Amravati Loksabha Election : अमरावतीत मतविभाजनाचा लाभ कुणाला?

१९९१ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेसचे वर्चस्व असलेला अमरावती मतदारसंघ १९९६ साली शिवसेनेने त्यांच्याकडून हिसकावून घेतला.
dinesh bub, balwant wankhede and navneet rana
dinesh bub, balwant wankhede and navneet ranasakal
Updated on

अमरावती - विदर्भच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात यावेळी भाजप विरुद्ध काँग्रेस, असा राष्ट्रीय स्तरावरील थेट मुकाबला रंगल्याने मतमोजणीच्या उंबरठ्यावर सुद्धा विजयाबाबत फिफ्टी-फिफ्टीचे गणित लावल्या जात आहे.

१९९१ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेसचे वर्चस्व असलेला हा मतदारसंघ १९९६ साली शिवसेनेने त्यांच्याकडून हिसकावून घेतला. परंतु १९९८ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत रिपाइंचा उमेदवार विजयी झाला होता. मात्र, २००४ ते २०१४ पर्यंत हा मतदारसंघ शिवसेनेच्याच ताब्यात राहिला. २०१९ च्या निवडणुकीत नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या समर्थनावर हा मतदारसंघ जिंकला.

यंदा त्या भाजपच्या उमेदवार असल्याने त्यांनी धोका दिल्याची भावना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मतदारांमध्ये होती. त्याचेच प्रतिबिंब या निवडणुकीच्या मतदानात दिसून येणार असल्याचे मानले जात आहे. त्याचाच फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे उचलतील काय, अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे अमरावती, तिवसा तसेच दर्यापूर या तीनही विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे.

तर अचलपूर व मेळघाटात प्रहारचे आमदार आहेत. बडनेरा मतदारसंघ युवा स्वाभिमानचे रवी राणा यांच्या ताब्यात आहे. मात्र बडनेरा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झाल्याने तसेच हा मतदारसंघ अर्धा शहरी असल्याने मतदार कुणाला कौल देतात याची उत्सुकता ताणल्या गेली आहे.

प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी दिनेश बूब यांच्या रूपात उमेदवार दिल्याने मतांचे विभाजन होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. दिनेश बूब कुणाची जास्त मते घेतात यावर सुद्धा उमेदवाराच्या विजयाचे गणित अवलंबून आहे. दोन बलाढ्य राष्ट्रीय पक्षाचे चिन्ह यंदाच्या निवडणुकीत असल्याने या दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या अस्तित्वाची ही लढाई ठरणार आहे.

निकालावर परिणाम करणारे घटक

  • प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी शिवसेनेचे दिनेश बूब यांना दिलेली उमेदवारी

  • अचलपूर व मेळघाट मतदारसंघात प्रहारचे आमदार

  • बडनेरा व अमरावती मतदारसंघात कमी प्रमाणात झालेले मतदान

  • भाजपात असलेली अंतर्गत नाराजी

  • महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांसोबत काँग्रेसने ठेवलेला समन्वय

  • आमदार यशोमती ठाकूर यांनी अतिशय ताकदीने लढविलेला किल्ला

  • राणा दाम्पत्याने उद्धव ठाकरे यांच्या विरोधात उघडलेल्या मोर्चाबाबत स्थानिक शिवसैनिकांमध्ये असलेला संताप

  • केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या झालेल्या सभा

कुणालाही कमजोर समजता येणार नाही

अमरावती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांत एकाही ठिकाणी भाजपचा आमदार नाही. नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिल्याने भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते फारसे सक्रिय नव्हते, अशी कुजबूज आहे. परंतु त्यांची बाजू लंगडी असल्याचे मानणे चुकीचे ठरू शकते. कारण रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानची संपूर्ण टीम सुरवातीपासूनच सक्रिय होती. त्यामुळे नवनीत राणा यांच्या उमेदवारीचा भाजपला नेमका फायदा होईल की तोटा? याचीच चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.