नवेगावबांध (जि. गोंदिया) : गोंदिया-भंडारा जिल्ह्यात विस्तारलेल्या नवेगाव-नागझिरा अभयारण्यात पर्यटकांना फिरण्यासाठी सध्या पर्वणीच ठरली आहे. नवेगाव राष्ट्रीय उद्यान पर्यटकांसाठी खुले झाले असून, पर्यटक सहकुटुंब या ठिकाणी भेटी देत आहेत. अनलॉकअंतर्गत एक नोव्हेंबरपासून राष्ट्रीय उद्यान व न्यू नागझिरा नवेगाव व्याघ्र संरक्षण प्रकल्प पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. अभयारण्यात वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ झाल्याने आता हमखास प्राणी पहावयास मिळतात. त्यामुळे नवेगाव नागझिरा अभयारण्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे.
नवेगावबांध अभयारण्यात जाण्यासाठी बकी गेट, खोली गेट, जांभळी गेट, पितांबरटोला गेट तयार केले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरून जाण्यासाठी कोहमारा येथून तीन किलोमीटर अंतरावरून बकी गेट ही सोयीची आहे. नवेगाव अभयारण्यात जाण्यासाठी खोली, बकी, जांभळी व पितांबरटोला गेटची निर्मिती करण्यात आली आहे.
चुटीया गेट मात्र बंद करण्यात आला आहे. बकी गेटने पुढे गेल्यास थात्रेमारी बोअरवेल, गोपीचुहा, बदबदा झरी, बोद्राई झरी, टी. के. पॉइंट परिसर, झलकारगोंदी तलाव, राणीडोह, आगेझरी, काळीमाती कुरण, काटेथुआ, कमकाझरी, चोपण बोअरवेल आहे.
या राष्ट्रीय उद्यानालगत नवेगावबांध तलावाचे क्षेत्रफळ ११ चौरस किमी आहे. अठराव्या शतकात कोलू उर्फ कवळू पाटील डोंगरवार यांनी हे तलाव बांधले होते. सात पहाडांच्या मध्यभागी वसलेले हे तलाव पर्यटकांना भुरळ घालते. प्रशिक्षित मार्गदर्शकांबरोबरच या ठिकाणी पर्यटन संकुलात पर्यटक निवासाची व्यवस्थादेखील केलेली आहे. तसेच उपाहारगृहदेखील आहेत. लागहट, संजय कुटी, युथहोस्टेल, विश्रामगृहाची व्यवस्था आहे.
नागझिरा अभयारण्यात जाण्यासाठी पिटेझरी गेट, चोरखामारा गेट व मंगेझरी गेट या ठिकाणावरून गेट आहे. त्यात टायगर रोड, चित्तर मार्ग रोड, बैसान रोड, तिब्बत रोड, सातमोडी रोड, घाटमारा रोड आदी रस्त्यांनी जंगल सफारी केल्यास प्राणी पहावयास मिळतात. यात सुमारे दोनशेच्या जवळपास पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे.
बिबट्या, नीलगाय, वाघ, हरीण, अस्वल, सांबर, चितळ, उडणारी खार, मोर, भूस्तरिखा, सोंपाठीसुतार, तांबट सुतार, मराठा सुतार, लावा, वेडा राघू, रॉबिन, सातभाई, नीलकंठ, तितर, हरीयल आदी पक्षी व वन्यप्राण्यांचे अभयारण्यात वास्तव्य आहे.
संपादन - नीलेश डाखोरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.