर्षभर विद्यार्थ्यांना मोबाईलवरून शिकवावे लागेल. पण हे प्रत्यक्षात खरे उतरले आहे. आता मोबाईलचा वापर करून विद्यार्थ्यांचे स्वयंमूल्यमापनसुद्धा होत आहे. आज राज्यातील तब्बल ३० लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी स्वाध्याय पोर्टलवर नोंदणी केली असून विद्यार्थी आपल्या सवडीनुसार 'स्वाध्याय' सोडवत आहेत.
राज्यातील शिक्षण विभागाद्वारा वर्षभरापासून विद्यार्थ्यांचे शिक्षण निरंतर सुरू राहावे, म्हणून शाळा बंद; पण शिक्षण सुरू आहे. टिलीमिली, गोष्टीचा शनिवार आदीसारखे अनेक उपक्रम ऑनलाइन व ऑफलाइन स्वरूपात राबविले गेले. विविध माध्यमातून दिल्या गेलेल्या शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांचे शिक्षण होत आहे किंवा नाही. पुढील वर्षी होणाऱ्या परीक्षेची तयारी व्हावी म्हणून स्वाध्याय उपक्रमाला ३ नोव्हेंबरपासून सुरुवात केली. आजपर्यंत स्वाध्याय पोर्टलवर सुमारे ३० लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दर आठवड्याला १५ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी नियमित स्वाध्याय सोडवत आहेत. यामध्ये १७ व्या आठवड्यात जळगाव, बुलडाणा, नांदेड, सांगली, सोलापूर हे जिल्हे आघाडीवर आहेत.
स्वाध्याय म्हणजे काय? -
स्वाध्याय ही मूल्यमापन पद्धती आहे. ज्याद्वारे एका मोबाईलवर १०० विद्यार्थ्यांना स्वयंमूल्यमापन आपल्या सोयीनुसार करता येते. यामध्ये इयत्ता पहिली ते दहावीमधील भाषा, गणित व विज्ञान विषयातील प्रश्नांचा समावेश आहे. मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यमांत हे प्रश्न उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदाच एका विषयावर आधारित १० पर्यायी प्रश्न सोडवायचे आहेत.
अध्ययन निष्पत्तीवर भर -
स्वाध्यायद्वारा विद्यार्थ्यांची प्रगती, शाळा, तालुका, जिल्हा व राज्याची सद्यःस्थिती कळते. प्रत्येक विद्यार्थ्याला तो कुठे बरोबर व कुठे चुकला, यासाठी उत्तराची पीडीएफ मिळत आहे. विद्यार्थ्यांचा स्वयंमूल्यमापनातून अध्ययन निष्पत्तीचा सराव होत असल्याने आगामी राष्ट्रीत सर्वेक्षण चाचणी साहाय्यभूत ठरणार असल्याचे विद्या परिषदेचे उपसंचालक रमाकांत काठमोरे यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.