अखेर त्या अनाथ पिल्लास मिळाली आई !

monkey final
monkey final
Updated on

दर्यापूर (अमरावती) : स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, हे केवळ माणसांनाच लागू आहे असे नसून ते सर्वप्राणीमात्रांनाही लागू आहे. बालपणी तर मातृत्वाची नितांत गरज असते. जन्मदात्या आईच्या कुशीत व उबदार मायेत राहणा-या सा-या पिल्लांना आई हवी असते. मातासुद्धा वात्सल्याने पिल्लास सतत सोबत ठेवत असते. प्रसंगी रक्षणही करते. अशा आईचाच मृत्यू झाल्यास ते पिलू सैरभैर होते.

दर्यापुरातील बनोसा भागातील राठीपु-यामध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून माकडांचा कळप खाद्याच्या शोधात येत होता. त्यादिवशी या कळपात नुकत्याच जन्म दिलेल्या आपल्या चिमुकल्या पिल्लास घेऊन एक माकडीण खाद्यान्नाच्या शोधात आली.
या घरावरून त्या घरावर उड्या घेताना पिल्लासह या माकडीणचा स्पर्श विद्युत तारांना झाला. त्यास चिकटल्याने जिवाच्या आकांताने तिचे ओरडणे सुरू झाले. आसपासच्या नागरिकांनी तिला वाचविण्यासाठी प्रयत्नही केले. त्यात हे चिमुकले पिल्लू मात्र निसटून खाली पडले. अखेर त्या संघर्षात माकडीणचा मृत्यू झाला अन्‌ ती खाली पडली.

चिमुकले पिल्लू आई जवळ जात तिला उठविण्यासाठी प्रयत्न करीत होते. जिवाच्या आकांताने त्या पिल्लाने आईला आवाज देणे सुरू केले. या आवाजाने आसपासची माकडेसुद्धा जमली. मृत माकडीणला बघून इतर माकडे निघून गेली. पिल्लू मात्र आपल्या आईच्या मृत शरीरावर मान टेकून अश्रू गाळीत होते. या ठिकाणापासून जवळच गाडगेबाबा वसतिगृह आहे, तेथील रोहिणी देशमुख व विद्यार्थ्यांनी या चिमुकल्या पिल्लास प्रथमोपचारार्थ वसतिगृहात आणले. चेतना हरविल्याप्रमाणे ते पिल्लू केवळ बघत होते. मातृत्व हरविल्याचे दुःख त्याच्या वागण्यात दिसून येत होते. रोहिणी देशमुख यांनी त्यास मलमपट्टी करीत खाऊपिऊ घातले. दुस-या दिवशी वनविभागाच्या स्वाधीन करण्याचे ठरविले. रात्रभर त्या पिल्लाने आईच्या आठवणीत सतत ओरडा केला. मुलांनीसुद्धा त्याची काळजी घेतली.

पहाट उगवताच पुन्हा माकडांचा कळप परिसरात आला, त्यात काही इतर माकडीणी होत्या.वसतिगृहातील मुलांनी त्या पिल्लास गच्चीवर नेले व मोकळे सोडले. पिल्लाने ओरडायला सुरुवात केली. माकडे त्याच्या भोवती जमा झाली.

सविस्तर वाचा - तुम्हाला माहिती आहे? महाराष्ट्राची छवी राजावत कुठे राहते...

या सगळ्यांमध्ये ते पिल्लू आपली आई शोधत होते. आर्तस्वरांनी आईला साद घालीत होते. पिलास बघून एका माकडीणचे मातृत्व जागे झाले. ती त्याच्या जवळ आली. घिरट्या घातल्या अन्‌ त्या पिल्लाने चक्क तिला मिठी मारली. आई भेटल्याचा अतीव आनंद या मिठीतून व्यक्त होत होता. वसतिगृहातील सारेच लोकं हा हृदयद्रावक प्रसंग बघत होते. सा-यांची मने भरून आली होती. काहींच्या डोळ्यांतून पाणी वाहत होते. माकडीणने त्या पिल्लास घट्ट कवटाळले अन्‌ आपल्या पोटाशी घेत उड्या मारीत रानाच्या दिशेने निघून गेली. त्या अनाथ पिलास पुन्हा मातृत्व मिळाल्याचे समाधान गाडगेबाबा वसतिगृहातील सा-यांच्या चेह-यावर उमटले होते.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.