गडचिरोली : ज्या शेतकऱ्यांनी उत्तम प्रकारे शेती करून समाजापुढे आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, अशा शेतकऱ्यांना जर विस्तार कार्यामध्ये सहभागी करून घेतले तर कृषी विस्ताराचे कार्य अधिक प्रभावी होऊ शकेल, या उद्देशाने कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेवरून राज्यात शेतकऱ्यांची रिसोर्स बँक स्थापन करण्यात आली आहे. राज्यातील या रिसोर्स बँकेतील सर्व शेतकऱ्यांशी कृषिमंत्री दादाजी भुसे सोमवार (ता. 7) संवाद साधणार आहेत.
राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी कृषी विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून सद्य:स्थितीत काही शेतकरी अभिनव उपक्रम, तंत्रज्ञान, सुधारित शेती पद्धत वापरून उत्पादन व उत्पन्नात वाढ करत आहेत, अशा शेतकऱ्यांचा आदर्श इतर शेतकऱ्यांपुढे ठेवणे. कृषी विभागाने अभिनव उपक्रम, तंत्रज्ञान, शेती पद्धतीचा उपयोग इतर शेतकऱ्यांना होण्याच्या दृष्टीने विस्तार कार्य हाती घेणे, अशा अभिनव उपक्रमशील शेतकऱ्यांबरोबरच विविध कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी, पीक स्पर्धा विजेते शेतकरी यांच्या माध्यमातून इतरांना प्रेरणा देणे या उद्देशाने राज्यातील शेतकऱ्यांची रिसोर्स बॅंक तयार करण्यात आली आहे.
नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या एकूण 3606 शेतकरी बंधू भगिनींची रिसोर्स बँक यादीचे अनावरण मंत्री (कृषी) यांच्या हस्ते 5 जुलै 2020 रोजी करण्यात आले आहे. याबरोबरच विविध कृषी पुरस्कार विजेते व पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार सद्य:स्थितीत एकूण 5009 शेतकऱ्यांची रिसोर्स बॅंक तयार करण्यात आली आहे. याशिवाय राज्यातील सर्व जिल्ह्यातील रिसोर्स बॅंकेतील शेतकरी तसेच कृषी विभागाचे अधिकारी/कर्मचारी यांचे जिल्हानिहाय व्हाट्स ऍप ग्रुप तयार करण्यात आलेले असून त्याद्वारे शेतकऱ्यांमध्ये तंत्रज्ञान देवाणघेवाण व मार्गदर्शन करण्यात येत आहे. सोमवार दुपारी 3 वाजता कृषी विभागाच्या ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट जीओएम या यूट्यूब चॅनेलवर क्लिक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन गडचिरोली कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.