चांदूररेल्वे, (अमरावती) : सुमारे दोन महिन्यांपासून देशभरात लॉकडाउन आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडली तर सर्व बाजारपेठा बंद आहेत. दुसरीकडे घरात रिकामे बसून नागरिकांना देखील कंटाळवाणे झाले आहे. दोन महिन्यांपासून घरातच राहावे लागत असल्यामुळे साहजिकच घरी घालायच्या कपड्यांचा वापर वाढला आहे. दरम्यान, काही भागात टप्प्याटप्प्याने दुकाने उघडायला लागली असून ग्राहकांनी तर विविध प्रकारची खरेदी करण्यास गर्दी केल्याचे दिसून येत आहे. अमरावती जिल्ह्यात मात्र अनेक ग्राहकांनी ईतर घरगुती कपड्यांसह चक्क चड्डी, बनियनच्या खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून आले.
कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर लॉकडाउनमुळे गेल्या दोन महिन्यांनंतर काल शहरातील सर्व दुकाने उघडली. सकाळी नऊ ते दुपारी तीनपर्यंत सुरू असलेल्या या दुकानांमध्ये ग्रामीण भागासह शहरातील ग्राहकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली. रेडिमेड कपड्यांच्या काही दुकानदारांशी चर्चा केली असता ग्राहकांचा कल होजियारी कपड्यांवर म्हणजेच पायजमा, बरमुडा अन्य घरगुती वापराच्या वस्तू खरेदीवर जोर असल्याचे समजले.
गेली दोन महिने लॉकडाउनमध्ये घरच्या घरी राहिल्याने अनेक ग्राहकांचा कल लुंगी, बरमुडा, पायजमा, टी-शर्ट आणि बनियान याच कपड्यांवर दिसत होता, तर महिलांचाही घरगुती कपडे आणि लहान मुलांचे दररोजच्या वापराचे कपडे खरेदीवर भर दिसून आला. याशिवाय तुरळक ग्राहक लग्नासाठी खरेदी करताना आढळून आले. गेले दोन महिने जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने उघडण्याची परवानगी असल्याने शहरातील इतर सर्व दुकाने बंद राहिली.
त्यामुळे घरी असलेल्या कपड्यांवरच अनेकांनी दिवस काढले, त्यात ऑफिस व इतर व्यवसाय बंद असल्याने अनेकांच्या घरी इतर शर्ट-पॅन्ट व प्रेस केलेले कपडे कपाटात जसेच्या तसेच राहिल्याने केवळ होजियारी कपड्यांचा वापर वाढल्याने ते जीर्ण होण्यासोबत बोरही झाल्याचे अनेकांनी सांगितले. त्यामुळे कपड्यांची दुकाने उघडल्यावर आधी बरमुडा, टी-शर्ट खरेदीवर भर दिसून आला.
नफ्यापेक्षा जीव महत्त्वाचा
दोन महिने दुकाने बंद होती. यादरम्यान लग्नाचा संपूर्ण सीझन गेला, काही लग्ने समोर ढकलल्या गेली, या सीझनवर आम्ही वर्षभर प्रपंच चालवितो, पण कोरोनाच्या या संकटात नफ्यापेक्षा जीव वाचविणे हेच महत्त्वाचे असल्याचे अनेक दुकानदारांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.