अमरावती जिल्हा दुष्काळाच्या श्रेणीत; १,९६० गावांतील पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी

Amravati district in the category of drought Farmers news
Amravati district in the category of drought Farmers news
Updated on

अमरावती : जिल्ह्यातील चौदा तालुक्‍यांतील १,९६० गावांतील पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी म्हणजे ४६ पैसे इतकी जाहीर झाली आहे. त्यामुळे अमरावती जिल्हा दुष्काळी जिल्ह्याच्या यादीत आला आहे. शेतकऱ्यांना शासकीय सवलती व योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग सुकर झाला आहे. पैसेवारी जाहीर झाल्याने दुष्काळावर अप्रत्यक्ष शिक्कामोर्तब झाले आहे.

यंदाच्या खरीप हंगामात मुग, उडद, सोयाबीनसह कापूस व तुरीच्या पिकांची अतोनात हानी झाली. जिल्ह्यात एकूण ६ लाख ८७ हजार ८९३ हेक्‍टर क्षेत्रात खरिपाची पेरणी झाली होती. यंदा पाऊसमान चांगले राहील असे अंदाज असताना हंगामाच्या प्रारंभी पावसाने दडी मारल्याने मुग व उडदाचे पीक हातून गेले. सोयाबीन पिकाचे बियाणे खराब व सदोष निघाल्याने तब्बल ५० हजार हेक्‍टर क्षेत्रातील पिके उगवली नाहीत. पेरणीचा हंगाम हातून जात असताना ही वेळ आल्याने शेतकरी हवालदिल झाला होता.

ऑगस्ट ते ऑक्‍टोबर या कालावधीत पावसाने लावलेली रिपरिप सोयाबीन पिकासाठी हानिकारक ठरली. ४१ हजार हेक्‍टर क्षेत्रातील सोयाबीन पूर्णतः वाया गेले. तर इतर क्षेत्रातील सोयाबीन फुलोऱ्यांवर व काही ठिकाणी शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना पावसामुळे सोयाबीन जागेवरच सडले, तर काही जागी गंज्या सडल्या. प्रतवारी घसरून शेतकऱ्यांच्या हाती उत्पादन खर्च निघू शकेल इतकेही उत्पादन लागले नाही. कापसाचेही या पावसाने मोठे नुकसान केले.

अतिपावसामुळे जमिनीतील आर्द्रता व ढगाळ वातावरणामुळे कापसावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला. गुलाबी बोंडअळीसोबतच बोंडसरने आक्रमण करून शेतकऱ्यांच्या तोंडचा घासच हिरावून घेतला. त्याचा थेट फटका उत्पादन सरासरीवर झाला असून पन्नास टक्के उत्पादन कमी झाले. तुरीवर दवाळ गेल्याने अनेक भागांत केवळ तुराट्या उरल्या आहेत. तर रब्बी हंगामातील चन्यावर मर रोगाचे आक्रमण झाले आहे. प्रशासनाने केलेल्या सर्व्हेक्षण व निरीक्षणाअंती जिल्ह्याची पैसेवारी ४६ पैसे आली. त्यामुळे हा जिल्हा दुष्काळाच्या श्रेणीत आला आहे.

पैसेवारीची तालुकानिहाय स्थिती

तालुका गावांची संख्या पैसेवारी
अमरावती   139   47
भातकुली   137   47 
तिवसा   95   47
चांदूर रेल्वे   90   46
धामनगाव   112   41
नांदगाव खं.   161   47
मोर्शी   156   44
वरूड 140   46
अचलपूर 185   46
चांदूरबाजार   169   47
दर्यापूर   150   46
अंजनगाव   127 45
धारणी   152   49
चिखलदरा 147 48


संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.