महागाव : बहिणीच्या निधनाचे वृत्त ऐकून शोकाकूल झालेला भाऊ तिच्या अंत्यविधीसाठी आला, परंतु बहिणीच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यापुर्वीच राज्यमार्गावर झालेल्या भीषण अपघातात भावावर मृत्यूने झडप घातली. बहिणीच्या निधनानंतर भावाचा झालेला अपघाती मृत्यू काळजाला चटका लावून गेला असून या हृदयद्रावक घटनेने समाजमन हळहळले आहे.
प्राप्त माहितीनुसार अंबोडा येथील सयाबाई मुनेश्वर यांचे काल निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज दुपारी करण्याचे ठरले होते. नातवाईकांना निरोप पाठविण्यात आले. बहिणीच्या निधनाचे वृत्त कळताच मृतक सयाबाईचे सख्खे भाऊ भीमराव पुनवटकर हे आष्टा ता. माहूर येथून मिळेल त्या वाहनाने अंबोडा येथे येण्यासाठी निघाले.
भीमराव पुनवटकर यांना येण्यास विलंब होत असल्याने बराच वेळ प्रतिक्षा करून सयाबाई मुनेश्वर यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. दरम्यान भीमराव पुनवटकर हे अंबोडा उड्डाणपुलावर वाहनातून उतरले. यावेळी बहिणीची अंत्ययात्रा नेमकी पुलाजवळ पोहचली होती. येथेच मृत्यू काळ बनून दडून बसला होता.
भीमराव पुनवटकर घाईघाईत उड्डाण पुलावरून रस्ता ओलांडत असताना विरुद्ध दिशेने भरधाव वेगात आलेल्या एमएच २६ बीसी ०९४८ क्रमांकाच्या बोलेरो जीपगाडीने भीमराव पुनवटकर यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ते कित्येक फूट दूरवर फेकल्या गेले. अपघातानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव बोलेरोही पलटी झाली.
या बोलेरो गाडीतून तामसा येथील शेटे कुटुंबातील भाविक माहूर गडावर देवदर्शनाला जात असल्याचे कळते. बोलेरोच्या अपघातात किमान ५ जण जखमी झाले. उडाणपुलावर वाहनाच्या अपघाताचा जोरदार आवाज ऐकूण सयाबाईची तिरडी जागीच ठेऊन अंत्ययात्रेतील लोक पुलाकडे धावले.
या अपघातात सयाबाई मुनेश्वर यांचे सख्खे भाऊ भीमराव पुनवटकर गंभीर जखमी झाल्याचे कळताच नातेवाईकांनी हंबरडा फोडला. नेमके यावेळी महागाव तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष गणेश भोयर कुटुंबियांसह यवतमाळला जात होते.
त्यांनी लगेच घटनास्थळी जखमींना मदतीचा हात दिला. अँबुलंस पाचारण करून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. यवतमाळ येथे शासकीय रुग्णालयात भीमराव पुनवटकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बहिणीच्या अंत्यविधीस आलेला सख्खा भाऊ,तिचे अंत्यदर्शन घेण्यापूर्वीच अपघातात मृत्युमुखी पडल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.
भीमराव पुनवटकर होते झुंजार पत्रकार
अपघातात मृत्युमुखी पडलेले भीमराव पुनवटकर हे झुंझार पत्रकार होते. त्यांनी आता आंबेडकरी चळवळीत स्वतःला वाहून घेतले होते. ते स्वतः एका साप्ताहिकाचे संपादक होते,तसेच वृत्तपत्रासाठी वार्ताहर म्हणून काम केल्याची माहिती मिळाली आहे.
सयाबाईंच्या पार्थिवार शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
पुलावर अपघात झाल्यानंतर सयाबाईची तिरडी जागीच ठेऊन गावकऱ्यांनी मदतीसाठी पुलाकडे धाव घेतली होती. या अपघातात सयाबाईचे भाऊच गंभीर जखमी झाल्याचे कळताच वातावरण अधिकच शोकाकुल झाले. अपघातग्रस्तांना उपचारासाठी पाठविल्यानंतर सयाबाईच्या पार्थिवावर साश्रूनयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.