आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचा प्रवास नको रे बाबा, रस्त्याच्या दूरवस्थेमुळे वाढले अपघाताचे प्रमाण

accident increases due to dangerous aalapalli sironcha highway in aheri
accident increases due to dangerous aalapalli sironcha highway in aheri
Updated on

अहेरी (गडचिरोली): अहेरी मुख्यालयापासून आलापल्ली ते सिरोंचापर्यंत शंभर किलोमीटरचा रस्ता हा 153 क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गामध्ये मोडतो. मात्र, या महामार्गाची दूरवस्था ग्रामीण भागातील पायवाटेपेक्षाही दयनीय झाली असून ठिकठिकाणी खड्डे असल्यामुळे अपघात वाढले आहेत. त्यामुळे या महामार्गावरचा प्रवास जीवघेणा झाला आहे.

हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग आहे. मात्र, या रस्त्याची अवस्था एखाद्या खेडेगावातील रस्त्याहूनही बिकट झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे.  या वाईट अवस्थेतील मार्गामुळे अनेक अपघात घडण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच काही अपघातात नागरिकांना जिवालाही मुकावे लागले. या मार्गावर इतक्‍या प्रमाणात अपघात होत असतानासुद्धा प्रशासन मात्र निद्रावस्थेत आहे. या मार्गावरून आंतरराज्यीय मालवाहतूक वाहने रात्रंदिवस चालतात. यात आंध्र प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश अशा अनेक राज्यात मालवाहतूक केली जाते. त्यामुळे या मार्गाची दूरवस्था झालेली आहे. येथे अतिरिक्त भार घेऊन वाहतूक होत असतानाही संबंधित विभागाने कधीच लक्ष दिले नाही. हा मार्ग दिवसेंदिवस दयनीय अवस्थेत जात असतानाही राज्य व केंद्र शासनाने सोबतच स्थानिक आमदार व खासदार यांनी कोणताही पाठपुरवठा केला नाही.

सध्या या मार्गाची भयानक अवस्था पाहून अनेकांनी या मार्गाचा वापरच बंद केला आहे. पण, सिरोंचाहून अहेरी किंवा गडचिरोली मुख्यालयात विविध शासकीय व इतर कामांसाठी अनेक नागरिकांना सतत ये-जा करावी लागते. मात्र, या मार्गाने प्रवास करताना त्यांची हाडे खिळखिळी होत आहेत. दीड ते दोन फुटांचे मोठे खड्डे असल्याने वाहनांचे संतुलन बिघडते. अनेकदा वाहने खड्ड्यात फसतात. पूर्वीच्या वेळेपेक्षा आता या मार्गाने प्रवासाला दुप्पट वेळ लागत आहे. याशिवाय सिरोंचा तालुक्‍यात कुणी आजारी असल्यास अशा गंभीर आजारी रुग्णाला अहेरी उपजिल्हा रुग्णालयात किंवा गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात आणणे जवळपास अशक्‍य झाले आहे. रस्त्याच्या वाईट अवस्थेमुळे रुग्णवाहिकेतच अनेकदा रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. 

या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी शिवसेनेच्या एकमेव शिवसैनिकाने रास्ता रोको आंदोलन करून समस्येकडे लक्ष वेधले होते. पण, त्यांचीही केवळ आश्‍वासनावर बोळवण करण्यात आली. इतर सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी कुणीही या समस्येकडे लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.

पर्यटनावर परिणाम -
आलापल्ली-सिरोंचा महामार्गावर कमलापूर हत्ती कॅम्प, रानम्हशींचे कोलामार्का संरक्षण क्षेत्र, देचलीपेठा परिसरातील गिधाडांच्या विणीचे ठिकाण, अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत. शिवाय सिरोंचा तालुक्‍यात ब्रिटिशकालीन विश्रामगृह इतर ऐतिहासिक इमारती, वडदम जिवाश्‍म पार्क, सोमनूर संगम, श्री क्षेत्र कालेश्वर अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटनस्थळाला वर्षभर पर्यटक भेट देत असतात. पण, या महामार्गाच्या दुरवस्थेमुळे पर्यटक फिरकेनासे झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.